आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Hospital Ready With Medicine For Infection

नियोजन : साथ नियंत्रक पथक औषधांसह सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - पावसाळ्यात साथीचे आजार बळावण्याची शक्यता असल्याने या आजारांना अटकाव करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 15 विशेष आरोग्य पथकांची स्थापना करण्यात आली असून, जिल्ह्यातील सुमारे 103 आरोग्य केंद्रांमध्ये 21 प्रकारच्या औषधांचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे.

अशुद्ध पाण्यामुळे साथीच्या रोगांची लागण होते. डासांच्या उत्पत्तीमुळेही साथीचे आजार बळावतात. साथीच्या आजारांमध्ये कावीळ, अतिसार, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लू यांचा समावेश होतो. अशा रुग्णास वेळीच उपचार न मिळाल्यास त्याचा मृत्यू ओढावण्याची दाट शक्यता असते. नागरिकांना साथीच्या आजारांची माहिती मिळावी तसेच रुग्णांना वेळीच जवळच्या आरोग्य केंद्रात उपचार मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्हा स्तरावर एक, तर तालुकास्तरावर 15 विशेष पथकांची नियुक्ती केली आहे.

जिल्हा आरोग्य पथकात साथरोग अधिकारी, आरोग्य सहायक व अणुजीव शास्त्रज्ञ, तर तालुकास्तरीय पथकाचे कामकाज वैद्यकीय अधिकारी, आरोग्य विस्ताराधिकारी, आरोग्य सहायक यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. गतवर्षी जिल्ह्यात कुठेही मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा उद्रेक झाला नव्हता. तरीही साथीच्या आजारांपासून बचावासाठी नागरिकांनी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन वेळोवेळी आरोग्य तपासणी करून औषधोपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्याधिकारी एस. एस. वाघचौरे यांनी केले आहे.

घरोघर जाऊन आरोग्य तपासणीची गरज
एखाद्या गावात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळल्यास तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य पथक व आरोग्य केंद्राच्या कर्मचाºयांना देण्यात आल्या आहेत. कर्मचाºयांनी घरोघर जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. रुग्णांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी पथकांकरिता वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. संशयास्पद रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेऊन त्यांची तपासणी करून पुढील औषध उपचारासाठी रुग्णांना शासकीय रुग्णालयात हलविले जाणार आहे.

साथीचे आजार बळावण्याची कारणे
परिसर स्वच्छता पाळली जात नसल्याने साथीच्या आजारांचा फैलाव होतो. पिण्याचे पाणी दूषित होऊन रोगांची लागण होते. शहरांना जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन पाण्याची तपासणी व शुद्धीकरणासाठी ठोस उपाययोजना
करण्यात कमी पडते. ग्रामस्थांकडूनही पावसाळ्यात पाणी शुद्धतेविषयी काळजी घेतली जात नाही. परिणामी, खेड्यांमध्ये साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची सर्वाधिक शक्यता असते.

पाणी उकळून व गाळून प्यावे
- अशुद्ध पाण्यामुळेच साथीचे रोग बळावतात. यंत्रणेने नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी आपल्यास्तरावर स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. किमान पावसाळ्यात पाणी उकळून व गाळून पिल्यास रोगांना दूर ठेवता येऊ शकते. आरोग्यासंदर्भात कोणतीही समस्या जाणवल्यास रुग्णांनी त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा. डॉ. बी. आर. साखरे, जिल्हा साथरोग अधिकारी

कार्यशाळांद्वारे मार्गदर्शन
- स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी पाण्यात आबेटिंग नावाचे केमिकल टाका.
- घराचा परिसर स्वच्छ ठेवा.
- ग्रामपंचायत प्रशासनाने गाव परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी करावी.
- आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळा. सर्व पाणीसाठे कोरडे करावेत.
केंद्रात ही औषधे उपलब्ध
मेट्रोनीडॅझोल, सिप्रो, टेरामायसिन, जेन्टामायसीन इंजेक्शन, अ‍ॅमेकाटिन, आयव्ही, आरएल, डिएनएस (सलाईन) आदी 21 प्रकारच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे.
फोटो - डमी पिक