आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • District Literary Gathering, Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी कथा चांगली, पण उत्तम मात्र नाही, डॉ. वैशंपायन यांच्या मुलाखतीतून उलगडले पैलू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- बंगाली, कानडी साहित्याच्या मानाने मराठी साहित्य खूपच खाली आहे. कथेच्या बाबतीत खूप मागे आहोत. आपल्याकडे का असे वेगळे, लयबद्ध लेखन होत नाही, याची खंत वाटत असल्याचे मत जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या यंदाच्या अध्यक्षा डॉ. मीना वैशंपायन यांनी व्यक्त केले. मी लहानपणापासूनच खूप वाचत आले आहे. बंगाली, कानडी कथा वाचल्या. इतर भाषांमध्येही वाचते. तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते, असे त्या म्हणाल्या.
यंदा प्रथमच अध्यक्षांचे भाषण न ठेवता मुलाखतीतून त्यांना काय म्हणायचे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. साहित्याचे अभ्यासक स्वानंद बेदरकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
संस्कृत, मराठी, पाली, इंग्रजी भाषांचा तुमचा अभ्यास आहे. या भाषांनी तुम्हाला काय दिले?
या भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांचे मी ऋण व्यक्त करते. माझ्या घरात लहानपणापासूनच वाचनाचेच वातावरण होते. त्यामुळे मला भारतीय भाषांची संपन्नता लक्षात आली. मॅट्रीकला चांगले गुण मळूनही विज्ञान शाखेकडे न जाता कला शाखेकडे गेले. भाषा समृद्ध करत गेल्या.
नाशिक तुमचे सासर. नाशिकने, नाशिककरांनी काय दिले?

मला तुम्ही आज ज्या व्यासपीठाचा मान दिला, तो मला नाशिकमुळेच मिळाला आहे. माझे माहेर वसई. नाशिकला आल्यावर सुरुवातीला कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळल्या. आमची एकत्र कुटुंब होते. त्यामुळे कुटुंबाला, समूहाला कसे धरून ठेवावे ते मला इथेच शिकायला मिळाले. मी बी. एड. इथेच केले. मला आठवते तेव्हा अशोक जैन यांच्या ह्यसत्तांधह्ण पुस्तकाचे परीक्षण करायला मला आपल्याच पुस्तक मित्र मंडळाकडून सांगण्यात आले. एका २६-२७ वर्षांच्या मुलीला ते काम विश्वासाने नाशिककरांनी दिले. पुढे स्त्री मंडळ एकांकिका स्पर्धा केल्या. व्यासंग वाढत गेला आणि आज इथे पोहोचले.
दुर्गाबाईंच्या साहित्यावरील संशोधनाकडे कशा वळलात?
मी एम.ए.नंतर १५ वर्षांचा गॅप घेतला होता. दरम्यान दुर्गाबाईंचे साहित्य वाचत असताना काही शंका येऊ लागल्या. दुर्गाबाई तटस्थ लिहितात, कधी कधी ते अर्धवट वाटते. याचा उलगडा होईना. त्यांच्या साहित्यावरील संशोधकाकडेच वळले.
दुर्गाबाईंबरोबरच्या सहवासाच्या काही आठवणी..
स्वातंत्र्य मूल्ये जपण्याची, जगवण्याची व जागवण्याची भावना त्यांनी रुजवली. स्वातंत्र्याचे रक्षण आपणच केले पाहिजे. स्त्रियांनी नदीसारखे असले पाहिजे, कर्तृत्ववान असले पाहिजे ही जाणीव त्यांनी दिली.
ज्ञान आणि विज्ञानाचे हस्तांदोलन म्हणजे तुमचे लिखाण वाटते...
ते दोन्ही वेगळे आहेत असे मी मानतच नाही. आपण ज्या जगात राहतो त्यातील विज्ञानाच्या संकल्पना समजावून घेणे महत्त्वाचे आहे. आणि ज्ञान मिळविण्यासाठी, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांचा प्रचंड आदर आहे. म्हणून हस्तांदोलन नव्हे, तर दोघांना हातात हात घालून मी लिहिते.
अनुवाद कलेविषयी काय सांगाल?
अनुवाद ही कला सहजसाध्य वा सोपी नाही. तिच्यासाठी मेहनत व अभ्यास करावा लागतो. दुहेरी भूमिका बजावावी लागते. मूळ लेखनात विसंगती येऊ नये, योग्य शब्द सुचणे हे महत्त्वाचे असते. नवीन शब्द आल्याने भाषा संपन्न होते, पण ती भ्रष्ट तर होत नाही ना, याकडे लक्ष दिले पाहिजे.
मराठी कथा विसर्जित करायला हव्या का?
अजिबात नाही. कथा थोडी मागे पडली आहे. पण त्यात विषयांचा सर्वसमावेशकपणा आला पाहिजे. त्या कमी लांबीच्या असल्या पाहिजेत. भावनांची, विचारांची तीव्रता त्यात असावी. आपल्याकडील कथेवर वेगळ्या प्रकारे संस्कार केले पाहिजेत.