नाशिक- साधुग्रामसाठी आवश्यक असलेल्या जागा अखेर भाडेतत्त्वावर घेण्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधितांना द्यावे लागणारे भाड्याचे दर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने जवळपास निश्चित केले असून, जिल्हाधिका-यांच्या परवानगीसाठी समितीने भाडेदर निश्चितेचा अहवाल सादर केला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर विभागीय आयुक्तांच्या परवानगीनंतर दर अंतिम केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
साधुग्रामची जागा कायमस्वरूपी घेण्याचा हेका शेतकऱ्यांनी लावून धरला असताना कायदेशीर बाबी आणि शासनाची आर्थिक परिस्थिती पाहाता ते शक्य नव्हते. त्यामुळे भाडेतत्त्वावरच या जागा घेतल्या जाणार आहेत. त्यात शेतकऱ्यांचे नुकसान व्हावे त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी निवासी उपजिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग उपनिबंधक अशा विभागांच्या अधिका-यांची समिती नियुक्ती करण्यात अाली होती. या समितीच्या संयुक्त बैठका झाल्या असून, त्याचा अहवालही तयार झाला आहे. जिल्हाधिका-यांनी मान्यता दिल्यानंतर हा अहवाल विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर अंतिम केला जाणार अाहे. जिल्हाधिकाऱ्यांपुढे स्वाक्षरीसाठी तो सादर करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीची आता या दर निश्चितीला प्रतीक्षा आहे.