आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदर्भ सेवा रुग्णालयाची सुरक्षाव्यवस्था वाऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा पुरविण्याच्या हेतूने काेट्यवधी रुपये खर्च करून शालिमार येथे सुरू करण्यात आलेले विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अाजघडीला टवाळखाेरांचा अड्डा बनले अाहे. शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या रुग्णालयात सर्रास वावर करून हातात मद्याच्या बाटल्या घेऊन टेरेसवर पार्टी करण्यापर्यंत परिसरातील टवाळखोरांची मजल गेली अाहे. येथील सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर असल्यामुळे रुग्णालयातील लाखोंचे साहित्य चोरीला जात असल्याची धक्कादायक बाबदेखील नुकतीच उघडकीस आली आहे.
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या बंद कक्षाचे कुलूप तोडून संगणक चोरी करण्यात आल्याची घटना शनिवारी संदर्भ सेवा रुग्णालयात उघडकीस आली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदर्भ सेवा रुग्णालयातील एका कक्षामधील संगणक आणि सीपीयू चोरी करण्यात आल्याचे पुढे आले. तसेच, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात चोरीच्या घटना घडत असल्याच्या तक्रारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेही पुढे आले आहे. तसेच, संदर्भ सेवा रुग्णालयात अाजघडीला सुरक्षेचा पूर्णपणे बाेजवारा उडाला अाहे.

मुळात संरक्षक भिंतच नसल्यामुळे या रुग्णालयामध्ये रात्री मद्यपींना सहज प्रवेश करता येताे. पूर्वी रात्री असलेला प्रवेश अाता दिवसाढवळ्या हाेऊ लागला अाहे. रुग्णालयाच्या आवारात ठिकठिकाणी मद्याच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. एवढेच नव्हे, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानावरही माेठ्या अावाजात हाेत असलेल्या पार्ट्या चर्चेचा नाराजीचा विषय ठरू लागल्या अाहेत. या गंभीर प्रश्नाकडे रुग्णालय प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

पुरेशी सुरक्षाव्यवस्था नसल्याने रुग्णालय आवारात कुणालाही मुक्त प्रवेश असल्याचे दिसून येते.
प्रशासनाने लक्ष द्यावे
^संदर्भरुग्णालयातून फक्त सीपीयू चोरीला गेला आहे. टवाळखोरांमुळे वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना त्रास होतो. त्यांच्यावर अतिक्रमणधारकांवर कारवाई व्हावी. प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. एस.कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ सेवा रुग्णालय

कुणालाही मुक्त प्रवेश
संदर्भसेवा रुग्णालयाची दोन मुख्य प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी एक बंद आहे, तर दुसऱ्या प्रवेशद्वारावर िनयुक्त सुरक्षारक्षकांसाठी असलेल्या कॅबिनमध्ये रुग्णालयाबाहेर उभे राहणाऱ्या कपडे तसेच अन्य विक्रेत्यांचा माल ठेवला जातो. सुरक्षारक्षक जागेवर नसल्याने कुणालाही तेथे मुक्त प्रवेश असल्याचे चित्र आहे.

कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण
रुग्णालयाच्या हद्दीत संरक्षक भिंत बांधण्यास सरकारी यंत्रणेला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या आवारात राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवनही असुरक्षित बनले आहे. या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना चोरट्यांकडून लक्ष केले जात आहे. अगदी भरदिवसा या कर्मचारी निवासस्थानांमध्ये चोरीच्या घटना घडतात. तसेच, रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये रहिवासी भागात टवाळखोरांकडून मद्यपान करून जुगाराचे डाव मांडले जातात, त्यामुळे कर्मचारीवर्गात भीतीचे वातावरण आहे.

मद्यपी चाेरांचा धिंगाणा
रुग्णालयाच्या आवारातच मद्यपी चाेरांचा कायम धिंगाणा सुरू असतो. येथे मद्याच्या बाटल्या सर्रासपणे पडल्याचेही दिसून येते. आवारातच दररोज जुगाराचा डाव रंगतो. वसाहतीतील इमारतींचे पाइप्सदेखील चोरट्यांनी लांबविले आहेत. संरक्षक भिंतीअभावी रुग्णालय आवारातील कर्मचारी वसाहतीतून मोटारसायकली, सायकल इतर साहित्यही अनेकदा चोरीस गेले आहे.