आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi And Art Of Living Organise Vote For Better India Campaign

भावी वकिलांची मतदार नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘दिव्य मराठी’चे ‘बना मतदार’ आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे ‘वोट फॉर बेटर इंडिया’ हे संयुक्त नवमतदार नोंदणी अभियान शहरातील विविध महाविद्यालयांत सुरू आहे. त्याला सर्वच महाविद्यालयांतील तरुणांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, शनिवारीही एनबीटी विधी आणि व्ही. एन. नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कायद्याचे शिक्षण घेणार्‍या भावी वकिलांनी आपल्या मताचे महत्त्व जाणत महाविद्यालयात सुरू असलेल्या मतदार नोंदणी अभियानात शनिवारी मोठा सहभाग नोंदविला. अनेकांनी कागदपत्रे नसल्याने सोमवारी कागदपत्रांसह अर्ज जमा करण्याचे आश्वासन देत आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

विधी महाविद्यालयात सकाळी 10.30 वाजेपासून अर्ज वितरण करण्यात आले. सोमवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने शनिवारी प्रवेशपत्र घेण्यासाठी आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज घेतले. सोमवारी परीक्षेला येताना आवश्यक कागदपत्रांसह ते भरून आणण्याचे आश्वासन त्यांनी दिले. प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनीही विद्यार्थ्यांना नाव नोंदविण्यासाठी आवाहन केले. नाईक अभियांत्रिकीत प्राचार्य डॉ. अद्वैत वैद्य यांनी वर्गावर्गांत जाऊन विद्यार्थ्यांना नाव नोंदविण्याबाबत आवाहन करीत सोमवारी कागदपत्रे आणण्याच्या सूचना दिल्या. के. के. वाघ कृषी अभियांत्रिकी आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अर्ज भरून दिले. हृषीकेश द्रोणाचार्य, राहुल पाटील, हर्षल शेलार, अनीश मसराणी यांनी अभियानात सहभागी होत विद्यार्थ्यांना अर्ज वितरित केले.

नाशिकरोड येथील महिला महाविद्यालयात सोमवारी दुपारी 2.30 ते सायंकाळी 5.30दरम्यान मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे एन.बी.टी. विधी महाविद्यालय आणि नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातही सकाळी 10 वाजेपासून अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

186 अर्जांची स्वीकृती
अभियानांतर्गत शनिवारी के. के. वाघ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात- 82, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयात- 19, के. के. वाघ अभियांत्रिकीत- 15, बीवायकेत- 15 आणि मविप्र अभियांत्रिकीत- 55 असे 186 अर्ज कागदपत्रांसह जमा झाले.

‘एसएमएस’ने माहिती
एनबीटी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातर्फे ‘एसएमएस’द्वारे मतदारयादीत नाव नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्राचार्यांनीही विद्यार्थ्यांना या अभियानाची माहिती दिली. अद्याप नावनोंदणी न झालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांची नोंदणी सोमवारी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.