आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यसनाधीनतेचा राक्षस बळावतोय; ‘दिव्य मराठी’ व लाईफ रिहॅबिलिटेशन सेंटरतर्फे व्यसनमुक्तीवर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - औद्योगिक विकासाबरोबरच आधुनिकतेची कास धरत प्रगतिपथावर जाणार्‍या नाशिकमध्ये विविध व्यसनांचे प्रमाण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक मादक पदार्थविरोधी दिनानिमित्त गुरुवारी (दि. 26) सायंकाळी पाच वाजता कालिदास कलामंदिरात ‘दिव्य मराठी’ व लाईफ रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील एकूण स्थिती पाहत मद्यपींचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष स्वयंसेवी संस्था व सुजाण नागरिकांनी काढला आहे. शहरातील विशिष्ट ठिकाणी चरस, गांजा, ब्राऊन शुगर, बंटा आणि व्हाईटनर यासारखी घातक व्यसने करणारी मंडळी सर्रास निदर्शनास येते.
केवळ मजा, मित्रांना सोबत, व्यावसायिक संबंध वाढविण्यासाठी किंवा दु:ख कमी करण्याच्या निमित्ताने मद्याच्या आहारी जाणारे हजारो तरुण सर्वत्र दिसत असल्याचे सार्वत्रिक चित्र आहे. एखादा सदस्य मद्य किंवा अन्य व्यसनांच्या विळख्यात सापडल्याने संपूर्ण कुटुंबाचे दैनंदिन जीवन अतिशय कठीण झाल्याचीही शेकडो उदाहरणे आपल्या आसपास आहेत.
बंटा गोळीचाही वापर
गांजानंतर शहरात चलती आहे ती बंटा नावाच्या गोळीची. ओल्या गांजापासून ही गोळी तयार केली जाते. व्यायाम करताना वा कष्टाचे काम करण्यापूर्वी काही तरुण ही गोळी सेवन करतात.
व्हाईटनरची नशा
रेल्वे स्थानक आणि गोदाकिनारी कचरा वा भंगार वेचणार्‍या मुलांमध्ये व्हाईटनर हुंगण्याचे प्रमाण वाढले आहे. अल्प खर्चात ही नशा करता येत असल्यामुळे रस्त्यावरची मुले या व्यसनाच्या आहारी जाताना दिसतात.
सर्रासपणे ओढला जातो गांजा
शहरातील गोदावरी काठी, भद्रकाली, द्वारका आणि जुने नाशिक परिसरात गांज्याची सर्रास विक्री होते.

काही पान टपर्‍यांवरही तो सहज मिळतो. गोदाघाट, रामसेतू, होळकर पूल, रामवाडी, टाळकुटेश्वर मंदिराजवळ, पंचवटीतील झोपडपट्टी, तपोवन, स्मशानभूमी, पेठरोड, नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात गांजा ओढणारे दिसतात. मध्य प्रदेश व आंध्र प्रदेशातील नक्षलवाद्यांकडून नाशकात गांजा येत असल्याचे आजवरच्या वेगवेगळ्या छाप्यांवरून स्पष्ट झाले आहे.
चला व्यसनमुक्तीकडे...
‘वाढती व्यसनाधीनता आणि व्यसनातून मुक्त होण्यासाठीच्या उपाययोजना’ यावर चर्चा करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ व लाईफ रिहॅबिलिटेशन सेंटरच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमासंदर्भात अधिक माहितीसाठी 9767814725 किंवा 8378945676 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.