आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi Festival, Swapnil Bandodkar Music Programme

दिव्य मराठी उत्सव: स्वप्नीलच्या राधास्वरांत नाशिककरांची आनंदपर्वणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- तो कधी येणार. राधा ही बावरी कधी गाणार. त्याला कधी बघायला मिळणार. अशा प्रतीक्षेत असतानाच ‘सुख पावसापरी यावे’ या सुरांची बरसात करत तो स्वरपीठावर आला अन् तरुणींसह चिमुकले आणि आजी-आजोबांमध्ये एकच जल्लोष झाला. त्याच्या सुरावटींवर नाशिककर ताल धरू लागले, रंगून गेले..

‘दिव्य मराठी’च्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त आयोजित उत्सवांतर्गत ‘स्वप्नील बांदोडकर दिव्य म्युझिकल नाईट’चा जल्लोष सुरावटींचा अतिउच्च आनंद देऊन गेला. स्वप्नीलच्या जोडीला होते ते नाशिकचे म्युझिक लव्हर्सचे कलाकार, तर रसिकांशी मनमुराद संवाद साधत त्यांनाही या गाण्यांमध्ये सहभागी होण्यास भाग पाडले ते आरजे प्रेशीत याने. गायक रवी याच्या ‘देवा तुझ्या दारी आलो’ या गणेश वंदनेने श्रीगणेशा झाला. त्यानंतर अनघा यांनी ‘माय भवानी तुझे लेकरू’ म्हणत आईला साकडे घातले. गायक कुणाल यांच्या ‘मायेच्या हळव्या’ गाण्याला रसिकांनी दाद दिली. ‘राधा ही बावरी’ गाण्याची उत्सुकता प्रेशीत वाढवत असतानाच ‘सुख पावसापरी यावे’ म्हणत स्वप्नीलने स्वरपीठावर प्रवेश केला आणि तरुणाईचा एकच जल्लोष झाला. त्यानंतर त्याने एकापाठोपाठ ‘एक का कळेना कोणत्या क्षणी’, ‘ओल्या सांजवेळी’, ‘गालावर खळी’ ही गाणी सादर केली. वन्स मोअरबरोबर टाळ्यांचा ठेकाही गाण्यांना दाद देत होता. एक छोटासा ब्रेक घेत स्वप्नील पुन्हा स्वरपीठावर आला असता त्याने ‘तूच माझी आई देवा..’, ‘मल्हारवारी’, ‘संगती माझ्या ढोल बजादे’ आणि ‘धुमशान अंगात आलंय’ ही गाणी सादर करून पुन्हा राधाला रसिकांच्या भेटीला आणले आणि ‘राधा. राधा.. माझी राधा कुठं गेली बघा’ यावर थिरकत राधांनी पुन्हा स्वप्नीलला गराडा घातला.

प्रेक्षागारात ताल : उडत्या चालीची गाणी सादर होत असताना रसिकांनी आपल्या जागेवरच ताल धरला. त्यात चिमुकले तर होतेच; पण त्यांचे आई-बाबाही सहभागी झाल्याने ही आनंदपर्वणी अनोखी ठरली.

प्रारंभी नाशिकचे पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड मदनसिंग परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार, सुयोजित व्हिरीडीएन व्हॅलिजच्या जयश्री राजेगावकर, वैशाली जैन आणि स्वप्नीलच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.