आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी विकास मंच’मध्ये २० हजार प्रश्न-तक्रारींची दखल, ६१ प्रभागांत ३६ हजार तक्रारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नागरीप्रश्नांची साेडवणूक करण्याच्या हेतूने ‘दिव्य मराठी’ने तीन वर्षांपासून सुरू केलेल्या विकास मंच अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समाराेप रविवारी (दि. १८) प्रभाग क्रमांक ११ मधील कार्यक्रमाने झाला. या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील अाराेग्य, रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा, नागरी सुरक्षा, वाहतूक, उद्याने अशा विविध सुविधांविषयक तब्बल ३६ हजार प्रश्न मांडण्यात अाले, तसेच अनेक उपयुक्त सूचनाही नागरिकांनी केल्या. त्यातील बरेचसे प्रश्न अाणि तक्रारी-समस्यांचे स्वरूप बहुतांशी सारखेच हाेते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, एकत्रित सुमारे २० हजार तक्रारींची गांभीर्याने दखल घेत नगरसेवकांनी अभियानादरम्यान नागरिकांशी मनमाेकळी चर्चा करून त्यापैकी अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
दरम्यान, प्रभाग ११चे नगरसेवक असलेले अामदार बाळासाहेब सानप यांनी ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमाचे काैतुक करीत लाेकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना करता अालेली काही कामे ‘दिव्य मराठी’ने करून दाखवली, असे गाैरवाेद‌्गार काढले.

शहरातील लहान-माेठ्या समस्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाल्याची बाब ‘दिव्य मराठी’च्या निदर्शनास अाल्यानंतर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी विकास मंच अभियान सुरू करण्यात अाले. नागरिक अाणि संबंधित प्रभागाचे नगरसेवक यांच्यात दुवा साधण्याचे महत्त्वाचे काम या अभियानाने झाले. प्रभाग क्रमांक ६१ पासून सुरू झालेल्या या अभियानाचा समाराेप प्रभाग क्रमांक ११च्या उपक्रमाने झाला. यावेळी अामदार सानप यांनी अभियानाच्या यशस्वितेचे काैतुक करीत माध्यमांची ताकद विशद केली.
अभियानादरम्यान काही अपवाद वगळता सर्वच प्रभागांमध्ये अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात नागरिकांनी नगरसेवकांशी संवाद साधला. बऱ्याच प्रश्नांची साेडवणूक अभियानानंतर अाठवडाभरातच झाली. हे विकास मंचच्या माध्यमातून झालेल्या जागरामुळेच शक्य झाल्याचे वेळाेवेळी शहरवासीयांनी बाेलून दाखवले.
१२० नगरसेवकांशी नागरिकांचा संवाद (दाेघे एेनवेळी गैरहजर)
१२२०० लाेकांनी भरून दिल्या प्रश्नावली
२०००० तक्रारी मार्गी लावण्याचा प्रयत्न
३६६०० प्रश्न अभियानात विचारण्यात अाले
६१ प्रभागांत झाले अभियान