आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या स्वतंत्र पाणी नियोजन समित्या, लोकप्रतिनिधी, जलतज्ज्ञ, विधिज्ञ, कार्यकर्त्यांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- पाणीटंचाईचे जोरदार चटके शहरासह जिल्हावासीयांना यंदा बसले आहेत. त्यातून बोध घेऊन भविष्यात पुन्हा अशी भयावह वेळ येऊ नये म्हणून पहिल्या पावसापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे. याच नियोजनाचा एक भाग म्हणून ‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘पाणी नियोजन’ या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सर्वपक्षीय नेते या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्रित करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार लोकप्रतिनिधी, जलतज्ज्ञ, न्यायालयीन लढ्यांना बळकटी देण्यासाठी विधिज्ञ आणि जलस्रोतांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांच्या स्वतंत्र समित्या ‘दिव्य मराठी’च्या पुढाकाराने करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.

गंगापूर धरणातून पाणी कोणी पळविले, यात कोणत्या पक्षांचा पुढाकार होता, यावर मोठ्या प्रमाणात चर्वितचर्वण झाले आहे. विविध राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. परंतु त्यातून साध्य काय झाले? पाण्यासारख्या संवेदनशील मुद्यावर चर्चा होणे अपेक्षित आहेच. परंतु, भविष्यात जलसंकट ओढवणार नाही याचाच प्रामुख्याने विचार अशा चर्चांमधून होणे क्रमप्राप्त ठरते. किंबहुना पाण्याचे दुर्भिक्ष टाळण्यासाठी विविध सन्माननीय पर्यायांवर विचारमंथन व्हावे. दुर्दैवाने नाशिकमध्ये असे चित्र दिसत नाही. दुसरीकडे राजकीय एकजूट नसल्याने त्याचा फायदा बाहेरची मंडळी उचलतात आणि त्यातून नाशिकचे पाणी पळविले जाते. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने पाणीप्रश्नाचे भविष्यकालीन नियोजन करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राजकीय पदाधिकारी एका व्यासपीठावर येत नसल्याने प्रत्येकाचे पक्षीय अभिनिवेश वेगवेगळे राहतात आणि त्यातून समस्येची सोडवणूक होण्याएेवजी ती अधिक वाढते. त्यामुळे राजकीय पदाधिकाऱ्यांची समिती गठित करण्याचा निर्णय ‘दिव्य मराठी’ने घेतला आहे. त्याचप्रमाणे पाणीप्रश्नाची तांत्रिक बाजू समजून घेत त्यावर पर्याय शोधण्यासाठी जलतज्ज्ञांची समिती, पाण्याविषयीच्या न्यायालयीन लढ्यांना बळकटी देण्यासाठी विधिज्ञांची समिती पाणी अडवा, पाणी जिरवा किंवा यांसारखे तत्सम प्रकल्प राबविणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या समित्या ‘दिव्य मराठी’च्या व्यासपीठावर गठित करण्यात येणार आहेत. या समित्यांच्या बैठका घेऊन पाणी नियोजनाचा पथदर्शी आराखडा केला जाईल. ही सतत चालणारी प्रक्रिया असेल. दुष्काळ असो अथवा नसो परंतु पाण्याचे काटेकोर नियोजन योग्य वितरण यावर त्यामध्ये भर दिला जाईल. त्यातूनच नाशिक जिल्ह्याचा एक आदर्श पाणी नियोजन पथदर्शी आराखडा बनविण्यात येणार आहे. निर्णयप्रक्रियेत या आराखड्यांचा उपयोग निश्चितच होईल याचा आम्हाला विश्वास आहे.

पान

व्यासपीठ सर्वांसाठी
‘दिव्यमराठी’चे हे व्यासपीठ सर्वांसाठी खुले आहे. इच्छुकांनी आपला सहभाग नोंदविण्यासाठी अथवा सूचना, नवे पर्याय यासाठी खालील क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा ९९२२१८४७२७, ९९७५५४७६१६.
बातम्या आणखी आहेत...