आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi Group Discretion On Addiction At Nashik

व्यसनाधीनता ही विकृती नसून आजार; ‘दिव्य मराठी’च्या चर्चासत्रातील सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- व्यसनाधीनता ही विकृती नसून, तो आजार आहे, ही बाब समजून घेतली तरच व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी होण्यास मदतच होईल, असा सूर ‘दिव्य मराठी’च्या चर्चेतील मुद्दा उपक्रमात व्यक्त झाला. नववर्षाच्या स्वागताला अर्थातच मंगळवारी, दि. 31 डिसेंबरला एकावर एक पेग रिचवण्यापूर्वीच विचार करावा की हा पेग आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडविणार तर नाही ना? 31 डिसेंबरचे ‘सेलिब्रेशन’ करण्यापेक्षा नव्या वर्षाचा चांगला संकल्प करावा, असा संदेशही चर्चेच्या माध्यमातून देण्यात आला.

सरत्या वर्षाला निरोप देतानाच मद्य प्राशन करून नववर्षाचे स्वागत करण्याची एक विदेशी पद्धत आता रूढ होऊ पाहात आहे. यंदाही विविध बारचालकांकडून वेगवेगळ्या योजना जाहीर केल्या जात आहेत. तरुणाईदेखील अशा ‘सेलिब्रेशन’साठी सज्ज झाली असून, पाटर्य़ांचे नियोजन आतापासूनच सुरू झाले आहे. परंतु, दारू वा अन्य व्यसन माणसाला कोणत्या स्तरापर्यंत नेऊन पोहचवते हे व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीला भेटल्यावरच जाणवते. अनेकांचे संसार व्यसनापोटी उद्ध्वस्त झाले आहेत, तर अनेकांची नोकरी गेली, व्यवसाय बुडाले. अशा काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर व्यसनमुक्तीसाठी सामंजस्य आणि जनजागृती हेच योग्य पर्याय असल्याचा निष्कर्ष या चर्चेत व्यक्त झाला.
14 वर्षाखालील मुलेही व्यसनाधीन
>दारू पिण्याचा परवाना 18 वर्षे ओलांडल्यानंतर दिला जातो. मात्र 14 वर्षे वयोगटातील मुलेही व्यसनाच्या आहारी आहेत.
>नाताळ आणि 31 डिसेंबरच्या निमित्ताने त्यांचे दारू पिण्याचे प्रमाण तिप्पट होत असल्याची माहिती दी असोसिएटेड चेंबर ऑफ कॉर्मस अँण्ड इंडस्ट्रीज ऑफ इंडियाच्या अहवालात आहे.
>14 ते 29 वयोगटातील तरुणांचे सर्वेक्षण ‘असोचॅम’ने केले. त्यातल्या 65 टक्के तरुणांनी दारूची चव घेतलेली आहे.
>या वयोगटातील 60 टक्के मुलांचे स्वत:वर नियंत्रण राहात नसल्याचा धोका अधिक असल्याचे ‘असोचॅम’चे म्हणणे आहे.
>20 ते 29 या वयोगटातल्या 69 टक्के तरुणांनी पहिल्यांदा दारूची चव थर्टीफस्र्टच्याच पार्टीत घेतल्याचे कबूल केले आहे.
>1958मध्ये भारतात मद्य पिणार्‍यांचा वयोगट 28 वर्षांपुढे होता. आता तो निम्म्याने कमी होत चक्क 14 वर्षांपर्यंत घसरला आहे.
>नैराश्यात असताना दारू घ्यावीशी वाटते असे 52 टक्के मुलांनी सांगितले. 42 टक्के मुलांना दारूच्या नशेचे वेड लागलेले आहे. तर, तीन ते चार पेग पिणे हे 72 टक्के मुलांना ‘कूल’ वाटते.
>आधी फ्रूट फ्लेवल्र्ड पेये, त्यानंतर ब्रीझर आणि त्यानंतर व्होडका असा मुलांच्या मद्यपानाचा प्रवास सुरू होतो.
>थर्टीफस्र्ट, ख्रिसमस, मित्रांचे वाढदिवस शाळेच्या फेअरवेल पार्टीत पहिल्यांदा दारू प्यायल्याचे मुले सांगतात.
>हाती सहज खेळणारा पैसा, पालकांचे दुर्लक्ष, मित्रमंडळींचा दबाव, दारू न पिणार्‍यांची ग्रुपमध्ये होणारी थट्टा अशा अनेक कारणांमुळे मुले व्यसनाच्या आहारी जातात.
>मित्रमंडळींसोबत रात्री घराबाहेर होतो तेव्हा पहिल्यांदा ब्रीझर आणि व्होडका प्यायल्याचे काही 13 वर्षाच्या मुलांनी सांगितले.
आजारी व्यक्ती म्हणून बघा
प्रत्येक दारूपिणारा व्यक्ती व्यसनाधीन असेल असे नाही. परंतु तो व्यसनाधीनतेच्या मार्गाकडे चटकन जाऊ शकतो. व्यसनांची परंपरा पूर्वपार चालत आलेली आहे. परिस्थितीही त्याला कारणीभूत असते. जो हा बदल स्वीकारणार नाही त्याला अडचणी येणारच. धकाधकीच्या जीवनातील तणाव दूर करण्यासाठी व्यक्ती व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो. अर्थात व्यसनाधीनता हा सवयीचा भाग नाही तो आजारच आहे. मानसिक दबावातून तो फोफावतो. त्याकडे आजार म्हणून बघितल्यास रुग्णाला सहानुभूती मिळते. त्यातून व्यसन सोडण्यासाठी कुटुंबीय सामूहिक प्रयत्न करू शकतात; परंतु व्यक्ती जाणीवपूर्वक दारूपिते, अशी भावना ठेवल्यास त्यातून त्या व्यक्तीप्रती सामाजिक तिरस्कार वाढू शकतो.
-डॉ. शिरीष सुळे, प्रसिध्द मानसरोग तज्ज्ञ
व्यसनाधीनतेने गुन्हेगारीत वाढ
अति दारूच्या आहारी गेलेली व्यक्ती भुरट्या चोर्‍या करते, असा आमचा अनुभव आहे. अशी व्यक्ती घरात वा पालकांबरोबर फार काळ राहात नाही. जेव्हा तिला दारू प्यावीशी वाटते आणि त्यासाठी खिशात पैसा नसतो तेव्हा ती भुरट्या चोर्‍यांचा मार्ग अवलंबते. मोठे गुन्हे करणारे गुन्हा करण्यापूर्वी एकत्र बसून दारू प्यायल्याचेही अनेक अनुभव आहे. किंबहुना दारूच्या नशेतच त्यांच्याकडून गुन्हे होऊ शकतात, यावर संबंधित गुन्हेगारांचाही विश्वास असतो. दुसरा दारू पितो म्हणून आपण पितो असे म्हणणारेही अनेक रुग्ण आहेत. बर्‍याच घटस्फोटांचे मुख्य कारण व्यसन हेच असते. व्यसनांमुळे दुष्परिणामच अधिक आहेत. त्यामुळे तरुणांनी त्याकडे आकृष्ट होण्यापेक्षा विधायक कामाकडे लक्ष द्यावे.
- गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त
कुटुंबीयांचे सहकार्य महत्त्वाचे
व्यसनाधीन व्यक्ती स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजत असतो. तो नेहमीच आपल्या विश्वात वावरत असतो. व्यसनापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही. परंतु, त्यातून मुक्त होण्याचा मार्ग त्याला दिसत नसतो. अशा परिस्थितीत पुनर्वसन केंद्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. जो अति मद्य सेवन करतो तो नवीन वर्षाची पहिली सकाळ कधीही फ्रेश मुडमध्ये व्यतीत करू शकत नाही. हॅँगओव्हर त्याला त्रस्त करत असते. त्यामुळे तरुणांनी व्यसनापासून दूर राहिलेलेच बरे. अर्थात व्यसन करणार्‍याकडे गुन्हेगार म्हणून न बघता त्याची व्यसनातून सुटका करण्यासाठी त्याच्या सान्निध्यात येणार्‍या व्यक्तींनी पुढे येणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी कुटुंबाचे आणि मित्रांचे सहकार्य अनिवार्य असते.
- नीलेश राजहंस, संस्थापक, लाइफ रिहॅबिलीटेशन सेंटर
घटस्फोटाचे प्रमाण वाढले
व्यसनावर आळा बसावा, यासाठी कायद्यात महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांची जशी अंमलबजावणी व्हायला पाहिजे तशी होत नसल्याचे आढळून येते. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम देशात, राज्यात या कायद्यांचे तंतोतंत पालन होण्याची गरज आहे. नवरा दारू पित असल्याने अर्थातच त्याचा त्रास महिलांना होत असतो. कुटुंबीयांची फरफट होत असते. त्यामुळे घटस्फोटांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. घटस्फोटीत जोडप्यामुळे त्यांच्या मुलांच्या मनावर वाईट परिणाम होताना दिसतात. व्यसनामुळे घटस्फोट होऊ नये यासाठी कौटुंबिक न्यायालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये समुपदेशनाची सोय असून, व्यसनाविरोधात जनजागृती होणे गरजेचे आहे.
-अँड. दीपक पाटोदकर, विधिज्ञ
पुनर्वसन केंद्राचा मार्ग उत्तम
दारूतून मुक्तताच होऊ शकत नाही, हा समज व्यसनाधीन व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबीयांचा घात करतो. यातूनही मुक्तता होते हा विश्वास त्यांना देणे गरजेचे आहे. व्यसनाधीन व्यक्तीवर फार प्रयोग करीत बसण्यापेक्षा त्याला पुनर्वसन केंद्रात दाखल करणे कधीही सयुक्तिक ठरते. व्यसनाधीनता हा मानवी वर्तनातील दोष नसून तो एका आजार आहे, ही गोष्ट सर्वप्रथम मान्य करणे आवश्यक आहे. ही गोष्ट आम्हाला जेव्हा लक्षात आली तेव्हा आम्ही नीलेश राजहंससारख्या आमच्या मित्राला मुंबईतील प्रथितयश डॉक्टरांकडे नेले व तेथे त्यावर आवश्यक ते उपचार केलेत. आज नीलेश इतरांना व्यसनापासून दूर करण्याचे काम करीत आहे. असाच प्रयत्न इतरांनीही करण्याची गरज आहे.
-मंदार राजेंद्र, मित्रांच्या व्यसनमुक्तीसाठी पुढाकार घेणारा तरुण
लोकजागृती गरजेची
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. शिवाय कमी प्रतीची दारू तेथे उपलब्ध होत असल्याने शारीरिक अपायांचे प्रमाणही अधिक असते. अशा परिस्थितीत लोकजागृती होणे गरजेचे आहे. याशिवाय दारूबंदी कायद्यातही आमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे.
-प्रियदर्शन भारतीय, सामाजिक कार्यकर्ता
तिरस्कारातून व्यसनाधीनता वाढते
व्यसनाधीनतेकडे आजार म्हणून बघावे. व्यसनाधीन व्यक्तीचा तिरस्कार केल्यास तो समाजापासून दूर होण्याचा प्रयत्न करतो. कालांतराने तो अधिक व्यसनाधीन होऊन जगापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. अशा परिस्थितीत कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी पुढे येणे गरजेचे आहे. आजवरचा अनुभव असाही आहे की, लोकलज्जेस्तव पालक आपल्या मुलांना समाजात दारूपिण्यास मज्जाव करतात. परंतु, घरात मात्र ते त्यास दारू उपलब्ध करून देतात. यावरही विचार व्हायला पाहिजे. त्यामुळे व्यसनातून मुक्तता होण्यापेक्षा ते वाढत जाते. अशा परिस्थितीत पुनर्वसन केंद्रांचा मार्ग चोखाळणे आवश्यक ठरते. -विनोद शाह, अध्यक्ष, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन
धोक्याचा लोगो वापरावा
पालक मुलांच्या लाइफ-स्टाइलकडे दुर्लक्ष करीत असतात. आपला मुलगा किंवा मुलगी कोणासोबत राहते किंवा घरी कधी येतात, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. सिगारेट आणि गुटखा यांच्या पाकिटावर कर्करोगाचा धोका अधोरेखित केलेला असतो. त्याच धर्तीवर दारूच्या बाटलीवरदेखील धोक्याचा लोगो वापरणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस वाढलेल्या बेरोजगारीमुळे तरुण मुले व्यसनांकडे वळत आहेत. त्यातूनच त्यांच्यात गुन्हेगारी वर्तन वाढते. विद्यार्थी संघटनांनीही यापासून मुक्ततेसाठी प्रयत्न केले पाहिजे.
-भूषण काळे, महाविद्यालयीन विद्यार्थी प्रतिनिधी
व्यसनमुक्त होण्याची इच्छा अन् कुटुंबियांची मदत
दारू सोडवायला आलो अन् व्यावसायिक झालो
22व्या वर्षीच पहिला पेग रिचवला आणि तोही देशी दारूचा. त्यानंतर काय रोजच प्यायचो. आम्हाला समारंभाला बोलविण्यासाठी देखील गावकरी टाळाटाळ होई. मोठय़ा भावाचे कर्करोगाने निधन झाल्याने जबाबदारी माझ्यावर आली. पण, मी दारूत बुडालेलो होतो. सलग सहा वर्षे मी नशेत असायचो. घरातील भांडीकुंडी विकायचो. आईने मला इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान उघडून दिले. पण, सर्व साहित्य मातीमोल किमतीत विकायचो. याकाळात सगळे लोक मला टाळायचेच. दुखणीही सुरू झाली होती. 2008 मध्ये एका माणसाच्या सल्ल्याने काही थेरपीच्या वापरातून माझी दारू पूर्ण बंद झाली. आता छानशी जीवनसाथी मिळाली. आई आनंदी आहे. आता नोट काउंटिंग मशीन विक्रीचा व्यवसाय आहे.
-मनोज काळे, व्यसनमुक्त झालेला तरुण
जागृती वाढविणे गरजेचे
व्यसनाधीनतेवर आजही खर्‍या अर्थाने जागृती झालेली नाही. त्यामुळे यापुढील काळात जागृतीपर कार्यक्रमांमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. व्यसनाधीन व्यक्तीबरोबर सामाजिक तिरस्काराचे धनी व्हावे लागते; परंतु त्याला न घाबरता कुटुंबीय व मित्रांनी सहकार्य करावे. अर्थात व्यसनी व्यक्तीलाही ते सोडावेसे वाटते; त्यासाठी तो अनेकदा रडतो, भावूक होतो. परंतु काही क्षणानंतर त्याला पुन्हा व्यसन करण्याची हुक्की येते. अशा व्यक्ती मानसिक उपचारानंतर पूर्णत: बर्‍या होऊ शकतात.
-प्राची राजहंस, व्यसनातून मुक्त झालेल्या नीलेश राजहंस यांची पत्नी
खुलेपणाने पुढे या
लंडनमध्ये अल्कोहोल अगदी सहजपणे उपलब्ध होत असल्याने माझ्या मुलाला त्याची सवय लागली. अर्थात अल्कोहोल पिण्याची तेथील संस्कृती आहे. त्यामुळे सुरुवातीला आम्ही फार गांभीर्याने घेतले नाही; परंतु त्याचे रूपांतर कोकेनसारख्या अन्य व्यसनांमध्ये झाले. त्यामुळे त्यावर आम्ही उपचार सुरु केले. आज तो नाशिकमध्ये येऊन व्यसनमुक्त आहे. याबाबत खुली चर्चा केल्यास आणि उपाय शोधल्यास त्यातून मुक्तता होऊ शकते हे आम्ही अनुभवले.
-विपीन पटेल, कोकेनच्या आहारी गेलेला राजीव पटेल याचे वडील
व्यसनमुक्ती देणार्‍या बांधवांची गरज
माझा भाऊ दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने आपल्याला एक नाही तर अनेक राख्या घेऊन आपल्याला बोलविले. त्याच्यासमवेत त्याचे अन्य मद्यपी मित्रही होते. तेव्हा मनात विचार आला की एक दारूडा भाऊ सांभाळताना नाकीनऊ आले आहे; तर अनेक दारूड्यांना भाऊ बनवून साध्य काय होणार? पण आज माझा भाऊ व्यसनातून पूर्णत: बरा झाला आहे. त्याला व्यसनातून बाहेर काढणार्‍या त्याच्या मित्रांना राखी बांधणे आता मी पसंत करेन.
-नीलिमा पुराणिक, व्यसनमुक्त झालेल्या अजय कुलकर्णी यांची बहीण
दारूमुळे माझा घटस्फोट झाला
मी दहावी पास झालो म्हणून माझ्या तीन-चार मित्रांबरोबर दारू पिण्यास सुरुवात झाली. त्यानंतर मी दारूच्या आहारीच गेलो. माझ्या घरातील वातावरण खूप चांगले होते. माझ्यावर चांगले संस्कार केले होते तरीही मला दारू पिण्याची सवय लागल्याने घरात तणाव सुरू झाला. आईवडील कंटाळले. बायकोने दारू सोडविण्यासाठी प्रयत्न केले, पण मी पूर्णपणे दारूच्या अधीन असल्याने तिनेही घटस्फोट दिला. त्यानंतर मी भानावर येत सहा वर्षांपासून आता व्यसनमुक्त आहे.
-ज्ञानेश देशपांडे, व्यसनमुक्त झालेला अभियंता