आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DMLF - लेखक व प्रकाशकाचे नाते आई-दाईप्रमाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लेखकाची संहिता ते प्रकाशकाकडून त्याचे पुस्तकात होणारे रूपांतर, ही लेखक आणि प्रकाशक या दोन्ही घटकांमधील सर्जनशील आदानप्रदानाची प्रक्रिया असते. लेखकाकडे संहितेचे आईपण असते, तर प्रकाशक दाईची भूमिका बजावतो, असे सांगत मराठी साहित्यविश्वातले लेखक-प्रकाशकाचे नाते मान्यवर प्रकाशक, संपादक आणि लेखकांनी येथे उलगडले.

दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि दैनिक भास्कर समूह आयोजित मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ‘लेखक-प्रकाशकाचे नाते’ या विषयावरील चर्चा रंगली. प्रा. अनंत येवलेकर यांनी राजहंस प्रकाशनाचे ज्येष्ठ संपादक डॉ. सदानंद बोरसे, मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता आणि लेखक राकेश वानखेडे यांच्याशी संवाद साधत लेखक-प्रकाशक-संपादक यांच्यातील नात्याचे विविध पैलू रसिकांसमोर आणले. पीयूष नाशिककर यांनी सूत्रसंचालन केले. ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

मराठी साहित्यात लेखक-प्रकाशकाचे नाते समृद्ध आहे, या नात्याच्या दंतकथा बनल्या आहेत. प्रकाशकांचा आणि लेखकांचा परस्परांवर मायेचा अधिकार असतो, या वस्तुस्थितीचा निर्देश करत येवलेकरांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. बोरसे म्हणाले, पुस्तकनिर्मिती हे लेखकाचे श्रेय असले तरी त्यात संहितेनंतरच्या प्रत्येक टप्प्यावर अनेक माणसांची सर्जनशीलता जोडली जात असते. पुस्तकासाठी केवळ लेखकाची संहिता पुरेशी नसते. त्या संहितेवर संपादकाचा हात फिरावा लागतो. ती लेखक आणि संपादक व प्रकाशक यांच्यामधल्या सर्जनशील आदानप्रदानाची प्रक्रिया बनते, तेव्हाच उत्तम पुस्तकनिर्मिती वाचकांपर्यंत पोचते. लेखकाचा आशय यूजर फ्रेंडली करून वाचकांपर्यंत प्रकाशक नेत असतात. लेखकाच्या संहितेची मूल्यवृद्धी संपादक करू शकतात. लेखकाचा पुरेपूर आदर करत संपादकांच्या सूचना स्वीकारण्याची मानसिकता लेखकांकडे असावी लागते, तरीही पुस्तकनिर्मितीत लेखकाचा शब्दच अखेरचा मानला जातो, याकडे बोरसे यांनी लक्ष वेधले.

सुनील मेहता यांनी आपल्या प्रतिपादनात बोरसे यांच्या विधानाची दुसरी बाजू मांडली. अनेकदा आपल्या लेखनावर संपादकीय संस्कार करण्याची मानसिकताच लेखकांकडे नसते, असा अनुभव आला आणि आम्ही अनुवादांकडे वळलो, असे मेहता यांनी स्पष्ट केले. पाश्चात्त्य साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तके मराठीमध्ये अनुवादित करण्याला मेहता पब्लिशिंगने प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी लेखक-प्रकाशक संबंध परस्पर विश्वासावर आधारित होते. आधुनिक काळात दोन्ही घटक बदलले आहेत. कॉर्पोरेट कल्चरचा स्वीकार केला गेला आहे. मात्र, व्यावहारिक घटकांमध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे, असे मत मेहता यांनी मांडले.

लेखक म्हणून सर्जनशील संहितेची निर्मिती करणाऱ्या राकेश वानखेडे यांनी स्वत:च्या संहितेचे प्रकाशकांकडील अनुभवही मोकळेपणाने सांगितले. माझी आता वाचकप्रिय ठरलेली पुरोगामी ही कादंबरी १२ प्रकाशकांनी नाकारली होती. पहिले लेखन तर मी स्वत:च मित्रांच्या मदतीने प्रकाशित केले. पण, ते पुरेशा प्रमाणात वाचकांपर्यंत पोचवण्यात अपयश आले, याची कबुलीही वानखेडे यांनी दिली. लेखकाच्या संहितेला संस्कार हवे, हे मान्य करत वानखेडे यांनी लेखकाचा प्रत्येक शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य नव्हे, हेही सांगितले. काही वेळा लेखक-प्रकाशक नाते सर्जनशील आणि विश्वासाचे तर काही वेळा विळाभोपळ्याचेही असते, असेही ते म्हणाले. पुस्तकनिर्मिती ही वेळखाऊ आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. प्रकाशकांकडे संहिता घेऊन येणाऱ्या लेखकांची संख्याही मोठी असते. मात्र, संपादकीय संस्कारांचा आग्रह धरणाऱ्या प्रकाशन संस्था पुरेसा वेळ घेऊनच पुस्तकनिर्मिती करतात. एकावेळी साधारण २५ नवी पुस्तके आणि ४० ते ५० जुन्या पुस्तकांच्या नव्या आवृत्या, अशी विभागणी झालेली असल्याने नव्या पुस्तकासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी आवश्यक ठरतो. त्यामुळे लिहिले की लगेच पुस्तक अशी लेखकाची अपेक्षा योग्य नसल्याचे मतही चर्चेत व्यक्त झाले.

योग्य वातावरणाअभावी लेखक बॅकफूटला
नव्या पिढीतील लेखकांकडे प्रतिभा आहे, परिश्रमांची तयारी आहे. पण, प्रकाशन विश्वात सध्या कंपूशाही दिसते. विशिष्ट विचार, प्रांत, धर्म, तत्त्वज्ञान.. असे कप्पे करून नव्या लेखकांना डावलले जाते. अशा विरोधी वातावरणामुळे नवा उमेदीचा लेखक बॅकफूटवर जातो, अशी तक्रार राकेश वानखेडे यांनी लेखकांचे प्रातिनिधी म्हणून मांडली. अनेक प्रकाशक जागतिक घडामोडींवरच लक्ष केंद्रीत करणारी पुस्तके काढतात, त्यांना बुडाखाली काय घडतंय-बिघडतंय, याची जाणीव असते का, असा सवालही त्यांनी केला.

लेखकाचे बजेटच नाही
प्रकाशकानी संहिता स्वीकारली की व्यवहाराची बोलणी हाेते. प्रकाशक सांगतात, कागद-प्रिंटिंगचा खर्च, संपादकाचे मानधन या सगळ्या गाेष्टींत लेखकासाठी मानधनाचे बजेटच उरत नसल्याचे वानखेडे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...