आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'...तर मोदींना सर्वात महागडा चहा पाजेन, ज्यामुळे त्यांना GST किती लागतो ते तरी कळेल'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- चहा हे बहुतेक भारतियांचे अत्यंत आवडते असे पेय. टपरीवर मिळणारा चहा आता पंचतारांकित हॉटेलमध्येही काचेच्या ग्लासात देण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे टपरीवरच्या चहासाठी आता वातानुकूलित चहा बारचेही रूप मिळाल्याचे दिसून येत आहे. विविध स्वादाच्या चहाने तरुण पिढीलाही आकर्षित केले आहे. चहा पुराण फार मोठे आहे. चहाचा हाच प्रवास टपरी ते कँफेज या चर्चासत्रात मान्यवरांनी उलगडला आणि उपस्थितांना चहाची एक वेगळी आधुनिक ओळख करून देतानाच चहा आणि कॉफीमधील फरकही समजावून सांगितला.
 
अंकित बोहरा ज्यांनी टपरी नावाने चहाचे आलिशान दुकान सुरु केले आहे. रुहानी संधु ज्यांनी रंगसा नावाने चहाचा ब्रँन्ड विकसित केला आणि प्रिया कपूर यांची सीएमवायके नावाने प्रकाशन संस्था  असून अनेक शहरात पुस्तकांची दुकाने सुरु केली आहेत. आणि आपल्या दुकानात त्या चहाचा आस्वादही वाचकांना देतात. या तिघांनी हा चहाचा आधुनिक प्रवास उत्कृष्टरित्या उलगडून दाखवला.
 
अंकित  बोहरा यांनी म्हटले, टपरी हा शब्द महाराष्ट्राने दिलेला आहे. टपरी म्हटले की झाडाखाली, रस्त्याच्या कोप-यावर असलेला चहावाला आणि त्याच्याकडे नेहमी चहा पीत असणारे दिसतात. यामध्ये कॉलेज तरुणांपासून कष्टक-यांपर्यंत सगळे दिसून येतात. याच टपरीला आधुनिक रूप देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. आम्ही अनेक प्रकारचे चहा देऊन चहाप्रेमींची भूक मिटवण्याचा प्रयत्न करतो.
 
चहा हा अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे चहा पिण्यास आपण मित्रांना घरी बोलावतो तर कॉफी पिण्यास बाहेर घेऊन जातो असे सांगून अंकित बोहरा म्हणाले, कॉफी मशीनमध्ये बनते त्यामुळे सगळीकडे एकाच चवीची कॉफी मिळते. चहाचे तसे नाही. आम्ही अॉर्डर आल्यावर चहा बनवून देतो त्यामुळे त्यात एक वेगळी चव असते.
 
सूत्रधार विकास सिंह यांनी,  पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा पिण्यास आले तर कोणता चहा द्याल असा प्रश्न विचारला असता अंकित बोहरा यांनी म्हटले, सगळ्यात महागडा चहा देईन, त्यामुळे त्यावर किती कर लागतो हे त्यांनी कळेल. त्यांच्या या उत्तरावर सभागृह हास्यकल्लोळ आणि टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले.
 
प्रिया कपूर यांनी चहा आणि पुस्तकाचे नाते उलगडून सांगताना म्हटले, आता अॉनलाईन पुस्तके स्वस्तात मिळतात म्हणून बुकशॉपमध्ये येऊन पुस्तके खरेदी करणा-यांचे प्रमाण कमी झाले आहे. वाचकांनी मित्रांसह यावे, पुस्तकांवर चर्चा करावी यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
 
पुस्तकासोबत चहाची चव घेण्याची संधी मिळावी म्हणून आम्ही आमच्या बुक शॉपमध्ये चहा देण्यास सुरुवात केली होती. चांगला प्रतिसाद मिळाला परंतु परवानगी नसल्याने आम्हाला ते बंद करावे लागले. परंतु आता परवानगी मिळाली तर आमच्या सगळ्या दुकानांमध्ये पुन्हा चहा विक्री सुरू करू असेही त्या म्हणाल्या.
 
रुंगसाच्या रुहानी सिंह यांनी चहाची महती सांगताना म्हटले, चहा अत्यंत आयुर्वेदिक आहे. शरीराला चहा उपयोगी आहे, अनेक विकार दूर करण्याची शक्ती त्यात आहे, मात्र तो बनवण्याची एक पद्धत असते. ती पद्धत कोणी अवलंबताना दिसत नाहीत. आपण घरी चहा बनवतो तो आपुलकीने बनवतो. आज विविध फ्लेवरचे चहा मिळतात परंतु त्यात सिंथेटिक फ्लेवर असतात. त्यामुळे चहा विकत घेताना तो चांगल्या कंपनीचा आणि बघूनच घेतला पाहिजे. तसेच कोणी सांगितले म्हणूनही कोणताही चहा पिऊ नये. ग्रीन टी आजकाल कोणीही पितो परंतु तो पिण्यापूर्वी विचार केला पाहिजे. परदेशात टी कल्चर आहे, तसे कल्चर भारतात रुजावे असा प्रयत्न केला पाहिजे. एवढेच नव्हे तर चीनप्रमाणे आपणही जेवणात चहाचा वापर केला तर अनेक मसाले वापरण्याची गरज भासणार नाही असेही त्यांनी सांगितले.
 
विकास सिंह यांच्या उत्कृष्ट संचालनाने सजलेले चर्चासत्र संपल्यानंतर चहाची महती ऐकलेल्या रसिकांची पावले चहाच्या दुकानाकडे वळली आणि कार्यक्रम यशस्वी झाल्याची पावतीच मिळाली.
बातम्या आणखी आहेत...