Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | divyamarathi Marathi letearetur Festival Live at Nashik

प्रतिभा हा प्रस्थापितांनी उभा केलेला फसवा देखावा, वेदनेचा उद‌्गार ही साहित्याची प्रेरणा- संभाजी भगत

विशेष प्रतिनिधी | Update - Nov 05, 2017, 08:38 AM IST

‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’च्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात लोकशाहीर संभाजी भगत यांच्या 'साहित्य आणि सामाजिक चळवळ' या प

 • divyamarathi Marathi letearetur Festival Live at Nashik
  नाशिक- साहित्यिकांची प्रतिभा, ऊर्मी, सृजन हा सारा प्रस्थापिकांनी उभा केलेला फसवा देखावा असल्याची परखड टीका लोकशाहीर संभाजी भगत यांनी नाशिकमध्ये सुरू असलेल्या दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये केली. ‘साहित्य आणि सामाजिक चळवळी’ या विषयावर ते बोलत होते.
  चळवळींनी शाहिरांना फक्त माणसे जमवण्यासाठी वापरले, या देशातील संस्कृती ज्या कलेवर आधारलेली आहे, त्या कलेला दुर्लक्षले, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी कार्यवाह लोकेश शेवडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. परिसंवादाची सुरुवात संभाजी भगत यांच्या 'धक्का चावडीला देतो गं माय...' या पोवाड्याने झाली. ज्यांच्या घरात चुली पेटत नाही, अशा माय-माऊलींसाठी त्यांनी हा पोवाडा लिहिल्याचे सां‍गितले.
  पहाटेपासून वाट तुडवत पायी शाळेत पोहोचायला उशीर झाला म्हणून पडणाऱ्या शिक्षकांच्या माराच्या वेदनेने पहिले गाणं लिहिल्याची आठवण भगत यांनी सांगितली. वेदना मांडण्याची ताकद गाण्यात आहे, संगीतात आहे याची जाणीव त्या दिवशी झाली असे ते म्हणाले. पुढे ग्रेस आणि ढसाळ या दोघांच्या साहित्याने भारावून आपणही गूढ, अगम्य लिहिण्यास सुरुवात केली होती, परंतु ते काही आपल्या आईला कळत नाही हे लक्षात आल्यावर, आपल्या आईला कळेल त्या सोप्या भाषेत लिहिण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, चळवळ हीच आपली गुरू असल्याचे आवर्जून नमूद केले. सांस्कृतिक एकात्मता असे आपण बोलत असलो तरी आपल्या समाजाचे वास्तव सांस्कृतिक व्यामिश्रतेत असल्याचे त्यांनी मांडले.
  जे आईला कळत नाही, ते का लिहावं....
  जे आईला कळत नाही... ते मी का लिहावं? असा प्रश्न पडायला लागला. तेव्हापासून तिला कळेल अशा भाषेत गाणे, पोवाडे लिहायला लागलो. मात्र, सोपं लिहिणं फार कठीण असते, हे समजल्याचे भगत यांनी सांगितले.

  दंगलींचा देश...
  आपला देश दंगलींचा देश आहे, असे भगतांना वाटते. काही दंगली दिसतात तर काही दिसत नाहीत, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी 'नाही हिंदू मारला नाही मुस्लिम मारला.... बाई माणूस मारला...' हा पोवाडा सादर केला. देशातील दंगल परिस्थितीवर भाष्य करणारा हा त्यांचा पोवाडा आहे. हा पोवाडा त्यांनी कशा परिस्थितीत लिहिला हे देखील सांगितले. माणसाची खरी अडचण ही सामाजिक नाही, आर्थिक नाही तर ती तत्त्वज्ञानाची असल्याचे त्यांनी सांगितले.
  स्त्रीवादी हुंकार आणि शेतकऱ्यांचा शिवाजी
  दंगली होतात तेव्हा पुरुष म्हणतात, त्यांनी हिंदू मारला, त्यांनी मुस्लिम मारला, परंतु बाई म्हणते, माणूस मारला... हे मांडत महिला या खऱ्या अर्थाने निरपेक्ष असल्याचे भगत यांनी यावेळी मांडले. रयतेचा राजा शिवाजी महाराजांचे खरे काम लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी पाच वर्षे महाराजांच्या कार्याचा अभ्यास करून, जालन्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसोबत दोन वर्ष काम करून ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे नाटक उभे केल्याची प्रक्रिया त्यांनी मांडली.

  पुढील स्लाइडवर वाचा कोण आहेत संभाजी भगत?

 • divyamarathi Marathi letearetur Festival Live at Nashik

  कोण आहेत संभाजी भगत?
  - हातातल्या डफलीवरची एक थाप आणि रसिकांवर गारुड करणारी जोमदार हाक...
  - आपल्या शाहिरीने सामाजिक विसंगतींवर घाव करणारे लोकशाहीर संभाजी भगत.
  - विद्रोही कवी म्हणून गाजलेल्या भगतांचे नाव कोर्ट, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकांच्या रूपात मराठी मनावर बिंबले.
  - त्यांच्या ‘कोर्ट’ या चित्रपटाला राष्ट्रपतींच्या सुवर्णकमळाने सन्मानित करण्यात आले. तर, ‘शिवाजी
  अंडरग्राउंड’ची निवड दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या महोत्सवात झाली.
  - शाहिरी जलसा हे भगत यांचे वैशिष्य. ‘तोड ही चाकोरी’ या त्यांच्या गाण्यांनी अनेक कार्यकर्ते आणि तरुणांमध्ये चेतना निर्माण केली. उंदीर, गिरणीचा वग ही त्यांची वगनाट्ये, ‘अडगळ’ हे नाटक तर ‘कातळाखालचे पाणी’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.
 • divyamarathi Marathi letearetur Festival Live at Nashik
  ‘‘माणूस मारला.. त्यांनी माणूस मारला...
  माझा हुसेन मारला, माझा किसन मारला..
  त्यांची हत्यार रक्ताची, फौज बांधली भक्तांची’’
  हे गीत लोकशाहीर संभाजी भगत यांनी सादर केले. ‘दिव्य मराठी’चे प्रशांत पवार यांनी त्यांना डफावर साथ दिली. प्रेक्षकांची दाद मिळाली.

Trending