आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहम्मद अली जिनांचे व्यक्तिमत्व समजून घेण्यासाठीच केले त्यांच्यावर लेखन - शीला रेड्डी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी जिनांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग लेखिका शीला रेड्डी यांनी प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवले. - Divya Marathi
दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी जिनांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग लेखिका शीला रेड्डी यांनी प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवले.
नाशिक- मोहम्मद अली जिना हे पाकिस्तानचे निर्माते असले तरी खासगी आयुष्यात ते सुधारणावादी व आधुनिकवादी होते. त्यांचे खासगी आयुष्य व त्यांचे राजकारण हा माझ्या दृष्टीने उत्सुकतेचा होता. त्यात त्यांचे वयाने 24 वर्षे लहान पारशी मुलगी रुटी पेटीट हिच्याशी झालेला विवाह व त्यांच्यामधील हळुवार नाते मला भावुक करणारे वाटले त्यातूनच मी 'मिस्टर ॲंड मिसेस जिना - द मॅरेज दॅट शूक इंडिया' या पुस्तकाचे लेखन केले, अशी प्रतिक्रिया शीला रेड्डी यांनी दिली. 
 
दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिवलच्या दुस-या दिवशी जिनांच्या खासगी आयुष्यातील अनेक प्रसंग लेखिका शीला रेड्डी यांनी प्रेक्षकांपुढे उलगडून दाखवले. डॉ. अंजना तिवारी यांनी शीला यांना बोलते केले.
 
शीला रेड्डी म्हणाल्या, 42 वर्षाचे जिना आपल्यापेक्षा 24 वर्षांच्या लहान रुटी पेटिट हिच्या प्रेमात पडले. रुटीच्या सौंदर्यावर भाळून जिना तिच्याशी लग्न करण्याच्या दृष्टीने रुटीच्या वडिलांकडे गेले. पण आंतरधर्मीय लग्नाचा जिनांचा प्रस्ताव रुटीच्या वडिलांनी साफ धुडकावून लावला. पण जिना खचले नाहीत त्यांनी रुटीला घरातून पळवून नेले व तिच्याशी लग्न केले. या लग्नामुळे मुंबईतील पारशी व मुस्लीम समाजात त्यावेळी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पण जिनांनी आपल्या वकिली पेशाची, लोकप्रियतेची व राजकारणातील प्रतिमेची पर्वा केली नाही. त्यांनी हे नाते निभावून नेले. रुटीच्या अकाली निधनाने जिनांच्या आयुष्यात एकाकीपण आले व त्यांनी पाकिस्तान निर्मितीच्या राजकारणात स्वतःलाच समर्पित केले, असा आजपर्यंत माहित नसलेला एक ऐतिहासिक धागा शीला रेड्डी यांनी सांगितला. 

जिना व रुटी पेटीट यांच्या संबंधाचा शोध घेताना अनेक संदर्भ मिळवण्यात चार वर्षे गेली. हा शोध घेताना सरोजिनी नायडू व रुटी पेटिट यांची मैत्री व त्यांच्यामधील पत्रव्यवहार ( पेपर्स ऑफ पद्मजा नायडू ) पुस्तक लिहिण्यात कामी आला असे त्यांनी सांगितले. या परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ. अंजना तिवारी यांनी केले. 
 
बहिणीच्या शिक्षणासाठी होते आग्रही-
 
जिना आपली लहान बहिण फातिमा हिच्या शिक्षणासाठी आग्रही होते. मुलींना आधुनिक शिक्षण मिळावे याबाबत ते उदारमतवादी होते. त्याकाळातल्या मुस्लीम सनातन्यांचा विरोध त्यांनी मोडून फातिमाला काॅनव्हेंट शाळेत घातले व तिला डेंटीस्टही त्यांनी बनवले. पत्नी रुटी हिच्या वयाच्या 29 व्या वर्षी झालेल्या अकाली निधनाने जिना एकाकी पडले होते. त्या काळात ते फातिमाच्या ते खूप जवळ गेले.

बॉम्बे गर्वनरची पत्नी आणि जिना यांची जिद्द-
 
जिना व रुटी यांना एकदा बाॅम्बेचे गर्वनर विलिंग्डन यांनी भोजनासाठी बोलावले होते. त्यावेळी रुटी यांनी पारदर्शक साडी व ब्लाऊज असा वेष केला होता. या पारंपारिक वेषेला विलिंग्डन यांच्या पत्नीने नापसंती दर्शवली व रुटीला लपेटण्यासाठी जिना यांनी तिला शाल द्यावी असे त्यांनी नोकरांना सांगितले. या प्रसंगावर जिना यांनी तीव्र हरकत घेतली. तसेच विलिंग्डन जोपर्यंत मुंबईचे गर्वनर असतील तोपर्यंत त्यांच्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमाला आपण हजर राहणार नाही असे त्यांनी जाहीर केले. हा निश्चय त्यांनी विलिंग्डन यांची मुंबईतील बदली होईपर्यंत पाळला.
बातम्या आणखी आहेत...