आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dnyaneshwar Wagh Article About Raj Thackary And Nitin Gadkari, Divya Marathi

'तुझ्यावाचून करमेना...' राजच्‍या गळाला लागले गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकमध्ये हाती सत्ता येऊनही गेल्या दोन वर्षांत राज आणि त्यांच्या शिलेदारांना एकही ठोस असे काम उभे करता न आल्याने या कालावधीत राज ठाकरे हे काहीसे राजकारणातील पडद्याआड गेले होते. त्यामुळे नेमकी वेळ ते शोधत होते. ही अचूक वेळ येताच त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या चर्चेत असलेल्या मोदींविषयीच आपल्या स्वभावाला साजेसा राग आळविला आणि राजकारणातील त्यांची ही मात्रा नेमकी लागू पडली. महापालिकेत भाजपबरोबर युती आणि गुजरातमध्ये मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचा पाहुणचार घेतल्यानंतरही राज यांनी मोदींवर केलेली टीका हे सर्व खरे तर त्यावेळी चर्चेचे गुर्‍हाळ ठरले होते. परंतु, हाती काहीच मुद्दा नसल्याने चर्चेत कसे राहिले पाहिजे, हे माहिती असलेल्या राज यांनी आपल्या मित्रपक्षालाच लक्ष्य केले. आपल्या नेत्यावरच हल्ला झाल्याने प्रदेशाध्यक्ष तथा आमदार देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या फतव्यानुसार स्थानिक भाजप नेत्यांनी मनसेबरोबरच्या युतीविषयी तत्काळ मार्गदर्शन मागवून झाल्या प्रकाराविषयी संताप व्यक्त केला होता. अर्थात, यामुळे मनसेला फारसा फरक पडला नाही. या सर्व प्रकाराला महिना-दीड महिना उलटत नाही तोच दोन्ही पक्षांचे नेते गोदाप्रवाहात एकत्र आल्याने स्थानिक नेत्यांनाही जमवून घ्यावे लागले. पक्षर्शेष्ठीच एका व्यासपीठावर म्हटल्यावर स्थानिकांना हे पडद्याआडचे राजकारण थोडेसे जड गेलेले असले तरी वरिष्ठांमुळे जुळवून घ्यावे लागल्याचे गोदापार्कच्य भूमिपूजनप्रसंगी पाहावयास मिळाले.


जानेवारी महिन्यात नाशिक दौर्‍यावर आलेले असताना आणि त्याअगोदरही मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राज यांनी नरेंद्र मोदींबाबत तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. भाजपकडून पंतप्रधानपदाची उमेदवारी घोषित होताच मोदींनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा होता. महाराष्ट्रातील सभांना होणार्‍या गर्दीवरून मोदी फॅक्टर ठरवता येत नाही, अशी बोचरी टीका करतानाच मुंबईतील सभेत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण मोदींना का झाली नाही, असा सवाल उपस्थित करत राज यांनी एकप्रकारे मोदींसह भाजपलाही आव्हानच देऊ केले होते.

उद्धवकडे मुंडे, राजकडे गडकरी
आगामी लोकसभा निवडणूक पाहता महायुतीतील नेतेमंडळी एकमेकांना शह-काटशह देऊ पाहत आहे. गोपीनाथ मुंडे आणि गडकरी यांचे राजकारणातील वैर सर्वांनाच ठाऊक आहे. याचे प्रत्यंतर गोदापार्कवर अनुभवयास मिळाले. राज यांचे गुणगान गात असताना गडकरींनी उध्दव ठाकरे यांच्याविषयी मात्र चकार शब्दही तोंडून बाहेर पडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. त्याला कारणही तसेच आहे. मुंडे हे उद्धव ठाकरेंना राजकीय व्यासपीठावर गोंजारत असल्याने त्याला पूरक म्हणून गडकरींही राज यांना जवळ करताना दिसून आले.

गोदापार्कवर स्तुतिसुमनांचा वर्षाव
महापालिकेतील एकूणच कारभार पाहिला तर अगदी प्रथमपासूनच भाजप आणि मनसेमध्ये नेहमीच दुरावा पाहायला मिळालेला आहे. त्यात मोदी यांच्यावर राज ठाकरेंनी केलेल्या आरोपाने भर टाकली. यामुळे या दोन्ही पक्षांची मैत्री फार काळ टिकणार नाही, असे चित्र निर्माण झाल्याने दोन्ही पक्षांचे नेतेही एकमेकांपासून दुरावले गेले होते. मात्र, शिवसेना-भाजप युतीपासून असलेल्या मैत्रीच्या ओढीने राज आणि नितीन गडकरी हे दोघेजण गोदावरी नदीकिनारी उभारल्या जाणार्‍या गोदापार्कच्या निमित्ताने एकत्र आले. याप्रसंगी दोघे नेते एकमेकांवर किंवा एकूणच राजकीय परिस्थितीवर टोलेबाजी करतील, अशी उपस्थितांना आशा होती. मात्र, दोघांनीही आपापल्या छोटेखानी भाषणात गोदावरीच्या साक्षीने एकमेकांवर स्तुतिसुमने उधळत आपली मैत्री अतूट असल्याचे दाखवून दिले. याच मैत्रीतून दोन वर्षांपूर्वी नाशिकमध्ये एक आगळीवेगळी युती भाजप-मनसेच्या रूपाने पाहावयास मिळाली. एकूणच हा प्रकार पाहून दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते साहेब हे साहेबच असतात आपण फक्त हुकूम मानायचा, अशा नजरेने एकमेकांकडे बघत होते. राज यांच्या संकल्पनेतील प्रकल्प नागपुरलाही साकारता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गडकरींनी सांगत राज यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. राजकीय इच्छाशक्ती मजबूत असेल तर कोणतेही काम अवघड नाही, हे राज यांनी दाखवून दिल्याचे गडकरी म्हणाले, तर राज यांनीही मुंबईत झालेल्या बड्या-बड्या प्रकल्पांमध्ये गडकरी यांचा सहभाग कसा आहे, हे सांगत महायुतीनंतरही भाजप-मनसे युती घट्ट आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

‘तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना,’ अशी काहीशी अवस्था महापालिकेतील मनसे आणि भाजपची झाली आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींविषयी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात टीका केल्याने भाजपमध्ये स्थानिक नेत्यांपासून तर पक्षर्शेष्ठींपर्यंत नाराजी पसरली होती. यामुळे भाजपने तर थेट मनसेबरोबर काडीमोड घेण्याचाच निर्णय घेतला होता. अर्थात, राजकारणात अशा स्थितीत जे घडायचे असते तेच झाले. म्हणजे दोन्ही पक्षांचे नेते झाले गेले विसरून पुन्हा एकाच व्यासपीठावर राज ठाकरे आणि नितीन गडकरींच्या रूपाने एकत्र आले. यामुळे एक झाले की रुसव्या-फुगव्याने दूर गेलेल्या नेत्यांच्या गालावरची कळी पुन्हा एकदा खुलली.