आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात एकाही सरकारी रुग्णालयात नवजात बालकांसाठी व्हेंटिलेटरच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालक कक्षात (एनअायसीयू) बालकांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी आवश्यक जीवनरक्षक प्रणाली म्हणजेच व्हेंटिलेटरचा एकही संच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांना विचारणा केली असता त्यांनी व्हेंटिलेटरचा वापर करता येणारे तज्ञ डॉक्टरच आमच्याकडे नाही, ते उपलब्ध होण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले.
 
ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे गोरखपूरमधील ३० बालकांना जीव गमावावा लागला होता. त्यानंतर फरुखाबाद रुग्णालयातील ४९ बालमृत्यूंचीही घटना ताजी असताना महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांतील ही उदासिनता सुन्न करणारी आहे.  नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात नवजात बालक विशेष शुश्रूषा केंद्र ( स्पेशल न्यू बॉर्न बेबी केअर युनिट- एसएनसीयू) आहे. तीस दिवसांच्या आतील बालकांसाठी हा कक्ष आहे. मात्र, तेथे व्हेंटिलेटरचा एकही संच नाही. बाळाची प्रकृती ढासळली, तर त्याला सर्रास खासगी रुग्णालयात तत्काळ दाखल करण्याचा सल्ला देऊन वैद्यकीय अधिकारी मोकळे होतात. 

आरोग्य सुविधेअभावी २,८११ बालमृत्यू
यंदा मार्चअखेपर्यंत योग्य औषधोपचारांअभावी राज्यातील शासकीय रुग्णालयांत २,८११ बालमृत्यू झाले असून त्यातील १७०१ बालके एक वर्षांच्या आतील असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद आहे. यामध्ये पालघरमध्ये ५५७, नाशिक- ३४७, नंदुरबार- ४९६, अमरावती- ३८० तर धुळ्यात १४७ बालमृत्यूंची नोंद झाली आहे.

व्हेंटिलेटर वापरण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर नाहीत
राज्यात गंभीर प्रकृती असलेल्या नवजात बालकांसाठी जिल्हा रुग्णालयांत व्हेंटिलेटर नाहीत. ही यंत्रणा वापरण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर्स सध्या आमच्याकडे नाहीत. या अडचणीबाबत आरोग्य मंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला असून लवकरच त्यावर कार्यवाही होईल.
- डॉ. सतीश पवार, आरोग्य संचालक
बातम्या आणखी आहेत...