आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Strike Effect On City People In Nashik District

संपामुळे रुग्णांच्या हालअपेष्टात भर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - ग्रामसेवक संघटनेने पुकारलेल्या संपामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना तीन दिवसांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. ग्रामसेवकांच्या संपामुळे तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणींत भर पडली आहे. दुसरीकडे वैद्यकीय अधिका-यांच्या सुरू असलेल्या संपामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी आणि शिकाऊ डॉक्टरांची तात्पुरती व्यवस्था करून आरोग्य विभागाने रुग्णांच्या जखमेवर मलमपट्टी सुरू ठेवली आहे.

तालुक्यात 114 ग्रामपंचायती असून, त्यापैकी 20 गावांचा भार कंत्राटी ग्रामसेवकांच्या माथी आहे. कंत्राटी ग्रामसेवकांना संपात सहभागी होता येत नसल्याने अशा गावांचे कामकाज सुरळीत सुरू आहे. उर्वरित 94 गावांमध्ये मात्र गेल्या तीन दिवसांपासून कामकाज ठप्प झाले आहे. संपामुळे ग्रामसेवक नियुक्तीच्या ठिकाणी फिरकत नसल्याने त्या-त्या गावातील विकासकामे रखडली असून, नागरिकांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचे चित्र आहे. ग्रामसेवक नसल्याने कर्मचारीही फिरकत नसल्याने बहुतेक गावांतील ग्रामपंचायतींना टाळे लागले आहे. त्यामुळे शैक्षणिक दाखले आणि अन्य कामांसाठी ग्रामपंचायतीत येणा-या रहिवाशांना काम न होताच माघारी परतावे लागत आहे. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संपासंदर्भात कुठलाही तोडगा निघत नसल्याने हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनने घेतला आहे. 4 आणि 5 जुलै रोजी मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले असून, तालुक्यातील 42 ग्रामसेवक त्यात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिका-यांनी दिली.

शिकाऊ डॉक्टरांवर भरवसा
तालुक्यात सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. त्र्यंबके आणि देवपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी पी. एस. राजगुरू या दोघांचा अपवाद वगळता उर्वरित कायम सेवेत असणारे सर्व वैद्यकीय अधिकारी संघटनेने पुकारलेल्या संपात सहभागी झाले आहेत. नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पर्यायी डॉक्टरांची व्यवस्था करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करणा-या रुग्ण कल्याण समितीच्या कंत्राटी डॉक्टरांची प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आली आहे. थंडी-तापाचे रुग्ण वगळता गंभीर रुग्णांवर उपचार करण्याची रिस्क कंत्राटी डॉक्टर घेत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. साहजिकच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांच्या खिशाला झळ सोसावी लागत आहे. पर्यायी डॉक्टरांकडून केली जाणारी मलमपट्टी पुरेशी नसल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.

पर्यायी व्यवस्था
- नागरी आरोग्याच्या बाबतीत योग्य काळजी घेतली आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संपावर असले तरी पर्यायी डॉक्टरांची सर्व ठिकाणी व्यवस्था केल्याने रुग्णांची हेळसांड किंवा गैरसोय झाल्याच्या कुठल्याही तक्रारी नाहीत.
डॉ. आर. आर. त्र्यंबके, तालुका वैद्यकीय अधिकारी
आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा
- नागरिकांना वेठीस धरण्याचा संघटनेचा हेतू नाही. यापूर्वीच्या आंदोलनात जीवनावश्यक सेवा ग्रामसेवकांकडून दिल्या जात होत्या. वारंवार आंदोलने करूनही त्याची दखल न घेतल्याने या वेळी सर्वच कामे बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. इतर शासकीय कर्मचा-यांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेणारे शासन ग्रामविकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांच्या रास्त मागण्यांविषयी उदासीन आहे. - संजय गिरी, तालुकाध्यक्ष, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन
नियंत्रण नसल्याने कामकाजाचा बोजवारा

- ग्रामसेवकांचे कार्यालयातील इतर कर्मचा-यांवर नियंत्रण असल्यामुळे कामात सुसूत्रता असते. परंतु, गेल्या तीन दिवसांपासून ग्रामसेवक कामावर नसल्याने इतर कर्मचा-यांच्या कामात कमालीची शिथिलता आली असून, नियोजन विस्कळित झाले आहे. त्यामुळे मूलभूत सुविधा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. -तुकाराम सांगळे, सरपंच, माळेगाव ग्रामपंचायत

या कामांना लागला ब्रेक
सध्या शैक्षणिक प्रवेश सुरू असल्याने विद्यार्थ्यांना रहिवासी दाखला आवश्यक आहे. मात्र, ग्रामसेवकच गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रवेश रखडण्याची चिन्हे आहेत. याशिवाय, पाणी, स्वच्छता या मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. ग्रामसेवकांअभावी ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशांना 8 नंबरचे उतारे मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. टंचाईमुळे टँकर मागणीचे प्रस्ताव ग्रामपंचायत स्तराहून पंचायत समितीस तातडीने सादर होणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामसेवकांअभावी बहुतेक गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव रखडले असून, त्यामुळे नागरिकांना कृत्रिम टंचाईस सामोरे जावे लागत आहे.