आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेशालिस्टविना ‘सेवा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांनी बुधवारपासून संप पुकारल्याने रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत असूनही डॉक्टर पुन्हा रुजू होतील, अशा अपेक्षेने रुग्णालयात दिवस कंठणे किंवा गावी परतणे, असे दोन पर्याय या रुग्णांपुढे उरले आहेत.

या रुग्णालयात नाशिकसह जळगाव, धुळे , नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांतील हजारो रुग्ण दाखल होतात. रुग्णालयात कॅन्सर, हृदयरोग आणि युरोलॉजीशी निगडित सर्वोच्च र्शेणीतील उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. अन्य कोणत्याही शासकीय रुग्णालयात होऊ न शकणार्‍या शस्त्रक्रिया येथे होत असल्याने विभागातून दाखल झालेल्या रुग्णांना या संपाचा फटका बसू लागला आहे. कुणाच्या शस्त्रक्रियाच पुढे ढकलल्या गेल्या, तर काहींच्या शस्त्रक्रियांसाठीची तारीखच दोन दिवसांपासून देण्यात आली नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.

पगारवाढीसाठी संप : रुग्णालयातील बीएएमएस, एमबीबीएस डॉक्टर्स आणि एमडी, एमएस झालेले तज्ज्ञ डॉक्टर्स यांच्या पगारात फरक नव्हता. तज्ज्ञ डॉक्टर म्हणून सेवा बजावूनही पगारात अपेक्षित वाढ मिळवून देण्याबाबत आरोग्य विभागाशी सातत्याने पत्रव्यवहार करूनही निर्णय घेण्यात चालढकल केली जात असल्याच्या निषेधार्थ या तज्ज्ञ डॉक्टरांनी संप पुकारला. अर्थात, या तज्ज्ञ डॉक्टरांची स्वतंत्र संघटना नसल्याने संप करतानाही त्याला संपाऐवजी वैयक्तिक रजेचे स्वरूप देण्यात आले आहे.

रुग्णालयातील कंत्राटी कामगारांवरही अन्याय
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात कार्यरत शंभरहून अधिक कंत्राटी कामगारांवरदेखील अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याची भावना येथील काही कंत्राटी कामगारांनी नावे जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितली.

एका राजकीय पक्षाच्या नेत्याकडे या कामगारांचे कंत्राट असून कंत्राटदाराकडील कामगारांबाबत कोणतेही कामगार कायदे पाळले जात नसल्याची तक्रार या कामगारांनी केली आहे. सध्या सुमारे 110 कामगार येथे कंत्राटावर काम करीत आहेत. त्यांचा भविष्यनिर्वाह निधी तसेच इएसआयसीदेखील कपात होत नसल्याचेही कामगारांनी नमूद केले. काही कामगारांनी युनियन करण्याचा प्रयत्न केला म्हणून या कंत्राटदाराने तेथील कामगारांना कामावरुन काढून टाकल्याने कामगार त्याविरोधात बोलूच शकत नसल्याचेही त्यांनी सांगितले. स्वच्छतासेवकांना 4700 तर शिपाई आणि वॉर्डबॉयला अवघे 5200 रुपये वेतन दिले जात आहे. दरम्यान अन्य काही कामगारांमध्येही कपात करण्यात आल्याने रुग्णांना दिले जाणारे जेवणदेखील एकदाच सकाळी बनवून तेच दोनवेळा दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.