आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दात्यांची भरभरून मदत; तुषारवर शस्त्रक्रियेचा मार्ग सुकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक/नगर- मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या तुषार कासार या चिमुकल्याच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाच्या सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू असल्याने त्याच्यावर उपचाराचा मार्ग सुकर होत आहे. नाशिकच्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक मधुकर जाधव व नंदू जाधव यांनी सोमवारी त्याला 51 हजार रुपयांचा धनादेश दिला.
मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रासलेल्या सात वर्षांच्या तुषारवर शस्त्रक्रिया करण्याचे आव्हान अहमदाबाद येथील डॉक्टरांनी स्वीकारले असून हॉस्पिटलच्या बिलापैकी फक्त 25 टक्के रक्कम स्वीकारण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. शस्त्रक्रियेसाठी 4 लाख 50 हजार रुपयांचा खर्च असल्याने तुषारचे आईवडील हतबल झाले होते. मात्र ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रसिद्ध करून शस्त्रक्रियेसाठी मदत करण्याचे आवाहन समाजातील दानशूरांना केले होते. त्यासाठी त्याच्या बॅँकेचा खाते क्रमांक प्रसिद्ध केला होता. तेव्हापासून तुषारच्या खात्यात सुमारे तीन लाख रुपयांची मदत दानशूरांनी केली होती. चुंचाळे येथील मनसेचे पदाधिकारी निवृत्ती इंगोले यांनी 11 हजार, सातपूर पत्रकार संघाच्या वतीने 2100 रुपये, दत्ता शेंद्रे यांच्या वतीने 2 हजार रुपये,अयोध्या रिअल इस्टेटच्या वतीने 1100 रुपये, अर्जुन दामोदर व मंदाबाई मेदगे यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयांची मदत करण्यात आली.
खाऊच्या पैशातून मदत
धुळ्याच्या नॉर्थ पॉइंट स्कूलमधील हर्षवर्धन व अभिषेक शिंदे या बहिण- भावांनी खाऊसाठी जमवलेले पैसे तुषारला मदतीसाठी पाठवले आहेत. वर्षभरात या दोघांनी आपल्या पिगी बॅँकेत दोन हजार रुपये साचवले होते.यातून नवे कपडे घेण्याचा त्यांचा मानस होता. मात्र या दोघांनीही आता तुषारला मदत करण्याचे ठरविले आहे.
शिक्षकांनी दिले 25 हजार
नगर तालुक्यातील बु-हाणनगर केंद्रातील प्राथमिक शिक्षकांनी तुषारच्या शस्त्रक्रियेसाठी 25 हजार रुपयांची आर्थिक मदत सोमवारी दुपारी ‘दिव्य मराठी’कडे सुपूर्द केली. केंद्रप्रमुख तुकाराम कातोरे, दीपक सूर्यभान पंडित, अनिल मारुती मुळे, नंदू लोणकर, इम्रान शेख, अफसाना सय्यद, डॉ. संदीप गुगळे, दत्तात्रय भगवान गुगळे, उज्ज्वला घावटे, संगीता भुजबळ, सुनीता झावरे, संध्या शिंदे, वनीता चिल्का, चंद्रभान रूपनर, जि. प. शाळा शिवाजीनगर, सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब भोपे यांनीही मदत दिली आहे. टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) विद्यालयात प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनी तुषारला दोन हजार रुपये दिली आहेत.
बु-हाणनगर केंद्रातील जानकी कवडे प्रशालेतील प्राथमिक शिक्षक दिपक पंडित लवकरच विवाहबद्ध होत आहेत. आपल्या लग्नात प्रथेप्रमाणे ते पाहुण्यांचा सत्कार करणार होते. परंतु, त्याला फाटा देत आता पंडित यांनी 3 हजार रुपयांची मदत तुषारला देण्याचा निर्णय घेतला आहे.