आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Double Demurrage FromTransportation Department Contractor

वाहतूक विभाग ठेकेदारामुळे दुहेरी भुर्दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वाहतूक ठेकेदाराकडून वाहने उचलताना काळजी घेतली जात नसल्याने सर्वसामान्य वाहनधारकांच्या वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहनचालकांकडून दंड वसूल केला जातो. मात्र, नुकसान झाल्यानंतर वाहतूक विभाग ठेकेदाराकडून हात वर केले जात असल्याने वाहनचालकांना दुहेरी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वेळीच लक्ष देणे गरजेच आहे.
शहराची बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिस आयुक्तांनी चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग अाणि दुचाकी उचलण्यासाठी टेम्पोद्वारे कारवाई सुरू केली. वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या अटीवर ठेकेदाराला वाहने उचलण्याचा ठेका देण्यात आला. मात्र, काही दिवसांतच संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून नागरिकांवर दादागिरी सुरू झाली. राजीव गांधीभवन समोर एक चारचाकी वाहन उचलताना तिचे नुकसान झाल्यावरून मोठा वाद निर्माण झाला. अखेर टोइंगची कारवाई बंद करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला. मात्र, दुचाकी उचलण्याची कारवाई सुरूच ठेवण्यात आली. या ठेकेदाराकडूनदेखील दुचाकी उचलताना काळजी घेतली जात नसल्याने वाहनांचे नुकसान होत. दंड भरूनदेखील वाहनाच्या नुकसानीबाबत काहीच मोबदला दिला जात नसल्याने ही कारवाई नागरिकांच्या मुळावर उठली आहे. एका वकिलाच्या वाहनाचे नुकसान झाल्यानंतर वाहतूक पोलिसाने अरेरावी करीत वकिलास धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. मात्र, दिवसभरात असे बरेच प्रकार घडतात. या घटना टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पोलिस कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. वाहतूक पोलिस आणि ठेकेदारांचे ‘आर्थिक’ साटेलोटे असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे. ही पठाणी कारवाई तत्काळ बंद करण्याची मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांकडून अनेकदा अरेरावी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. वाहने उचलताना बहुतांश वाहनांचे नुकसान होते. काही चालकांकडून याबाबत जाब विचारला जातो. मात्र, पोलिस ठेकेदाराकडून दबंगगिरी करून त्या चालकाची बोळवण केली जाते. दंड भरूनदेखील वाहने सोडली जात नसल्याने ही कारवाई ठेकेदार आणि त्या वाहनावरील पोलिस कर्मचाऱ्याला पोसण्यासाठी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे.