आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशवंतरावांचा राज्य उभारणीत मोठा वाटा - डॉ. सदानंद मोरे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र हा स्वाभिमानी साधुत्वावर आधारित असलेल्या चालत्याबोलत्या समाजाचे प्रतिक व्हावा, असे स्वप्न यशवंतराव चव्हाण यांनी पाहिले आणि याच दिशेने त्यांनी राजकीय प्रवास केला. आजच्या महाराष्ट्राची धोरणात्मक रचना ठरवण्यात व राज्याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

केटीएचएमच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन विभागातर्फे सोमवारपासून रावसाहेब थोरात सभागृहात कै. डॉ. वसंत पवार व्याख्यानमाला सुरू झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वनाधिपती विनायकदादा पाटील होते. मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, वृत्तपत्रविद्या विभागप्रमुख प्रा. प्राची पिसोळकर आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी डॉ. मोरे यांनी ‘यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र’ या विषयावर विचार मांडले. यशवंतरावांचा महाराष्ट्राच्या उभारणीत मोठा वाटा आहे, कारण मराठी संस्कृतीशी ते जोडले गेलेले होते. तमाशा, भजनं, नाटकं आणि कुस्ती या सार्‍या मराठी संस्कृतीच्या प्रतिकांची त्यांनी जवळून अनुभूती घेतली होती. शौर्याचे मूर्तिमंत प्रतिक छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक न्यायाचे प्रतिक महात्मा ज्योतिबा फुले, संतांच्या प्रवाहाचे प्रतिक संत ज्ञानेश्वर आणि सर्वसामान्यांची दु:ख कवेत घेणार्‍या प्रवाहाचे प्रतिक लोकमान्य टिळक हे यशवंतरावांनी आदर्श मानले व त्यानुरूप महाराष्ट्र घडवला. या सार्‍यांमधून यशवंतरावांची सांस्कृतिक दृष्टीदेखील दिसून येते. गांधीचे विचार त्यांनी मानले, परंतु नेहरूंना यशवंतरावांनी आदर्श मानले होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अशोक सोनवणे यांनी केले. व्याख्यानमालेच्या दुसर्‍या दिवशी, मंगळवारी वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे ‘यशवंतरावांचे शब्दप्रेम’ या विषयावर व्याख्याने होईल.

टीकेला दिले थेट उत्तर

1978 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप झाला. टीकेला त्यांनी थेट उत्तर दिले. महाराष्ट्राच्या उभारणीनंतर अनेक राजकीय घडामोडी झाल्या. मात्र आजतागायत महाराष्ट्राच्या मूलभूत रचनेला धक्का पोचलेला नाही यातच यशवंतरावांचे यश आहे असे डॉ. मोरेंनी सांगितले.