आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात केलेल्या 537 भाषणांमधून त्यांच्या जीवनाचे सारच उमगत जाते. जाती-वर्गविरहित समाज घडवणे हाच डॉ. आंबेडकरांचा ध्यास होता, हेही त्यातून लक्षात येते, असे प्रतिपादन प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नाशिक केंद्रातर्फे चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बाबासाहेबांची मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजरातीतील 537 भाषणे संकलित करून त्यांचे तीन खंड ‘बोल महामानवाचे’ या नावाने प्रकाशित केली असून दोन महिन्यांत त्याच्या चार आवृत्ती प्रकाशित झाल्याचे त्यांनी सांगितले.
बाबासाहेबांना आत्मचरित्र लिहायचे होते. मात्र, कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळेच त्यांनी जीवनाच्या विविध अंगांवर केलेली ही भाषणे म्हणजे एक अनमोल ठेवा आहे. रक्तपाताशिवाय सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडविते तीच खरी लोकशाही असा विचार त्यांना अपेक्षित होता. समाजाची अधोगती ही अज्ञान आणि अहंकारामुळे होत असल्याने हे अवगुण दूर करणे अत्यावश्यक असल्याचेही बाबासाहेबांनी भाषणांमधून सांगितले होते. डॉ. आंबेडकर समकालीनांच्या कित्येक दशके पुढे होते. त्यामुळेच त्यांचे विचार तत्कालीन समाजातील अनेक तथाकथित नेत्यांनाही रुचणारे नव्हते. मला याच जन्मी मोक्ष म्हणजे माणुसकी हवी आहे, हे त्यांचे तत्त्वज्ञान काळापेक्षा खूप पुढचे होते. बाबासाहेबांनी एकहाती केलेल्या संविधानामुळेच देशाची शकले होऊ शकली नसल्याचेही डॉ. जाधव यांनी नमूद केले.
विश्वास ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. विजय सूर्यवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. व्यासपीठावर डॉ. कैलास कमोद, अँड. विलास लोणारी आदी मान्यवर होते.
बाबासाहेबांचे तीन गुरू अन् तीन दैवते
बुद्ध, कबीर आणि फुले हे तीन गुरू आणि विद्या, स्वाभिमान व शील ही तीन दैवते असल्याचे बाबासाहेब म्हणतात.गौतम बुद्धांनी जिथे त्यांच्या जीवनातील पहिले भाषण दिले, त्या सारनाथमध्येच बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनातील अखेरचे भाषण दिल्यामुळे एक प्रकारे धम्मपरिवर्तनाचे चक्रच पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.