आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुप्रशासनाचा अभाव विकासाला घातक - डॉ. विजय भटकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - चीन किंवा अन्य प्रगत राष्ट्रांप्रमाणे झटकन निर्णय घेण्याबाबतची क्षमता आणि सुप्रशासनाचा अभाव आपल्याकडे आहे. त्यामुळे त्या राष्ट्रांप्रमाणे विकासाचा वेग आपल्याला गाठता येत नसल्याचे प्रतिपादन भारताच्या परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी सोमवारी येथे केले.

नाशिकमधील एका सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. चीनमध्ये किंवा अमेरिकेत कोणताही निर्णय वरिष्ठ स्तरावरून झटपट घेऊन एकदा निर्णय झाल्यानंतर त्यावर ठाम राहिले जाते. त्यामुळे त्यांच्या प्रगतीचा वेग अधिक आहे. मात्र, त्यावर तोडगा म्हणून आपल्याकडेही हुकूमशाही लोकप्रणाली यावी, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. एकतर त्यासाठी संपूर्ण घटनाच बदलावी लागेल आणि ते करण्यासाठी जी किंमत आपल्याला मोजावी लागते त्यासाठी आपली मानसिक तयारी आहे का?

सर्व प्रकारची प्रगती साधल्यावर अखेरीस प्रत्येकाला स्वातंत्र्य हवे असते. त्यामुळे तेच गमावणे आपल्याला परवडणार नाही. विकासाच्या पुढच्या टप्प्यावर जाण्यासाठी संशोधनावर अधिक भर देण्याची गरज असून, त्याची प्रक्रिया शालेय अभ्यासक्रमातूनच व्हायला हवी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

टॅबलेट्समुळे दरी होणार कमी : टॅबलेट्स आणि आयपॅड्सची अत्यल्प किमतीमधील उपलब्धता ही नजीकच्या काळातील खूप मोठी उपलब्धी आहे. टॅबलेट्स, स्मार्टफोन आणि आकाशसारख्या आयपॅड्समुळे शहरी आणि ग्रामीण भागातील शिक्षणाची दरी कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भविष्यात एका भाषेचे ऑटोमॅटिकली संपूर्ण भाषांतर अवघड असले तरी केवळ काही तांत्रिक अंगांपुरते ते शक्य असल्याचेही डॉ. भटकर यांनी नमूद केले.

रामायण, महाभारतातही आकडेविषयक संज्ञा : 500 ट्रिलीयन अर्थात पाच लाख अब्ज गणिती प्रक्रिया एका सेकंदाला सोडविणारा संगणक निर्माण झाल्यावर अन्य देशांमध्ये त्या आकड्याला व्यक्त करू शकणारे शब्द शोधले गेले. मात्र, रामायण-महाभारतासारख्या आपल्या धर्मग्रंथांमध्येदेखील त्या काळी इतक्या मोठय़ा आकड्यांची गणना करू शकणार्‍या संज्ञा वापरल्या गेल्या आहेत. त्या काळात त्यांना इतक्या मोठय़ा आकड्यांसाठीच्या संज्ञा का लागल्या? त्याचा विचार त्यांनी कसा केला? हे एक कोडेच असल्याचे डॉ. भटकर यांनी शेवटी सांगितले.