आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Babasaheb Ambedkar Birth Anniversary Celebration In Nashik Bar Council

हिंदू कोड बिलाद्वारे महिलांना समान हक्क - न्या. थूल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिलाद्वारे घरातील महिलांना, कन्यांना, विधवा, सुनांना संपत्तीमध्ये समान अधिकारासह अन्य अनेक हक्कांमध्ये पुरुषांइतकेच अधिकार मिळवून दिल्याचे अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी. एम. थूल यांनी सांगितले.
आयएमए सभागृहात नाशिक बार असोसिएशनच्या वकील विचार मंचतर्फे आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. या बिलाद्वारे मुलांप्रमाणेच मुलींचादेखील त्यांच्या वडिलांच्या संपत्तीवर समान अधिकार मिळाले. सर्वच बाबतीत हिंदू पुरुषांइतकेच अधिकार महिलांनादेखील देण्याची तरतूद या बिलाद्वारे करण्यात आली आहे. त्याआधीच्या काळात हिंदू महिलांना घटस्फोट मागण्याचा अधिकारदेखील नव्हता. तो हिंदू कोड बिलामुळेच महिलांना मिळाला, असे त्यांनी सांगितले. दत्तक विधान कसे असावे, पुरुषांप्रमाणे महिलांना दत्तक घेण्याबाबतचा अधिकार या बिलाद्वारे मिळाला, असेही थूल यांनी नमूद केले. ब्रिटीश सरकारने कोणत्याही धर्माच्या चालीरितींमध्ये अनावश्यक बदल करण्याचे टाळले. त्यामुळे महिलांसाठी अन्यायकारक असलेले कायदे वर्षानुवर्षे तसेच होते. त्या अन्यायकारक कायद्यांना छेद देण्याचे कार्य हिंदू कोड विलाच्या माध्यमातून झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक संघटनेचे अध्यक्ष दिलीप वनारसे यांनी केले. यंदापासून केवळ एका व्याख्यानाऐवजी चार दिवसांची व्याख्यानमालाच आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. बाबासाहेब ननावरे, महेश आहेर, अ‍ॅड. बाळासाहेब आडके, अ‍ॅड. शरद गायधनी, अ‍ॅड. रवींद्र चंद्रमोरे, अ‍ॅड. हेमंत गायकवाड आणि अ‍ॅड. रेवती कोतवाल आदी उपस्थित होते.

दलित पँथरतर्फे निवेदन
दलितांवर झालेल्या अत्याचाराची दखल पोलिस व इतर विभागांचे अधिकारी घेत नाहीत. अनेकदा गुन्ह्याच्या प्रमाणात कमी शिक्षेची कलमे लावत एक प्रकारे गुन्हेगारांना साह्य करतात. त्यामुळे अशा अधिकार्‍यांच्या वार्षिक गोपनीय अहवालातच त्याबाबत नोंद करावी, अशी मागणी दलित पँथरतर्फे थूल यांना करण्यात आली. अन्यायग्रस्तांसाठी प्रत्येक विभागात हेल्पलाइन कार्यन्वित करावी. महात्मा गांधी गाव तंटामुक्त अंतर्गत दाखल गुन्ह्यांच्या पडताळणीसाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करावी. दलित महिलांवरील अत्याचाराचे खटले जलद न्यायालयात चालविण्याबाबत संबंधित न्यायालयास विनंती करावी. यासारख्या मागण्यांचे निवेदन सरचिटणीस भिराज जाधव, अध्यक्ष विलास काळे आदी कार्यकर्त्यांनी दिले.

छायाचित्र - खासदार समीर भुजबळ, सुनील बागुल, शरद कोशिरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले.