आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकत्व हे आव्हान नव्हेच- डॉ. आनंद नाडकर्णी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आपल्या घरात असलेले मूल हे आपल्या वयाचे नाही. मात्र, त्याच्या भावनांचा आपल्या भावनांप्रमाणेच आदर करण्याची गरज आहे. पालकत्व हे आव्हान नाही, आपली क्षमता आणि सहनशीलता वाढवण्यासाठीच निसर्गाने पालकत्वाची निर्मिती केली आहे, असे प्रतिपादन मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आनंद निकेतन आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ‘बदलत्या सामाजिक स्थितीत पालकत्वासमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. पालकांकडून आपल्या पाल्यांसंदर्भात येणार्‍या काही प्रातिनिधिक प्रश्नांची उत्तरे देताना ते म्हणाले, मुलांच्या वाढीच्या, विकासाच्या वयात निर्माण होणारे हे प्रश्न आहेत. एखाद्या समस्येचे स्वरूप अवास्तव वाढवू नका आणि त्या समस्येला क्षुल्लकदेखील ठरवू नका. कुठलाही तज्ज्ञ तुमच्या मुलाला तुमच्याएवढं ओळखू शकत नाही. तुम्ही स्वत: मुलांचे निरीक्षण करायला सुरुवात करा, मुलांचा मूड ओळखून त्यांना सांभाळून घेणारे आपणच असतो, हे लक्षात घ्या. लहान मुलं प्रत्येक गोष्ट शिकण्याच्या वयात असतात, त्यांचे गोंधळ वाढवण्यापेक्षा त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी उपस्थित पालकांना केले.
कार्यक्रमास आविष्कार शिक्षण संस्था संचलित आनंद निकेतन शाळेच्या संचालिका विनोदिनी काळगी, मुख्याध्यापिका दीपा पळशीकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. सुखदा चिमोटे, शोभना भिडे यांच्यासह पालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संवाद अत्यंत महत्त्वाचा
हट्टीपणा सगळेच करतात, सगळ्या वयात करतात. चर्चेला राजी नसणं म्हणजे हट्ट असतो. वयाने मोठा असो किंवा छोटा, संवादापासून दूर गेला की हट्ट सुरू होतो. अशा वेळी समोरच्या व्यक्तीने आपले म्हणणे ऐकून घ्यावे, यासाठी काय करता येईल, दोघांमध्ये योग्यप्रकारे संवाद कसा साधता येईल यासाठी पालकांकडून प्रयत्न व्हायला हवेत. कारण पालक आणि पाल्यांमध्ये संवाद हा अत्यंत महत्त्वाचा असतो.
भावनिक अभ्यास करा
डॉ. सुखदा चिमोटे यांनी डॉ. नाडकर्णींच्या उत्तराला पुष्टी देताना सांगितले की, पालकांनी मुलांचा भावनिक अभ्यास करणे गरजेचे आहे. आपल्याला चुकीच्या वाटणार्‍या गोष्टी या आपल्यासाठी चुकीच्या असतील, तर त्या पाल्यासाठी चुकीच्या असतीलच असे नसते. कदाचित मुलांसाठी त्या योग्यही असू शकतात, ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी.