नाशिक- व्यसनांच्या दृष्टचक्रात अडकून स्वत:च्या आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेल्या आणि जिद्दीने त्यातून वर आलेल्या माणसाचं प्रांजळ आत्मकथन असलेल्या लेखक तुषार नातू यांच्या ‘नशायात्रा’ या पुस्तकाचे शनिवारी सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘उत्सव समकालीन साहित्याचा’मध्ये अच्युत गोडबोले यांच्या हस्ते प्रकाशन झाले. याप्रसंगी वनाधिपती विनायकदादा पाटील, डॉ. अनिल अवचट, समकालीन साहित्य प्रकाशनाचे संचालक सुहास कुलकर्णी उपस्थित होते.
या वेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले की, स्वत:चे कुठलेही अनुभव लोकांसमोर मांडण्यासाठी धैर्य असावे लागते आणि हे अनुभव जर भयावह असतील, तर अधिक च आव्हानात्मक काम ठरते. असे कार्य लेखक तुषार नातू यांनी करून दाखविले आहे. त्यांच्या या पुस्तकामुळे व्यसनाधीन झालेल्या व्यक्तींच्या आयुष्यात नक्कीच सुधारणा होण्यास मदत होईल. यानंतर आपल्या पुस्तकाबद्दल मनोगत व्यक्त करताना तुषार नातू म्हणाले की, दारूचे व्यसन जडले की, डोक्यात फक्त दारूचेच विचार येतात आणि ती सोडण्याचा विचार केला की, मन द्विधा मनस्थितीत अडकते. याच दारूमुळे आपल्याला मानसिक व शारीरिक व्याधी जडतात. अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी ‘नशायात्रा’ हे पुस्तक चांगला पर्याय ठरू शकेल.