नाशिक - जिल्हा शासकीय रुग्णालयातील अवैध गर्भपात प्रकरणामुळे निलंबनापासून तर जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील मुक्कामापर्यंत कारवाईला सामाेरे जाणाऱ्या स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. वर्षा लहाडे यांनी स्वत:च्या खासगी रुग्णालयात ‘ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्टर’ हे सरकारी मालकीचे यंत्र ठेवून घेतल्याच्या अतिसंवेदनशील प्रकरणाबाबत अत्यंत धिम्म्या गतीने चाैकशी सुरू असून, हे प्रकरण ‘दिव्य मराठी’ने उघडकीस अाणल्यानंतर दाेन दिवसांत चाैकशी करून कारवाईची भाषा करणारे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश जगदाळे हेही अाता मवाळ झाल्याचे चित्र अाहे. गर्भपातप्रकरणी प्रथम सिव्हिलमधील उच्चपदस्थांनी ज्या पद्धतीने बचावात्मक भूमिका घेतली गेली, तसाही काहीसा पवित्रा अाताही असल्यामुळे प्रकरणाविषयी संशय वाढला अाहे.
एप्रिल महिन्यात ‘दिव्य मराठी’ने जिल्हा शासकीय रुग्णालयातच बेकायदेशीर गर्भपात हाेत असल्याचे प्रकरण उघडकीस अाणले. त्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली हाेती. एकीकडे खासगी रुग्णालयातील गर्भपाताची प्रकरणे सून्न करून साेडत असताना ‘बेटी बचाव’चा नारा देणाऱ्या नियंत्रकांच्या भूमिकेत असलेल्या जिल्हा रुग्णालयातच स्त्रीभ्रूणांना खुडण्याचे प्रकार हाेत असल्यामुळे दिव्याखालीच अंधारासारखी विचित्र परिस्थिती हाेती. या प्रकरणाची राज्य शासनाने गंभीर दखल घेत दाेनवेळा वेगवेगळ्या समितींमार्फत चाैकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर अाणले. सरकारी चाैकशीत डाॅ. लहाडे दाेषी ठरल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. सध्या ते मध्यवर्ती कारागृहात अाहे. सरकारी सेवेत असूनही डाॅ. लहाडे यांचा म्हसरूळमधील खासगी रुग्णालयाचा व्यवसाय कसा तेजीत हाेता त्याचेही कनेक्शन या प्रकरणात समाेर अाले हाेतेे. मात्र, एवढ्यावरच थांबता ‘दिव्य मराठी’ने खाेलात तपास केल्यानंतर सरकारी यंत्रेही सिव्हिलमधील डाॅक्टर खासगी सेवेसाठी कशा पद्धतीने वापरत हाेते हे डाॅ. लहाडे यांच्या ताब्यातील ब्रेस्ट कॅन्सर मशिनच्या प्रकरणातून उघडकीस अाणले. १६ मे राेजी ‘दिव्य मराठी’ने या प्रकारावर प्रकाश टाकला खरा, मात्र हे मशिन तत्पूर्वी मार्चपासून डाॅ. लहाडे यांच्याकडे हाेते. जिल्हा रुग्णालयातील किरकाेळ अाैषधांपासून तर माेठ्या यंत्रांपर्यंत प्रत्येकाची नाेंद स्टाॅक रजिस्टरमध्ये ठेवली जाते त्याच्या वापरावर बारकाईने लक्ष असताना डाॅ. लहाडे यांच्याकडील यंत्र ताब्यात घेणे अशा पद्धतीने खासगी सेवेसाठी यंत्र वापरू देण्याबाबत काेणाची मदत झाली याची उत्सुकता हाेती. हे प्रकरण प्रसिद्ध झाल्यानंतर डाॅ. जगदाळे यांनी चाैकशी समिती नेमून दाेन दिवसांत कारवाईचा अहवाल देण्याचे अादेश दिल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या कारवाईबाबत डाॅ. जगदाळे स्वत:च अनभिज्ञ अाहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता मध्यंतरी कामाच्या व्यापात कारवाईची माहिती घेणे शक्य झाले नसल्याचे सांगितले. प्रयाग हाॅस्पिटल सील असल्यामुळे यंत्र ताब्यात घेण्यात अडचण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, अशा पद्धतीने सरकारी यंत्रे खासगी प्रॅक्टिससाठी नेण्याबाबत काय कारवाई केली याबाबत विचारले असता त्यांनी पुन्हा तपासून कारवाई करू, असे ढाेबळ उत्तर दिले. त्यामुळे या प्रकरणात
सिव्हिलमधील उच्चपदस्थांच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाले अाहे.
समाजसेवी संस्थांच्या जीवावर खासगी धंदा
पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची जननी सुरक्षा याेजनेवर भर दिला असून, या याेजनेंतर्गत असंसर्गशील अाजारातील अत्यंत धाेकेदायक अशा स्तन कॅन्सरचा विळखा गर्भवती माता वा अन्य महिला रुग्णांना बसू नये, यासाठी ही तपासणी यंत्रे दिलेली हाेती. विशेष म्हणजे ही यंत्रे मुंबईत गणपती फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सामाजिक दायित्वापाेटी दिली असून, त्याचा मुख्य उद्देश गाेरगरीब रुग्णांना माेफत उपचार मिळावे हा हाेता. पालकमंत्री महाजन यांनी पाठपुरावा करून नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासाठी ही चार यंत्रे मिळवून दिली हाेती. साधारण लाख रुपये किमतीची ही चार यंत्रे असून, अन्य तीन यंत्रे सायंकाळी सिस्टरकडे चावी असल्यामुळे प्रत्यक्ष बघण्यासाठी उपलब्ध हाेऊ शकली नाहीत.
डाॅ. शिवाजी लहाडे यांना क्लीन चिट
डाॅ.वर्षा लहाडे यांचे पती डाॅ. शिवाजी लहाडे हे पेठ ग्रामीण रुग्णालयात अधीक्षकपदावर कार्यरत असून, त्यांची खासगी सेवा डाॅ. प्रयाग हाॅस्पिटलमध्ये सुरू असल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्यांच्या नावाची पाटी केबिनही हाेती. शासकीय सेवेत असतानाही खासगी वैद्यकीय काम करत असल्याचे निदर्शनात अाले हाेते. मात्र, यासंदर्भात काेणतेही पुरावे मिळाले नसल्याचे सिव्हिलकडून सांगण्यात अाले.