आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2030 मध्ये भारत असेल सर्वाधिक लोकसंख्येचा देश, डॉ. एस. के. पगार यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवळाली कॅम्प- मागील काही वर्षांत लोकसंख्येच्या आकडेवारीचा विचार केला तर भारतात मृत्यूदरात कमालीची घट झाली आहे. परिणामी भारत सन २०३० मध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होईल, असे प्रतिपादन डॉ. एस. के. पगार यांनी केले.
 
देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी (दि. ११) जागतिक लोकसंख्या दिन साजरा झाला. त्यावेळी व्याख्याते म्हणून डॉ. पगार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विजय मेधणे होते. तर व्यासपीठावर प्रा. सुनीता आडके, प्रा, विलास सैंदपाटील, प्रा. एस. एल. भोज आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. पगार पुढे म्हणाले की, भारताची लोकसंख्या वाढलेली दिसते. प्रत्यक्षात मात्र भारतामधील जन्मदर घटलेला दिसतो. त्याचे कारण म्हणजे भारत विकासाकडे वाटचाल करीत आहे. पूर्वी मुलांच्या जन्मावेळी असंख्य बालके दगावत असत. अाता मात्र भारतात पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. परिणामी, जन्मवेळी बालके दगावण्याचे प्रमाण घटले आहे.

त्याचप्रमाणे साथीच्या रोगाने बळी जाण्याच्या प्रमाणातदेखील घट झालेली दिसते. पूर्वीपेक्षा महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले अाहे. म्हणून कुटुंब नियोजनाकडे लक्ष वेधले जात आहे. एकीकडे जन्मदर घटत असला तरी भविष्यात म्हणजेच सन २०३० मध्ये भारत जगात सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली. प्राचार्य डॉ. मेधणे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येच्या दुष्परिणामांचा सर्वांनी विचार करायला हवा. भारतापेक्षा अमेरिकेचा भूभाग तिप्पट आहे. तेथील लोकसंख्या ३५ ते ४० कोटींच्या घरात आहे. मात्र, भारताची लोकसंख्या १२० कोटींच्या पुढे आहे. अमेरिका आणि युरोपमधील देश भारताच्या तुलनेत ७० वर्षे पुढे आहेत. त्यांच्या देशात ७० वर्षांपूर्वी लोकसंख्या नियंत्रणाकरिता उपाययोजना आखली जात होती. तर भारतात अलिकडच्या काही वर्षात लोकसंख्या नियंत्रणाकरिता प्रभावीपणे जनजागृती वाढलेली दिसते.

प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन प्रा. सुनीता आडके यांनी केले. तर प्रा. विलास सैदपाटील यांनी आभार मानले. श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात झालेल्या जागतिक लाेकसंख्या दिन कार्यक्रमात बाेलताना डाॅ. पगार. व्यासपीठावर मान्यवर.
बातम्या आणखी आहेत...