आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमेश्वरजवळील ड्रेनेज दुर्घटनेतील तिघांच्या मृत्यूने चटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गंगापूररोडवरील सोमेश्वरनजीक ड्रेनेजच्या चेंबरमध्ये उतरलेल्या मजुराला वाचविण्याच्या प्रयत्नात मजुरासह तिघांचा हृदयद्रावक मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत मृत्यू झालेले सुपरवायझर गोपी मोरे (35) हे त्यांच्या मित्रपरिवारात ह्यगोप्याह्ण म्हणून प्रसिध्द होते. माणूस कमी कलाकारच जास्त होता. लहानशा घरात कधी तक्रारीचा सूर नाही. सगळ्याच गोष्टी मनापासून करणारा तो सच्चा माणूस होता. ते गाणं खूप छान म्हणायचे.. समता आंदोलनाची चळवळीची गीत असो, किंवा लोकगीत.. ते सगळ्यांत तरबेज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

प्रयत्न केले, पण यश आले नाही
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी व शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक आरोटे यांनी सांगितले की, मी दुपारी ३.४५ वाजेच्या सुमारास रिक्षाने जात असताना चेंबरजवळ गर्दी दिसली. तेथे जाऊन बघितल्यानंतर दोन कर्मचारी चेंबरमध्ये पडलेले होते, तर त्यांना वाचविण्यासाठी तिसरा कर्मचारी जात होता. मी त्यास मज्जाव केला; मात्र मला माहिती आहे यांना कसे बाहेर काढायचे ते, असे सांगून तो चेंबरच्या आत उतरला. आम्ही बघत असतानाच त्यालाही चक्कर आली व काही क्षणातच तोही त्या दोघांवर जाऊन आदळला.आम्ही त्वरित अग्निशामक दलाला कळविले. आणि दोरीच्या साहाय्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या प्रयत्नांना यश आले नाही.तेवढ्यात अग्निशामक दलाचे जवान आले. त्यांनी तत्काळ जेसीबीच्या साहाय्याने पर्यायी खड्डा खोदण्यास सांगितले. सुमारे १५ फूट खोल खड्डा खोदल्यानंतर चेंबरमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांना जवानांनी पर्यायी खड्ड्यातूनच दोरी बांधून वर काढले; परंतु त्याचाही उपयोग झाला नाही. चेंबरमधील गॅसमुळे तिघांचाही अगोदरच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ठेकेदाराच्या माणसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर शववाहिकेतून एक-एक मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शववाहिका येईपर्यंत मृतदेहावर झाडाचा पाला टाकून झाकले होते.

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
सोमेश्वर येथे घडलेल्या घटनेस ठेकेदारासह महापालिका प्रशासनही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार असून, या प्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मी स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सीमा हिरे यांनी सांगितले. तसेच चेंबरचे काम करताना कर्मचाऱ्यांना साधनसामुग्री पुरविणे आवश्यक होते. मात्र, कोणतीही साधनसामुग्री नसल्यानेच हे काम करणाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. यासंदर्भात मी सभागृहात आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया नगरसेवक विलास शिंदे यांनी व्यक्त केली. घटनेचे वृत्त कळताच महापौर अशोक मुर्तडक, आमदार सीमा हिरे, सभागृह नेते शशिकांत जाधव, सहायक पोलिस आयुक्त वाडेकर, पोलिस निरीक्षक शंकरराव काळे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पर्यायी खड्डा खणला
कर्मचारी चेंबरमध्ये पडताच अग्निशामक दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, चेंबरची रुंदी कमी असल्याने त्यांना सिलिंडरसह चेंबरच्या आत उतरणे शक्यच नसल्याने पर्यायी खड्डा खोदण्यात आला. तोपर्यंत तिघांचाही आतमध्येच गुदमरून मृत्यू झाला होता. दीपक आरोटे, विभागप्रमुख, शिवसेना