आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drainage Water Mixes In River, People Ready For Protest

गटार गंगेत, तरी पालिका ढिम्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या रामकुंडावर भाविक मोठय़ा श्रद्धेने ज्या गोदावरीत पापक्षालन करतात, तेथून हाकेच्या अंतरावर तुंबलेल्या ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात मिसळत आहे. विशेष म्हणजे, तब्बल दोन आठवड्यांपासून ही गटार गंगेत जात असतानाही, महापालिका व लोकप्रतिनिधींनीही या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे. वारंवार तुंबणार्‍या या ड्रेनेजला वैतागून परिसरातील संतप्त नागरिक आंदोलनाच्या तयारीत आहेत.

अशोक स्तंभ ते रुंग्टा हायस्कूल या मुख्य रस्त्याच्या मध्यभागी ड्रेनेजचा ढापा आहे. हे ड्रेनेज तुंबल्याने गेल्या 15-20 दिवसांपासून त्यातून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सर्वत्र वाहत आहे. उतारामुळे हे पाणी पुढे थेट नदीकिनारी वसलेल्या सिद्धेश्वर व राम मंदिरापर्यंत जाते. सिद्धेश्वर मंदिरासमोर तर या पाण्याचे डबके साचले आहे, तसेच काही नागरिकांच्या घरासमोरही अशीच परिस्थिती आहे. या मार्गावरून जाणारे वाहनधारक, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा नगरसेवक व अधिकार्‍यांशी संपर्क साधूनही या प्रश्नाकडे डोळेझाक केली जात असल्याची तक्रार नागरिकांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली. वारंवार ड्रेनेज तुंबण्याचा हा प्रकार न थांबल्यास प्रशासनाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

भाविकांच्या श्रद्धेची थट्टा
मंदिरांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकला रामकुंडामुळेही अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी श्राद्ध व विविध धार्मिक विधींसाठी भाविक, तसेच देश-विदेशांतून पर्यटकांचाही ओघ असतो. काही भाविक गोदावरीचे पाणी तीर्थ म्हणून मोठय़ा श्रद्धेने सोबत घेऊन जातात. असे असताना या प्रश्नाकडे डोळेझाक करत प्रशासन एकप्रकारे भाविकांच्या र्शद्धेची थट्टाच करत असल्याचे दिसत आहे.

अधिकार्‍यांना आदेश देतो
मी बाहेर असल्याने ड्रेनेजबाबत कल्पना नाही. मात्र, लगेचच संबंधित अधिकार्‍यांना उपाययोजना करण्याचे आदेश देतो. अँड. यतिन वाघ, महापौर

ड्रेनेजची घाण रस्त्यावर
सकाळी आम्ही शुद्ध हवेसाठी बाहेर पडतो. मात्र, दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागतो. ड्रेनेजमधून आलेल्या घाणीचाही सामना करावा लागतो. डास वाढून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संजय महाले, नागरिक

तातडीने लक्ष द्यावे
विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रार केली. एकही अधिकारी येथे आला नाही. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष द्यावे. अश्विनकुमार येवला, शिक्षक, रुंग्टा हायस्कूल