आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नादावले नाशिककर.. वाढदिवसाचा असाही अनोखा योगायोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- डफाला दाद द्यावी की बोंगोवरील हुकमतीला, स्टीलच्या ताटलीतून काढल्या जाणार्‍या नादावर फिदा व्हावे की ड्रम्सवरील करामतीला, टाळ्यांचा गजर करावा की एकाच वेळी अनेक वाद्यांमधून साधल्या जाणार्‍या सिंफनीवर टाळ्यांचा कडकडाट करावा की शिट्यांचा पाऊस पाडावा अशी स्थिती नाशिककर रसिकांची रविवारी झाली होती. निमित्त होते एकाच वेळी दोन डझनहून अधिक वाद्यांतून मनाला स्तिमित करणारे नाद निर्माण करणार्‍या ड्रममास्टर शिवमणी यांच्या अफलातून सादरीकरणाचे.
‘दिव्य मराठी’ आणि व्हायोलिन अकादमीतर्फे होरायझन अकॅडमी येथे आयोजित स्वरझंकार कार्यक्रमाच्या उत्तरार्धात शिवमणी यांनी असे काही रंग भरले की, रसिकांकडून टाळ्यांना उसंत मिळत नव्हती. पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्याशी व्हायोलिनवर रंगलेली जुगलबंदी तर रसिकांसाठी एक यादगार पर्वणीच ठरली. शिवमणी यांनी त्यांच्या वादनाचा शुभारंभ मंदिरातील घंटेच्या आवाजाने करीत जणू त्यांच्या संगीतसाधनेसाठी देवाकडे आशीर्वादच मागितला. त्यानंतर शंखध्वनी, ओमकाराचा स्वर आणि ‘जा जा तोसे नही बोलू कन्हैया’ या सुरावटीवरील सादरीकरणाने कार्यक्रमात खर्‍या अर्थाने रंगत भरली.
झांज, कवड्या, शंख, घुंगरू, डमरू, डफ, सायकलची घंटी, प्रवासाची बॅग, शाळेचा तासाचा टोल, साधी जेवणाची स्टीलची ताटली अशा वस्तूंमधून नाद अशी कल्पनाही सामान्य व्यक्ती करू शकत नाही, त्या वाद्यांना तालात आणि सुरात आणणे ही करामत केवळ अन् केवळ शिवमणीच करू जाणे!
एकाहून एक सरस तालवाद्यांतून निघत जाणार्‍या प्रत्येक नादाने रसिक प्रेक्षकांना नादावले. पाण्याच्या रिकाम्या ड्रममधून गणेशोत्सवाच्या मिरवणुकीसदृश नाद काढतानाच तोंडातून निघणार्‍या ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर शिवमणींच्या एकमेवाद्वितीयतेची साक्ष पटवून देत होता. हाताने गालांवर मारत उघड्या तोंडातून निघणार्‍या आवाजांच्या सादरीकरणाला तर रसिकांनी अक्षरश: टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. मोठय़ा प्रवासी बॅगवर तबलजींसमवेत अनोखी जुगलबंदी सादर करीत ज्याच्या अंगी कला मुरलेली असते, तो कोणत्याही निर्जीव वस्तूलाही कसे बोलके करू शकतो, त्याचा प्रत्यय त्यांनी दिला. नंदन बिल्डकॉनच्या कोतकर यांनी शिवमणी यांचे, तर योगेश हिरे यांनी अतुलकुमार उपाध्ये यांचे स्वागत केले. तबलावादक मुकेश जाधव यांचे अँड. नितीन ठाकरे यांनी, तर अतुल रणिंगा यांचे प्रसाद सराफ यांनी स्वागत केले.
पुढील स्लाड्‍सवर पाहा, कलाकारांची जुगलबंदी...