आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..आणि आंबेडकरवादी चळवळ रसातळाला गेली; ‘भाई तुम्ही कुठे आहात?’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आंबेडकरवादी चळवळीत नेत्यांनी सामान्य कार्यकर्त्यांचा कसा वापर केला, सत्तेसाठी चळवळ कशी रसातळाला नेली, समाजपरिवर्तनाच्या नावाखाली इतर राजकीय नेते दलित नेत्यांना कसे वापरतात, याचे वास्तव दर्शन रसिकांना ‘भाई तुम्ही कुठे आहात?’ या नाटकातून मिळाले. त्रैमासिक ‘परिवर्तन जनता’ यांच्यातर्फे या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन केले होते. कालिदास कलामंदिरात झालेल्या या प्रयोगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दोन अंकी या नाटकात दलित चळवळ आणि नेत्यांचे नेतृत्व, एका शब्दावर चळवळीसाठी संपूर्ण आयुष्य झोकून दिलेल्या सामान्य कार्यकर्त्यांचा जीवनाचा संघर्ष नाटकात हुबेहूब दाखविण्यात आला. दलित चळवळ कशी विखुरली, अनेक गट-तट कसे निर्माण झाले, नेत्यांच्या भूमिकेमुळे सवर्णांनी जनतेची केलेली पिळवणूक या घटनांचे चित्र कलाकारांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले. नाटकाच्या अखेरीस मृत झालेल्या सामान्य कार्यकर्त्याचा मुलगा भार्इंना भेटण्यास येऊन बाबासाहेबांची शपथ देत चळवळ पुन्हा उभी करा, अशी आर्त हाक देतो. या प्रसंगाने उपस्थितांचे डोळे पाणावतात. नाटकाचे लेखन डॉ. हृषिकेश कांबळे तर दिग्दर्शन अ‍ॅड. रमाकांत भालेराव यांनी केले होते. डॉ. दिलीप घारे, अमृता तोरडमल, श्वेता पत्की, प्रेम लोंढे, नितीन धोंगडे यांच्या भूमिका होत्या. प्रा. गंगाधर आहिरे, चंद्रकांत गायकवाड, रोहित गांगुर्डे, जयंत बोढारे यांनी नाटकाचा प्रयोग यशस्वी होण्यासाठी प्रयत्न घेतले.