आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झिंग: परवानगी घ्या आणि मगच निवांत प्या, ‘उत्पादन शुल्क’चे फर्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मद्य पिऊन गटारी अमावास्या साजरी करणार्‍या तळीरामांवर पोलिसांसोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकांचीही नजर राहणार आहे. ही पथके सकाळपासूनच महामार्गासह शहर व परिसरात मोहीम हाती घेणार आहेत. त्यात हॉटेल्स, ढाब्यांवर विनापरवाने मद्य पिणार्‍यांविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील.

आषाढ महिन्याचा शेवटच्या अर्थात र्शावण मास प्रारंभ होण्याच्या आदल्या दिवशी सर्वत्र मांसाहार करणार्‍यांकडून गटारी आमावस्या साजरी केली जाते. र्शावणमासात मांसाहार व मद्य वज्र्य असल्याचे मानून बहुतांश युवकांसह ज्येष्ठ मंडळी गटारीलाच त्यावर ताव मारून घेतात. या गटारीचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले असून आता हॉटेल्स, बिअरबार, परमीटररूममध्ये डीजेच्या तालावर ठेका धरला जातो.

त्यातूनच रस्त्यावर मद्यपींकडून धुमाकूळ घालण्याच्या घटना घडतात. महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स, चायनीज गाड्या, खाद्य पदार्थ विक्री करणार्‍या हातगाड्यांवर मद्य पिण्याचा परवाना नसताना आणि विक्रेत्यांना मद्यविक्रीस मनाई असतानाही सर्रास मद्य उपलब्ध करून दिले जाते. त्यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी सकाळपासूनच शहरासह तालुक्यातील हॉटेल्स, ढाबे व परवानाधारक देशी-विदेशी दारू विक्रेत्यांचीही तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या तपासणीत विनापरवानगी मद्य विक्री व मद्यपींविरूद्ध गुन्हे दाखल करून अटक केली जाईल.

या ठिकाणी होणार नाकेबंदी
गटारी अमावास्येच्या दिवशी शहरातील कॉलेजरोड, चांडक सर्कल, मुंबई नाका, काठे गल्ली, गंगापूरनाका, जेहान सर्कल, महात्मानगर, एबीबी सर्कल, खुटवडनगर, अंबड, राणेनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, तसेच तिडके कॉलनीसह अन्य संवेदनशील ठिकाणी पोलिसांकडून नाकेबंदी केली जाणार आहे. नाकेबंदीदरम्यान वाहनचालकांची तपासणी केली जाईल. त्यात वाहनांच्या कागदपत्र तपासणीसोबतच अल्कोहोल मीटरद्वारे वाहनचालकाने मद्य घेतले किंवा नाही, हेदेखील बघितले जाईल.

पोलिसांकडून अल्कोमीटरद्वारे तपासणी
गटारी अमावस्या साजरी करणार्‍या मद्यपींकडून रस्त्यावर धिंगाणा घालणार्‍या आणि मद्य पिवून वाहने हाकणार्‍यांवर पोलिसांची नजर राहणार आहे. यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना सायंकाळपासूनच हद्दीतील हॉटेल्स, ढाबे, चायनीज गाड्या, अंडाभूर्जीचे गाडे तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाहतूक पोलिसांना दुपारपासून मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर वाहने तपासणी करण्याच्या सुचना पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिल्या आहेत. वाहतूक पोलिसांबरोबरच पोलिस ठाण्याचे कर्मचारी देखील अल्कोमीटर घेऊन महामार्ग, उड्डाणपूल आणि कॉलेजरोड, गंगापूररोड भागात तळीरांमावर करडी नजर ठेवणार आहे.

विशेष पथकाद्वारे गस्त
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून नाशिक शहरासह जिल्ह्यासाठी चार भरारी पथके नियुक्त करण्यात आले आहेत. यापथकामार्फत गस्त घातली जाणार असून रस्त्यावर, तसेच विनापरवानगी मद्य पिणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी परवाने घेऊनच परमीट रूम, बिअरबारमध्ये अथवा घरीच मद्य प्यावे. कुठेही गोंधळ घालू नये.
-जे. बी. पाटील, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क.

वाहनांसह ताब्यात घेणार
मद्य पिऊन वाहने हाकणार्‍यांकडे लक्ष ठेवतानाच अश वाहनचालकांना हॉटेल्स, ढाब्याच्या बाहेरच ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी मद्य पिऊन वाहने चालवू नये, अन्यथा त्यांच्याविरूद्ध गुन्हे दाखल केले जातील. तसे झाले तर त्यांना गटारी पोलिस ठाण्यातच रात्र काढावी लागणार आहे. -गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त