आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे स्थानकावर प्रवासी तहानलेले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड - रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेची काळजी घेताना प्रशासनाचे प्रवाशांच्या सुविधांकडे मात्र दुर्लक्ष झाल्याने रोज हजारो प्रवासी पाण्यासाठी व्याकूळ होत आहेत. सध्याच्या प्रचंड उष्म्यात तहान भागविण्यासाठी त्यांना पाण्याच्या बाटलीसाठी नाहक खर्च करावा लागत आहे. सुट्यांच्या पार्श्वभूमीवर स्थानकावर येणार्‍यांच्या प्रवासाची सुरुवातच अशी तहानलेली होत आहे. पाण्याचा काही भाग प्रवाशांना पिण्यासाठी राखीव ठेवावा, अशी मागणी केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत संकल्पनेची नाशिकरोड रेल्वे स्थानकावर काटेकोर अंमलबजावणी होत आहे. स्थानकावरील तीन प्लॅटफॉर्मची दिवसभर यंत्राच्या साह्याने कर्मचार्‍यांकडून साफसफाई केली जाते. त्यासाठी शेकडो लिटर पाण्याचा वापर केला जात असताना दुसरीकडे तिन्ही प्लॅटफोर्मवरील पाणपोईचे नळ कोरडे ठाक पडल्याचे चित्र आहे.

नाशिकरोड स्थानकावरून अप डाऊन मार्गावर दिवसभरात सुमारे सव्वाशे गाड्या धावतात. आठ ते दहा प्रवासी गाड्या मालवाहतूक गाड्या वगळता सर्व गाड्यांना येथे काही मिनिटांचा थांबा असतो. गाडी थांबल्यानंतर प्रवासी पाण्यासाठी खाली उतरतात, मात्र त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. हजारो प्रवासी नाशिकरोड येथूनच प्रवासाला सुरुवात करतात. गाडीची प्रतीक्षा करण्यासाठी काही मिनिटे आधीच ते स्थानकावर दाखल होतात. सध्याच्या उन्हाळ्यात प्रवाशांना तहान लागण्याचे प्रमाण अधिक असून, ते पाणपोईवर गेल्यानंतर पाणी नसल्याने त्यांना तहानलेलेच राहावे लागत आहे.

स्थानकावर नियमांचे उल्लंघन करून पाण्याच्या बाटल्यांची विक्री केली जात असल्याने अनेक प्रवाशांना ती विकत घेणेही परवडत नाही. स्थानकावर २० रुपयांना पाण्याची बाटली मिळत असल्याने अनेक प्रवासी तहानलेलेच राहात आहेत. स्वच्छतेसाठी शेकडो लिटर पाणी खर्ची घालताना त्यातील काही पाणी पिण्यासाठी राखून ठेवले पाहिजे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

५०पेक्षा जास्त नळ पडले कोरडेठाक
नाशिकरोड स्थानकावर सध्या तीन प्लॅटफॉर्म, सर्वाधिक कार्यरत दोन पादचारी पूल, प्रवेशद्वार, पार्सल विभागाचा परिसर तसेच आरक्षण केंद्रालगत बाहेर पडण्याचा नवीन मार्ग आहे. त्यांची खासगी ठेकेदारांकडून दैनंदिन दिवसभर स्वच्छता केली जाते. एका प्लॅटफॉर्मच्या स्वच्छतेसाठी यंत्राला किमान दीडशे लिटर पाणी लागते. परिसर, पादचारी पूल इतर ठिकाणच्या स्वच्छतेसाठी अधिक पाणी खर्ची होते. त्यामुळे स्थानकावरील सुमारे ५०पेक्षा जास्त नळ कोरडेठाक पडले आहेत.