आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinking Water News In Marathi, Water Stringency Issue At Nashik, Divya Marathi

पाण्यासाठी तिसर्‍या दिवशी देवळालीकरांच्या दाहीदिशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- जलसंपदा विभागाने दारणा धरणातून पाणी सोडण्याबाबत बुधवारीदेखील आदेश दिले नसल्याने देवळाली कॅम्पच्या रहिवाशांना सलग तिसर्‍या दिवशीदेखील पाण्यापासून वंचित राहावे लागले. शिवाय आणखी दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. लष्करी विभागाचा पाणीसाठा संपुष्टात आल्याने लष्करी परिसरासह रुग्णालयात पाणीटंचाई जाणवू लागली आहे.

दारणा नदीपात्रात जलसंपदा विभागाने पाण्याचे आवर्तन सोडले नसल्याने कॅन्टोन्मेंट व परिसर पाण्यापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे देवळाली कॅम्प येथील रहिवाशांना सलग तिसर्‍या दिवशी पाण्यासाठी वणवण फिरावे लागले. या परिस्थितीस जलसंपदा विभागाचे आडमुठे धोरणच जबाबदार असल्याची चर्चा आहे. जुन्या करारानुसार पैसे अदा करण्याची मागणी विभागाने केली आहे. कॅन्टोन्मेंटने वापरलेल्या पाण्याचे बिल अदा केल्यानंतरही जलसंपदा विभाग त्यांचा हट्ट सोडत नसल्याने सुमारे 60 हजार नागरिकांवर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.

दरम्यान, सलग तीन दिवसांपासून पाणीच येत नसल्याने परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सुरुवातीला काही जणांनी साठा केलेल्या पाण्यावर निभावून नेले. मात्र, तिसर्‍या दिवशीही पाणी न आल्याने बुधवारी महिलांना रेल्वे मार्ग ओलांडून पाणी आणण्यासाठी धावाधाव करावी लागली. शिगवेबहुला येथे जनावरांच्या वाट्याचे पाणी घेण्यात आले, तर विजयनगर येथे वृक्षमित्र तानाजी भोर यांनी पाण्याची व्यवस्था केली.आनंदरोड येथे पाण्यासाठी नागरिकांची एक किलोमीटरवर रांग लागली होती. देवळालीत बुधवारी दिवसभर रिक्षा, दुचाकी, हातगाड्यांद्वारे आसपासच्या गावांतून भटकंती करून नागरिक पाणी आणताना दिसत होते.

जलसंपदा विभागाकडेच बोट
कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी जलसंपदा विभागाकडून वार्षिक 95 दशलक्ष घनफूट पाणी देय असताना प्रत्यक्षात 65 दशलक्ष घनफूट पाणी वापरले जाते. कॅन्टोन्मेंट बोर्ड भगूरच्या दारणा नदीपात्रातून पाणी उचलते त्या जॅकवेलपर्यंतचे पाणी आटले आहे. तेथे पात्र कोरडेठाक झाल्याने बोर्डाला पाणीपुरवठा करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे लष्करी परिसरासह सामान्यांनाही गैरसोय सहन करावी लागत आहे. कॅन्टोन्मेंटने सातत्याने पाणी सोडण्याबाबतच्या लेखी-तोंडी मागणीकडे जलसंपदा विभागाने दुर्लक्ष केल्याने याबाबत जलसंपदा विभागाकडेच बोट दाखविले जात आहे.