आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांचे हायटेक प्रबोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) वाहनचालकांचे रस्ता सुरक्षिततेबाबत प्रबोधन केले जाणार आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच हायटेक कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नाशिक शहरासह विभागातील पाचही जिल्ह्यातील अपघातांचा आढावा घेतला असता दिवसाला सहा जणांचा बळी जात असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे पाच हजार जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. आहे. यातील बहुतांश अपघात हे अवजड वाहनचालकांच्या वाहतूक नियमांविषयीच्या अज्ञानामुळे होत असल्याचे पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांवरून स्पष्ट झाले.
यंदाच्या वर्षात चार महिन्यांतच 100हून अधिक प्रवासी व पादचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे महानिरीक्षकांच्या आढाव्यात उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी जीवन बनसोड व उपपरिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी पुढाकार घेत परिवहन कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर सभागृह तयार करण्यात आले आहे.
हायटेक प्रबोधनाचे धडे
या कक्षात प्रोजेक्टर असून, दृकर्शाव्य फितींद्वारे वाहनचालकांना अपघात कसे रोखता येतील, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अवजड वाहनांनी महामार्गावर व शहरातून जाताना वेगावर नियंत्रण कसे ठेवावे, गतिरोधक, वळण, दुभाजकापासून किती अंतरावर चालावे या बाबींवर मार्गदर्शन केले जाणार आहे. मराठी, हिंदी व इंग्रजीत चित्रफीत दाखविण्यात येतील. मोठय़ा 22 फलकांवर वाहतूक नियमांच्या खुणा, दिशा दर्शविण्यात आल्या आहेत. चालकांना प्रशिक्षण देण्यासाठी मोटार वाहन निरीक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे.
अनुज्ञप्तीधारकांना लाभ
वाहन परवान्यांचे नूतनीकरण, योग्यता प्रमाणपत्र काढण्यासाठी चालकांना आरटीओ कार्यालयात यावेच लागते. शिकाऊ व कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना काढण्यासाठी येणार्‍यांना दोन ते तीन तास थांबावे लागते. या वेळेत दृकर्शाव्य प्रशिक्षणाचा वाहनचालकांना लाभ घेता येणार आहे. जीवन बनसोड, परिवहन अधिकारी ;