आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ : 108 गावांवर टंचाईचे भीषण संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिंडोरी - पावसाने ओढ दिल्यामुळे तालुक्यातील धरणांमधील साठा घटला आहे. त्यामुळे दिंडोरीतील धरणांवर अवलंबून असलेल्या दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड या तालुक्यांंतील 108 गावांतील पाणीयोजना अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून पाणी कपातही करण्यात आली आहे. त्याचा परिणाम गावांगावातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे.
दिंडोरी तालुक्यात पालखेड, ओझरखेड, पुणेगाव, वाघाड, करंजवण, तिसगाव अशी सहा धरणे आहेत. या धरणांमधूनच दिंडोरी, निफाड, चांदवड, येवला तालुक्यांसह मनमाड शहराला पाणी पुरविले जाते. सुमारे 108 गावांचे पिण्याचे पाणी हे याच धरणावर अवलंबून आहे. तसेच तालुक्यात दोन औद्योगिक वसाहती असल्याने पाणीटंचाईचा कारखान्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पालखेड धरणातच सध्या अत्यल्प साठा शिल्लक असल्याने आता नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्याचबरोबर पालखेड पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी अनेक गावांच्या पाणी योजनेच्या पाणी कोट्यातही कपात केली आहे. त्यामुळे गावांचा पाणीपुरवठा अनियमित झाला आहे. मात्र, पाऊस लवकर न झाल्यास पाण्याची परिस्थती आणखीच गंभीर होऊ शकते.

..तर पालखेड धरण कोरडे पडेल
सर्वाधिक पाणी योजना पालखेड धरणावर अवलंबून आहे. धरणाची पाणीपातळी अत्यंत खालावलेली असल्याने या धरणावर एकूण 60 गावे अवलंबून असलेल्या पाणी योजनांच्या पाण्यातही कपात केली जात आहे. ओझर-मोहाडीसह पाचगाव पाणीपुरवठा योजनेत पाणी कपात केली गेली असून, या गावांना आता दिवसाआड, तर काही ठिकाणी अनियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे. सद्यस्थितीला पाण्याचे नियोजन केले असले तरीही जर अजून पाऊस लांबला तर धरणात पाणीच शिल्लक राहणार नाही, अशी परिस्थिती आहे.

पाणी जपून वापरावे
- नेहमीच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस होतो; परंतु तो वेळेत न पडल्याने पाणीटंचाई भासत आहे, तरीही पिण्याच्या पाण्याचे नियोजन केले असल्याने अजून 15 दिवस पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक आहे. जनतेनेही पाणी जपून वापरले पाहिजे. - राजेंद्र विठ्ठल तायडे, शाखा अभियंता पालखेड धरण

दिंडोरीत टंचाई नाही
- दिंडोरी तालुक्यात सध्या एकही ग्रामपंचायतीने पाणीटंचाई आहे, असे कळविले नाही, त्यामुळे तालुक्यात कोठेही टॅँकर उपलब्ध करून देण्याची वेळ अद्याप आली नाही. आर. झेड. मोहिते, गटविकास अधिकारी दिंडोरी

शेतक-यांना विश्वासात घ्या
- लोकप्रतिनिधी व शेतकरी यांना विश्वासात घेऊन पाण्याचे नियोजन केले पाहिजेत. अनेक पाणीयोजना या धरणांवर अवलंबून असल्याने त्यांना प्राधान्य देऊन पाणी दिले पाहिजे. ज्याप्रमाणे उद्योग, व्यवसायांना पाणी देतात त्याप्रमाणे शेतकºयांसाठीही पाणीसाठा राखीव असावा. -पांडुरंग गणोरे, सेना उपतालुकाप्रमुख, दिंडोरी

येवलेकरांना प्रतीक्षा पालखेडच्या आवर्तनाची
येवला शहराचा पाणीपुरवठा हा पालखेड धरणावर अवलंबून आहे. सध्या शहराला दहा दिवस पुरेल इतका साठा पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 2 साठवण तलावात शिल्लक असून, सद्यस्थितीत शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. पालखेडचे आवर्तन मिळाल्यास शहराचा तीन महिन्यांचा पाणीप्रश्न सुटू शकतो.

पुणेगाव धरण : पुणेगाव धरणाची क्षमता 720 दशलक्ष घनफूट आहे. यात सध्या 0.86 टक्के पाणी शिल्लक आहे. या धरणावर प्रत्यक्ष पाणीयोजना अवलंबून नसल्या तरी त्यातील पाणी वेळोवेळी पालखेडमध्ये सोडण्यात येते. त्यासाठी 10 दशलक्ष घनफूट पाणी पिण्यासाठी आरक्षित आहे. दरम्यान, निर्मिती प्रक्रियेत असलेल्या मांजरपाडा वळण योजनेचे पाणी पुणेगाव धरणातच साठविणे प्रस्तावित आहे.
ओझरखेड धरण : ओझरखेड कालव्याची लांबी 64.48 कि.मी. असून, साठवण क्षमता 2400 दशलक्ष घनफूट आहे. या धरणात सध्या 4.36 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर प्रामुख्याने तालुक्यातील वणी शहरास पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असून, लखमापूर औद्योगिक वसाहत व लखमापूर ग्रामपंचायतीला पाणी पुरविले जाते. याच धरणाचे पाणी पालखेड धरणामध्ये सोडण्यात येते.
फोटो - दिंडोरी तालुक्यातील पालखेड धरणावर सहा पाणीयोजना अवलंबून आहेत; मात्र सध्या या धरणात केवळ 3 टक्केच साठा शिल्लक आहे. तसेच, पालखेड धरणात करंजवण, ओझरखेड, वाघाड धरणांचे पाणी सोडले जाते. त्यामुळे या धरणांवर अवलंबून असलेल्या पाणीयोजनांना काही दिवस पाणी उपलब्ध होऊ शकेल.