आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील पाणीप्रश्नी अधिकारी धारेवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इगतपुरी - येथे आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत तालुक्यातील आहुर्ली, त्रिंगलवाडी, जामुंडे, पिंपळगाव मोर, कु-हेगाव, शेणवड, बलायदुरी आदी गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठ्याचे उपअभियंता आर. टी. चित्ते यांनी देताच सभागृहात गोंधळ झाला. ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेत एकही योजना पूर्ण नसून, त्या केवळ कागदोपत्री पूर्ण असल्याचा खुलासा केला. गोंधळलेल्या अवस्थेतील उपअभियंत्यांना समाधानकारक उत्तरे देता न आल्याने आमदार गावित यांनी सदर अधिका-याला धारेवर धरले.

शुक्रवारी येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या अधिका-यांचे पितळ उघडे पडले. तालुक्यातील पाणीयोजनांसाठी गतवर्षी शासनाने करोडोंचा निधी मंजूर केला होता. मात्र, या योजना फक्त तांत्रिक सल्लागारांचे आणि अधिका-यांचे खिसे भरण्यासाठी झाल्या असून, यामुळेच कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच, तालुक्यात अधिका-यांच्या कामचुकारपणामुळे 37 पाणीपुरवठा योजना धूळखात पडल्या आहेत. या योजनांवर 13.50 कोटी रुपये निधी शासनाने मंजूर केला होता. या सर्व योजनांची चौकशी करून दोषी अधिका-यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत आमदार निर्मला गावित यांनी दिले. तालुक्यात 12 टँकरची मागणी असताना फक्त 4 टॅँकर मंजूर आहेत.
पंचायत समिती प्रशासनाने ग्रामस्थांना वेठीस धरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या वेळी पाणीटंचाईचा आढावा घेत सर्व पाणीपुरवठा योजना पूर्ण करा, असे आदेश आमदार गावित यांनी संबंधित अधिका-यांना दिले. बैठकीस तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी किरण कोवे, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, पंचायत समिती सभापती ठकूबाई सावंत, मुख्याधिकारी विशाखा मोटघरे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

गावात पाणी नाही
पिंपळगाव मोर पाणीयोजनेवर 37 लाख खर्च करण्यात आले. मात्र, अद्याप पाणी गावात पोहोचले नाही. -संपत काळे, संचालक, घोटी बाजार समिती

कागदोपत्री योजना पूर्ण
- दौडत येथील पाणीयोजना कागदोपत्री तयार करण्यात आली आहे. प्रत्यक्षात कोणतेही काम झालेले नाही. -पांडुरंग शिंदे, ग्रामस्थ

बंधा-याचा प्रश्न मार्गी लावणार - खासदार डॉ. सुभाष भामरे
सटाणा शहराच्या पाणीप्रश्नी लोहोणेरजवळील प्रस्तावित साठवण बंधा-याच्या कामास गती दिली जाईल. तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 10 लाख रुपये खासदार निधी देण्याची घोषणा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केली. प्रलंबित व प्रस्तावित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी येथील न. पा. सभागृहात शुक्रवारी बैठक बोलावली होती.
यावेळी तळवाडे भामेर एक्स्प्रेस कालवा, हरणबारी डावा कालवा, आरम, मोसम, हत्ती नदीवरील के.टी. वेअर, आसखेडा पाच गाव पाणीपुरवठा योजना, ट्रॉमा सेंटर, ग्रामीण रुग्णालय, साल्हेर/ वाघंबे वळण बंधारे, तालुक्यातील प्रलंबित पाणी व सिंचन योजना, कांदा प्रश्न, सटाणा वळण रस्ता, तालुक्यातील प्रलंबित विकासकामांबद्दल चर्चा झाली. प्रलंबित कामांबाबत संबंधित अधिका-यांनी तातडीने प्रस्ताव पाठवावे, अशा सूचना खासदार डॉ. भामरे यांनी केल्या. खासदार निधीव्यतिरिक्त बागलाण विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित विकासकामांसाठी केंद्र शासनाकडून कोणता निधी आणता येईल, याबाबत लोकप्रतिनिधी व अधिका-यांनी प्रस्ताव पाठविल्यास निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

प्रस्तावाची माहिती सादर करा
प्रलंबित व प्रस्तावित कामांची गांभीर्याने टिप्पणी करून आमच्या कार्यालयाकडे सादर करावी. प्रस्तावांचा कुठपर्यंत पाठपुरावा झाला, याची नोंद टिपण्णीत असावी, असा इशारा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिला.