आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक जिल्ह्यात गेल्या २५ वर्षांतील सर्वात कमी पाऊस, दुष्काळाची दाहकता तीव्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनमाडमधील वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने लोकांची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे. छाया:अशोक गवळी - Divya Marathi
मनमाडमधील वागदर्डी धरणाने तळ गाठल्याने लोकांची पाण्यासाठी दाही दिशा भटकंती सुरू आहे. छाया:अशोक गवळी
नाशिक- कोरडेठाकबंधारे, आटलेल्या विहिरी, शुष्क जमीन, करपलेली पिके, तब्बल महिनाभरापासून नळाचे पाणी बेपत्ता, टँकरचे दर दसपटीने वाढलेले... अशा स्थितीत सकाळपासून रात्रीपर्यंत सर्वत्र पाणी.. पाणी... एवढा एकच टाहो कानी पडतो. पण, पाणी दिसते ते केवळ शेतकऱ्यांच्या डोळ्यांत... हे अत्यंत विदारक वास्तव आहे सध्या दुष्काळात होरपळणाऱ्या जवळपास निम्म्या नाशिक जिल्ह्याचे. कारण जिल्ह्याच्या सरासरी पर्जन्यमानाची आकडेवारी पाहिल्यास आतापर्यंत केवळ ४३ टक्के एवढाचा पाऊस झाला आहे. आता पावसाळा संपण्यास जेमतेम आठवडे उरले असून या काळात दमदार पाऊस झाल्यास जिल्ह्यात १९७२ नंतरचा हा सर्वाधिक भीषण दुष्काळ असेल. तथापि, शासकीय यंत्रणेच्या लेखी मात्र दुष्काळ केवळ मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग एवढ्यापुरताच मर्यादित क्षेत्रावर असल्यासारखी स्थिती आहे.
सोयाबीन आहे, पण पावसामुळे शेंगाच लागल्या नाहीत. कपाशी गुडघाभर वाढली. बोंडेही लागली, पण करपा, लाल्या रोगाने आक्रमक केले. मका वाढली, पण कणीसच आले नाही. बाजरीला कणीसआहे, पण कणसाला दाणेच नाही. पाणी आहे पण शेवाळाचं. मजुरी करण्याची इच्छा आहे, पण कामच नाही. मेहनत करण्याची हिंमत आहे, पण पावसाची साथच नाही. त्यामुळे केवळ जेवणाची नाही, तर पिण्याच्या पाण्यासाठीही भांडणे होत अाहेत. ही सर्व परिस्थिती विदर्भ किंवा मराठवाड्यातील नाही तर राज्यात कृषीक्षेत्रात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आहे. राज्यात केवळ मराठवाडा आणि विदर्भातच दुष्काळ असल्याचे चित्र दाखविले जाते. पण, खुद्द नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्याचा केवळ शेतकरीच नाही तर कृषीसंलग्न व्यवसाय, किराणा व्यवसाय आणि सर्वसामान्य जनमानसावर परिणाम होणार आहे. तर दुष्काळाचा लाभ फक्त पाणी व्यवसाय करणाऱ्यांना होत आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’ने घेतलेला जिल्ह्यातील आढावा.

मान्सून दाखल होऊन ९० दिवस झाले, पण पावसाने ओढ दिल्याने १०७४ ची सरासरी असताना केवळ ६८३ मिलिमीटर पाऊस पडला. पावसाच्या मुख्य हंगामातील केवळ २२ दिवस शिल्लक राहिले आहेत. या उर्वरित दिवसांत पाऊस पडेलच असे चित्र दिसत नाही. १९७२ मध्ये राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. मात्र, यंदाचा दुष्काळ त्यापेक्षा भीषण असल्याचे जाणकारांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. जिल्ह्यात नांदगाव, चांदवड, येवला, सिन्नर, निफाड, सटाणा या तालुक्यांत नेहमीच पर्जन्यमान कमी असते. यंदा मात्र पाऊस कोपल्याने जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या केवळ हजार ६०९ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली. ही शासकीय आकडेवारी असल्याने प्रत्यक्षात यापेक्षा कमी क्षेत्रावर पेरणी झाल्याचे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव, खाणगाव, लासलगाव, सारोळे, रानवड, सावरगाव, नांदुर्डी आदी गावांमध्ये पाऊस पडला नसल्याने द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटोसह भाजीपाला करपला आहे. तर खडकमाळेगाव येथील परिस्थिती फारच विदारक असल्याने मका, सोयाबीन ही पिके वाया गेली आहेत. चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ, साळसाणे, सांगवी, हरसूल, रायपूर, काळखोडे या गावांमध्ये तर सध्या शेतकऱ्यांनी पोळ कांद्याच्या लागवडीची तयारी केली आहेत. या भागातील पोळ कांदा हे महत्त्वाचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी गत दोन महिन्यांपासून कांदा रोप टाकले होते. परंतु, पाऊसच नसल्याने काही शेतकऱ्यांची रोपे जळाली, तर काही शेतकऱ्यांनी जमीन तयार करून देवाच्या आणि पावसाच्या भरवशावर कोरड्या जमिनीत कांदा लागवड केली आहे. डाळिंबाला पाणी नसल्याने ते तोडण्याची वेळ काही शेतकऱ्यांवर आली आहे. नांदगाव तसेच येवला तालुक्यातील नागरिकांना केवळ टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु, या भागात आठवड्यातून केवळ एकदाच टँकर येत असल्याने पाणी मिळविताना नागरिकांमध्ये भांडणे होत आहेत. पाऊस नसल्याने तरुणांना काहीच काम नसल्याने आणि कोणी मजुरीसाठीही बोलवित नसल्याने केवळ एका ठिकाणी एकत्र येऊन एकमेकांना धीर देणे एवढेच काम उरले आहे.

कपाशीवर करपा, लाल्या रोगाचा प्रादुर्भाव
पावसाने दडी मारली असून, सूर्यही आग ओकत असल्याने कांदा, कापूस, मका, सोयाबीन, मूग, भुईमूग, बाजरी ही पिके करपली आहेत. नांदगाव, येवला, चांदवड तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या कपाशीवर उष्णतेमुळे करपा आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच कपाशीची बोंडेही गळून पडण्यास सुरुवात झाली आहे.

१९७२ मधील तलाव कोरडाठाक
शासन पाण्याच्या नियोजनासाठी जलयुक्त शिवार अभियान राबवित आहे. त्यासाठी ठिकठिकाणी चर करण्यात येत आहेत. परंतु, नगरसूल येथील घनामाळी मळा येथे १९७२ मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी तलाव बांधण्यात आला. दोन वर्षांपूर्वी आमदार छगन भुजबळ यांनी त्याचे रुंदीकरणही केले. पण, पाऊसच नसल्याने हा तलाव ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठीदेखील टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे.

आठवड्याला केवळ २०० लिटर पाणी
नगरसूल परिसरात दुष्काळ अधिक असल्याने या भागात प्रशासनाने टँकरद्वारे पाणीवाटप सुरू केले आहे. परंतु, एका कुटुंबासाठी आणि एका आठवड्यासाठी केवळ दोनशे लिटर पाणी पिण्यासाठी मिळत आहे. जनावरांना पाणीच नसल्याने त्यांनाही भुकेले आणि तहानलेले राहावे लागत आहे.

शेवाळयुक्त प्यावे लागते पाणी
चांदवड तालुक्यातील विहिरीतील पाणी खोल गेल्याने तेथील पाणी काढणे मुश्कील झाले आहे. त्यातही या पाण्यात शेवाळ वाढल्याने नागरिकांना याच पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोळ कांद्यावर होणार परिणाम
पोळ कांद्यासाठी नाशिक जिल्ह्यात नांदगाव, चांदवड, निफाड, देवळा, सटाणा, मालेगाव आणि सिन्नर तालुक्यातील वातावरण अनुकूल आहे. परंतु, या भागात पाऊसच नसल्याने खरिपाच्या (पोळ) कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. गतवर्षी जिल्ह्यात पोळ कांद्याची हजार ८५१ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती. परंतु, यावर्षी शेतकऱ्यांना पोळ कांद्याकडून दिलासा मिळेल म्हणून या तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी १० हजार ७०६ हेक्टरवर लागवड केली. परंतु, पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांना डोळ्यासमोर नुकसान पाहावे लागत आहे.

घरात वाढली भांडणे
पावसामुळे पिके करपल्याने यावर्षी उत्पादनच होणार नसल्याने खते अाणि बियाणे विक्रेत्यांनी उधारीस सुरुवात केली आहे. परंतु, हाती आलेला सर्व पैसा उत्पादनावर लावल्याने आता काही उरले नाही. त्यामुळे दुकानदारांना टाळण्यासाठी अनेक युवक दिवसभर घराबाहेर राहातात, तर सकाळी लवकर बाहेर पडतात. परंतु, पैसा नसल्याने तसेच कोणीही उधारीत किराणा मालही देत नसल्याने घरामध्ये भांडणे होत आहेत. यामुळे तरुण मुलांचे आई-वडील तर अधिक तणावात दिसून येत आहेत.

कर्जमाफीकडे लक्ष
दुष्काळाची परिस्थिती पाहून शासन शेतकऱ्यांना काही तरी मदत करेल यावर नागरिकांचे लक्ष आहे. परंतु, बहुतांश शेतकरी शासनाने पीककर्ज माफ करून दुष्काळी स्थितीमध्ये मदत करावी, अशी मागणी करत आहेत.

तोंड लपविण्याची वेळ
पूर्वी गारपिटीमुळे द्राक्षबागांचे नुकसान झाले. त्यातून शेतकरी सावरतो नाही तोच आता दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिकांसाठी घेतलेले औषधे, खते यांचे पैसे द्यायलासुद्धा नाहीत. त्यामुळे दुकानदार आता थेट घरी यायला लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर तोंड लपविण्याची वेळ आली आहे. नानासाहेब शिंदे, खडकमाळेगाव

त्वरित पीककर्ज माफ करावे
पाऊस नसल्याने निफाड, चांदवड, नांदगाव, येवला आणि सिन्नर तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे शासनाने त्वरित या तालुक्यांमध्ये टँकरची संख्या वाढवावी. खरिपाचे पूर्ण पीक गेल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित पीककर्ज माफ करावे.
निवृत्ती न्याहारकर, वाहेगाव साळ

पिण्यासाठी शेवाळयुक्त पाणी
विहिरीतील पाणी शेवाळाचं झाले असूनही तेच पाणी प्यावे लागत आहे. कांदे लागवड केली असून, आता पावसाची प्रतीक्षा करत आहोत. शांताबाई म्हसू ठाकरे, साळसाणे
तर कुटुंबासह आंदोलन
दीडशे लोकांची वस्ती आणि दोनशे जनावरे आहेत. त्यासाठी प्रशासन आठवड्यातून एकदा टँकरने पाणीपुरवठा करीत असून, त्यात वाढ करण्याची गरज आहे. पीककर्ज माफ झाल्यास घरातील सर्वजण आंदोलनासाठी उतरणार आहे. बी. डी. पैठणकर, नगरसूल
दुष्काळाचे चक्रव्यूह भेदण्यासाठी तीन वर्षे
बियाणे, खते आणि औषधांची गेल्या महिन्यापासून विक्री झालेली नाही. कंपन्यांना पैसे देऊन बसलो आहे. मात्र, पाऊसच नसल्याने शेतकऱ्यांकडे उधारी अडकून पडली आहे. त्यामुळे नफा तर नाहीच, परंतु कंपन्यांना दिलेल्या पैशांचे व्याज भरावे लागत आहे. त्यामुळे सर्व बियाणे आणि खते विक्रेत्यांच्या अर्थकारणावर ७५ ते ८० टक्के परिणाम झाला आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बियाणे आणि खते कंपन्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. नितीन काबरा, येवला
पुढील स्लाइड्सवर पाहा, पावसाची आता पर्यंतची टक्केवारी...