आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- भेगाळलेली जमीन, आ वासून आभाळकडे बघत बोडकी झालेली झाडं, हडकुळी जनावरे, हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकताना रापलेले पाय आणि रडतानाही डोळ्यातून न येणारं पाणी... अशा भीषण परिस्थितीला सध्या अवघा महाराष्ट्र तोंड देत आहे, पण यावर केवळ चर्चा न करता काही नेटीझन्सने थेट मदतीचे आवाहन केले आणि मदतीचा ओघही सुरू झाला आहे.
दुष्काळ निवारणासाठी शासनाने काय केले? अशा वादात न पडता प्रमोद गायकवाड यांनी फेसबुकच्या साह्याने मदतीचे आवाहन केले. बघता-बघता या आवाहनाला अनेक नेटीझन्सने प्रतिसाद दिला. शंभराहून अधिक मित्रांनी ही पोस्ट शेअर केली त्यामुळे त्यांचेही मित्रही ‘तहानलेल्या गावांसाठी मदतीची ओंजळ’ या अभियानात सहभागी झाले आहेत. आतापर्यंत लाखापर्यंत मदतनिधी याद्वारे जमा झाला आहे. पाणी आटले असले तरी माणुसकीचे झरे जिवंत असल्याचेच यापैकी अनेकांनी बोलून दाखविले.
मराठवाडा किंवा अन्य भागातील तीन-चार छोटी गावे जिथे सरकारी मदतीने पाणी पोहोचू शकलेले नाही अशा गावांचा शोध घेण्याचे काम आता या पैकीच काही मित्र घेत आहेत. अशा गावांना रोज एक टॅँकर पाणी मिळेल अशी व्यवस्था करून त्या टँकरचा खर्च या निधीतून करण्यात येणार आहे. हा पाणी पुरवठा साधारण एप्रिल आणि मे महिन्यात करण्यात येणार आहे. आता गरज आहे ती शेकडो हात एकत्र येण्याची. दुष्काळाची धग इतकी भीषण आहे की कितीही रुपये कमी पडतील. पण एक जबाबदार नागरिक म्हणून आपण मदतीचा हात पुढे करून काही लहान गावांना दत्तक घतले तर त्यांची तहान नक्कीच भागेल, असा गायकवाड यांना विश्वास आहे.
टाक्या देण्याचा विचार - सोशल नेटवर्किंग फोरमद्वारे पाणी तर देण्यातच येणार आहे. मात्र त्या-त्या गावांना टाकी देण्याचा आमचा विचार आहे. टॅँकर गावात आला तर प्रचंड गर्दी होते. भांडणे होतात. पाणीही वाया जाते. यावर उपाय म्हणून त्या गावांमध्ये टाकी दिली. तिला 15-20 तोट्या असल्या तर टॅँकरमधून त्या टाकीत पाणी सोडले जाईल आणि ग्रामस्थ त्या तोट्यांद्वारे पाणी घेतील. यामुळे प्रत्येकाला पाणी मिळेल. 31 मार्चपर्यंत मदतनिधी जमा करण्याचे काम सुरू आहे.
आजपर्यंतचे दानशूर - आजपर्यंत नाशिकसह नागपूर, मुंबई, औरंगाबाद, जळगाव, दिल्ली, पुणे, धुळे याठिकाणाहून निधी जमा झाला आहे. त्यात जी. एम. जाधव, आरंभ आॅटिझम सेंटर, नितीन भोसले, संध्या चौघुले, प्रा. आशिष चौरसिया, संतोष पवार, प्रदीप जोशी, राहुल जिंदे, मृण्मयी राम, डॉ. उत्तम फरताळे, सुशीलदत्त शिंदे, अंबिका टाकळकर, देवा झिंजाड, नीलेश कळसकर, भारत राणा, गिरीश अवघडे, सुमित म्हेत्रे आणि बापू गायकवाड यांनी मदत केली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.