आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीटीएड प्रवेशासाठी नाशकात प्रतिसाद, अन्यत्र नन्नाचा पाढा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राज्यभरात डीटीएड महाविद्यालयांकडे विद्यार्थी पाठ फिरवत असताना नाशिकमध्ये मात्र या अभ्यासक्रमाला बर्‍यापैकी प्रतिसाद मिळत असून, ऑनलाइन सतराशे अर्ज दाखल झाले आहेत. तसेच, मुदत संपल्यानंतरही जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी चौकशी केल्याने समाधानकारक चित्र दिसत असल्याचे डीटीएड केंद्र समन्वयकांचे म्हणणे आहे.

डीटीएडचे ऑनलाइन अर्ज सादर करण्यास 27 मेपासून सुरुवात झाली. 8 जूनपर्यंत त्याची अंतिम मुदत होती. मात्र, अपेक्षेइतके अर्ज न आल्याने मुदत वाढवून 15 जून करण्यात आली. त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, प्रवेशप्रक्रिया केंद्रीय स्तरावर (पुणे येथून) होत असल्याने त्याबाबत अद्याप कुठलीही माहिती शासनस्तरावरून प्राप्त झालेली नाही. त्यास सुरुवात केव्हा होणार, असा प्रश्न आहे. प्राप्त अर्ज प्रथम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे पाठवले जातात. त्यास मंत्रालय स्तरावरून मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्षात सुरुवात केली जात असल्याचे केंद्र समन्वयकांनी सांगितले. मुदतीनंतर संपर्क साधणार्‍या पाचशे विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेश देण्याची व्यवस्था असल्यामुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये यंदा किमान 75 टक्के तरी प्रवेश पूर्ण होण्याची शक्यताही केंद्र समन्वयकांनी वर्तवली.

संख्या वाढण्याची शक्यता
अजूनही बरेच विद्यार्थी प्रवेशासाठी चौकशी करीत आहेत. दरवर्षी मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशानंतर संख्येत वाढ होते. त्यामुळे या दोन्ही शाखांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या वाढू शकते, असेही सांगण्यात आले.