आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छेडछाडीस कंटाळून डी.एड.च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - जाधव संकुल येथे राहणार्‍या डी.एड.च्या विद्यार्थिनीने बुधवारी सकाळी आत्महत्या केली. गुंडांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवल्याचे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले आहे. मुली व महिलांना त्रास देण्याचे प्रकार वेळीच न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा परिसरातील सामाजिक संघटनांनी दिला आहे.

प्रीती अंबादास जाधव (वय 20) शासकीय अध्यापिका महाविद्यालयात डी.एड.च्या दुसर्‍या वर्षात शिकत होती. सकाळी नऊच्या सुमारास घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर पडले. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या दरम्यान तिचे वडील जेवणासाठी घरी आले असता प्रीतीने छताला दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. तिच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीत गुंडांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक काकासाहेब पाटील तपास करीत आहेत. सातपूरसह आसपासच्या परिसरात विद्यार्थिनी, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढत असल्याबद्दल पालक व नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांनी गुंड प्रवृत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

तो मला सोडणार नाही..
आई, मला माफ कर. मी सोडून चालले आहे. मी असं करणार नव्हते; पण मानसिकदृष्ट्या टॉर्चर होत आहे. तो मुलगा मला सोडणार नाही. ऑप्शनल इंग्रजी पेपरच्या दिवशी त्याने पाठलाग करून हात पकडला. बळजबरी केली. तो दहावीपासून मागे लागला आहे. मी दुर्लक्ष करीत असल्याने परीक्षेसाठी जाताना त्याच्या चार-पाच मित्रांनी त्रास दिला. माझ्या आई-वडिलांना त्रास देऊ नये. मी स्वत:च्या र्मजीने फाशी घेत आहे.

सहा महिन्यांतील ही दुसरी घटना
पोलिसांकडे तक्रार करूनही छेडछाड करणार्‍यांवर कारवाई न केल्याने सिडकोतील एका महिलेने सातपूरला आत्महत्या केल्याची घटना जानेवारीत घडली होती. पोलिस आयुक्तांनी संबंधित निरीक्षक कोंडिराम पोपेरे यांना निलंबित केले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तालयात छेडछाडीच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी स्वतंत्र महिला कक्ष स्थापून हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले होते. हा कक्ष 24 तास सुरू आहे. हेल्पलाइन क्रमांक : 9767100100-9767200200

लगेच होते कारवाई
चिठ्ठीत छेडछाड करणार्‍यांचे नाव नसल्याने कुटुंबीयांकडून माहिती घेतली जात आहे. छेडछाडीबाबत वरिष्ठांशी संपर्क साधल्यास लगेच कारवाई होते. विवेक सराफ, वरिष्ठ निरीक्षक, सातपूर

मुलींना विश्वासात घ्या
छेडछाड किंवा त्रास झाल्यास मुलींच्या वागण्यामध्ये घरात कमी बोलणे, नाराज राहणे असे बदल होतात. ते पालकांनी टिपले पाहिजेत. तिला धीर दिला पाहिजे. डॉ. जयंत ढाके, मानसोपचारतज्ज्ञ