नाशिक- गेल्या सुमारे दोन महिन्यांपासून शहरात सुरू झालेली विविध प्रकारच्या गुन्ह्यांची मालिका बुधवारीही सुरू राहिली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीसह चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या निष्क्रियतेबद्दल चीड व्यक्त होत आहे.
देवळाली कॅम्प येथील एका दुकानात प्राणघातक शस्त्रांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अटक केली आहे. संशयितांकडून १५ चाकू (जंबिये) हस्तगत करण्यात आले.
पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी बनावट ग्राहक पाठवून शस्त्रविक्रीसंदर्भात खात्री करून घेतली. त्यानंतर नॅशनल कलेक्शन या दुकानावर छापा टाकण्यात आला. यावेळी ही प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात आली. संशयितांविरुद्ध देवळाली कॅम्प पाेलिस ठाण्यात हत्यार अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात हत्यारांची सर्रास विक्री होत असल्याबाबतचे वृत्त ‘दिव्य मराठी’त प्रसिद्ध करण्यात आले होते. पथकात सुभाष गुंजाळ, जाकीर शेख, संजय मुळक, गंगाधर केदार, आत्माराम रेवगडे, संतोष कोरडे, मोहन देशमुख, शंकर गडदे, इरफान शेख, ललिता आहेर, दीपक जठार आदींचा समावेश होता.
व्यवस्थापकावर हल्ला, उद्योजकांवर गुन्हा
सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस या संस्थेतील व्यवस्थापकावर मंगळवारी करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी सातपूर पोलिसांनी एशिया ऑटोमोटिव्ह या कारखान्याचे संचालक सुजीत आनंद इंद्रपाल सहानी यांच्यासह त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
एशिया ऑटोमोटिव्ह कंपनीचे बांधकाम सुरू असून, याबाबत विचारणा करण्यास गेलेल्या व्यवस्थापक दिनेश पाटील यांच्यासह त्यांचे सहकारी संदीप माने, काशिनाथ महाले यांच्यावर हल्ला करण्यात आला हाेता. या प्रकरणातील हल्लेखाेरांनी एका स्कॉर्पिओतून (एम. एच.१५ इ.एफ. ४३७८) गुंड आणून हल्ला केल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, सातपूरला भाजी मंडईसह श्रमिकनगरमध्ये चोऱ्या...पोलिस निरीक्षकांची बदली...