आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्थलांतरामुळे मलढोणवर स्मशानकळा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - दिवस उगवला की चारा-पाण्याच्या शोधात घरट्यातून पाखरं उडून जावीत; तसे कामाच्या शोधात मलढोणच्या गावक-यांना घर सोडावे लागते अन् गाव जणू ओस पडल्यासारखं दिसू लागते. शाळकरी मुलं खेळता-खेळता गावभर हुंदडत अधूनमधून कालवा करीत राहतात, हाच काय तो आवाज इथल्या मानवी अस्तित्वाची साक्ष देणारा. वयाची सत्तरी ओलांडलेल्या इथल्या बिजलाबाई हालवर डोळ्यात पाणी आणून आपबिती सांगत होत्या, ‘बाबा. . .रे, 72 च्या दुष्काळात फकस्त धान्य नव्हतं... या वेळी मातर प्यायला पाणी सुदीक न्हाय. बाबा, आमचं तर वय झालं, पण निसर्ग असा रुसत -हाईला तर पुढल्या पिढीचं काय व्हणार?’


दुष्काळामुळं शेतात काहीच कामं नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी दाही दिशा फिरणा-या मलढोणमध्ये पोहोचलो तेव्हा... पोटं खपाटीला गेलेली जनावरं, हातपंपावर जेमतेम येणारे पाणी भरण्यासाठी जमा झालेल्या वृद्धा आणि लहान मुलांची गर्दी सोडली तर गावभर सन्नाटा, धुळीने माखलेली बंद दारांची घरे, सुने पडलेले अंगण दुष्काळामुळे होणारी घुसमट जणू सांगत होती. दुष्काळाची वार्ता करतोय् म्हंजी कोणतरी सरकारी अधिकारी हाय आता आपनासुदिक मदत मिळणार अशी चर्चा करीत 10-12 ग्रामस्थ माझ्याभोवती रिंगण करून उभी राहिली. ‘सायब, लई दुष्काळ पडलाय काय मदत आसंल तर लवकर देवा, पोराबाळांचं आन् जनावरांचं पाण्यावाचून लई हाल सुरू हायेत. आमचं काय आता खरं न्हाय, पर या कोवळया जीवाचं अन् मुक्या जीतराबाचं तरी किव करा. चार दिसानं परत्येक घरटी येणारं हंडा, दोन हंडा पाणी भागवायचं कसं? त्यात पोरास्नी द्यायचं काय, घरातल्या लक्ष्मीला हा मोठा पेच आहे भाऊ? असे एक ना अनेक सवाल गावकरी करू लागले अन् इथल्या दुष्काळाच्या दाहकतेचे चटके जाणवू लागले. त्यांच्या व्यथा ऐकून मन हेलावलं. मी कोणी सरकारी सायब न्हाई पेपरवाला हाय, असं सांगितलं अन् त्यांच्या अपेक्षेत आणखीच भर पडली, तुम्ही ल्हिवलं तरच काय तरी व्हयील न्हाय तर काय बी खरं न्हाइ, असं ही मंडळी सांगायला लागली. धनगर समाजाची वस्ती असलेल्या मलढोणमध्ये यात्रा आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्तानं सामाजिक एकोपा टिकून आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, जनावरांच्या चा-याचा गंभीर प्रश्न अशा परिस्थितीत पोटासाठी रोज नव्या मालकाच्या पदरी मजुरी करण्याचे भोग इथल्या ग्रामस्थांच्या नशिबी आले आहेत. रोजगारासाठी अर्ध्याहून अधिक ग्रामस्थांच्या स्थलांतराने ओस पडलेल्या गावावर जणू स्मशानकळा पसरली आहे. शाळेजवळ असलेल्या एका हातपंपाचा मधूनच येणारा खडखड आवाज परिसरातील नीरव शांतता काही प्रमाणात भंग करतो; इतकंच काय ते या गावचं जागलेपण.
सिन्नर तालुक्यातल्या या मलढोण गावात विकास योजनांचा मागमूस नाही. जुनाट इमारतीत भरणारी अंगणवाडी, जवळच असलेली प्राथमिक शाळा हे गाव शिक्षणाच्या प्रवाहात आल्याची साक्ष देतात एवढेच. वावीसह अकरा गाव पाणी योजनेचे पाणी आताशी कुठे गावात पोहोचले आहे. मात्र चार दिवसांतून मिळणा-या दोन हंडे पाण्यासाठी लोकांची अशी काही झुंबड उडते की, त्यातून कधी-कधी आपसांत खटके ही उडतात. खरे तर इतके पाणी खूपच अपुरे आहे, परंतु लोकांनी आता त्याचीही सवय करून
घेतलीय्. इथे एक गोष्ट चांगली दिसली की, पाण्यासाठीचे हे तंटे विसरून लोक पुन्हा गुण्यागोविंदाने नांदतात. दिवाळसणापूर्वीच उसतोड आणि वीटभट्टी या दोन व्यवसायांसाठी दरवर्षी अर्ध्याहून अधिक गाव रिकामा होतो. त्यातच सलग दोन वर्षांपासून पडणा-या दुष्काळाने अधिकच भर घातली. सातत्याने दुष्काळी स्थिती
असल्याने गावक-यांच्या घरातील धान्य
ही संपले आहे. त्यातच आता उसतोड आणि विटभट्टीचा हंगाम ही संपत असल्याने परतणा-या कुटुंबांनाही पुन्हा पोटासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार आहे. मात्र तेथे रोजगार मिळेल का, हा प्रश्न कायमच राहतो.
आडातच नाही, पोह-यात कुठून ?
‘सततच्या दुष्काळानं धरणीमातेच्या पोटातलं पाणी सरलं. आडात न्हाई, तवा पव-यात कुठनं येणार ? विहीर, बारवा खोदून काय बी फायदा नाय’. ही व्यथा केवळ मंडलिक पावले यांचीच नव्हे, तर इथल्या सगळ्याच गावक-यांची आहे.
गाव : मलढोण (जि. नाशिक)
लोकसंख्या : 1600अंतर : नाशिकपासून
65 किलोमीटर
पाऊस रुसला, गाव खंगला
125कुटुंब दुष्काळामुळे स्थलांतरित
400 गावकरी ऊसतोड आणि वीटभट्टीच्या कामावर
03हातपंप पाण्याविना बंद पडले
04दिवसांनंतर मिळते दोन हंडे पाणी
07गावतळी कोरडीठाक