आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळी पावसाच्या झळा अन् कांदा भावाला उतरती कळा; उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभोणा- कळवण तालुक्यात कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले आहे. परंतु, भाव गडगडल्याने त्याचा मोठा फटका शेतकरीवर्गाला बसला आहे. त्यातच अवकाळी पावसाच्या झळा... अन् कांदा भावाला उतरत्या कळेचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा जीवघेण्या परिस्थितीने बळीराजा त्रस्त झालेला आहे. त्यातच सरकार सुस्त असल्याने संतापाची लाट उसळली आहे. 
 
महागाईला लगाम घालण्याच्या प्रयत्नातून तीन-चार महिन्यांमध्ये कांद्याचे भाव उतरले अाहेत. त्यामुळे उत्पादनाचा खर्च वसूल होतो की नाही ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावू लागली आहे. अभोणा उपबाजार आवारात कमी भाव मिळत असल्याची तक्रार शेतकरी करीत आहे. येथील भावापेक्षा थोडा चांगला भाव रोख रक्कम मिळविण्यासाठी अभोणा परिसरातून दररोज शेकडो ट्रॅक्टर पिंपळगाव बसवंत बाजाराकडे जात अाहेत. तेथे कांदा २०० ते ७०० रुपये प्रति क्विंटलने खरेदी केला जात आहे. मिळेल ते पदरात पाडून घेण्यासाठी अभोणा उपबाजार आवारातदेखील कांद्याची विक्रमी आवक सुरू आहे. त्यामुळे भाव आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतीपिकांना हमीभाव द्यावा, शेती कर्ज माफ करावे, कांद्याची निर्यातबंदी उठवावी आदी मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. काही ठिकाणी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस गारपिटीने शेतीमालाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा अस्मानी अन् सुलतानी संकटांनी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून त्यांच्या स्वप्नांचा आधीच चुराडा केला आहे.
 
सातत्याने शेतीमालाचे घसरणारे भाव, महागडे बी -बियाणे, मजूर टंचाईमुळे द्यावी लागणारी वाढीव मजुरी मुळे शेतकऱ्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत अाहे. त्यातच शेतकऱ्यांनी कष्टातून पिकवलेला कांद्याचे अवकाळी पाऊस गारपीटीमुळे नुकसान झाले अाहे. अद्याप पावसाचे वातावरण तयार होत असल्याने बळीराजा भयभीत झाला आहे. त्यामुळे सरकारकडे शेतीमालाला उत्पादन खर्चावर अाधारित हमीभाव देण्याची मागणी जाेर धरत अाहे. 
 
हमीभाव हवा 
गतवर्षी आडत मुद्यावर मार्केट बंद असल्याने ७० टक्के कांदा चाळीतच सडला तर ३० टक्के कांदा कवडीमोल भावात विकल्याने उत्पादन खर्चही वसूल झाला नव्हता. यंदा नोटबंदीमुळे उसनवारीने का होईना कांदा उत्पादन चांगल्या प्रतीचे झाले. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नसल्याने बळीराजा पुन्हा चिंताग्रस्त बनला आहे. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी हमीभाव द्यावा तसेच निर्यातबंदी उठवावी. -देवेंद्र ढुमसे, कांदा उत्पादक, वंजारी 
 
शेती करणे म्हणजे घरघालू धंदा 
बाजारभाव मिळत नसल्याने शेतीत काही राहिले नाही. शेती करणे म्हणजे घरघालू धंदा झाला आहे. कांद्याला किमान सातशे रुपये भाव मिळायला हवा. अभोणा उपबाजारात सध्या ८० ते ४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. तोही रोखीच्या पावतीवर धनादेश दिले जात आहे. त्या पैशांसाठी बँकांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. -सुरेश मोरे, कांदा उत्पादक, ओझर 
 
बातम्या आणखी आहेत...