नाशिक- शहरात घरफोड्या, सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू असतानाच मंगळवारी भरदिवसा दुपारच्या सुमारास वेगवेगळ्या तीन ठिकाणी वृद्धांना पोलिस असल्याचे भासवित लुबाडण्यात आले. या महिलांना तुमचे दागिने काढून ठेवा, असे म्हणत तब्बल दीड लाखाचे दागिने लांबविल्याच्या घटना घडल्या. या प्रकारांनी तेातया पोलिसांनी नाकेबंदी, वाहन तपासणी आणि गस्त घालणार्या पोलिसांना उघडउघड आव्हान दिल्याचे चित्र आहे.
शहरात ठिकठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून घेण्याच्या घटना घडत असतानाही तुम्ही दागिने घालून का फिरतात? आम्ही पोलिस असून, तुमचे दागिने काढून ठेवा, अशी बतावणी करीत जुनी पंडित कॉलनीतील गोदावरी बँकेसमोर जाणार्या वृद्धास थांबविले. प्रभा सुभाष पाटील यांनी हातातील तीन तोळे सोन्याच्या बांगड्या काढून पिशवीत ठेवताच संशयितांनी नजर चुकवून हातातील पिशवीच लांबविली. ही घटना दुपारी 2 वाजता घडून सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापूर्वीच दुसरी घटना घडली. या ठिकाणाहून अवघ्या एक ते दीड किलोमीटर अंतरावरील गंगापूररोड परिसरातील डीकेनगर येथे रमाबेन मोहनलाल पटेल या वृद्धेस चौघांनी गाठले. त्यांनाही अशाच प्रकारे बतावणी करीत त्यांचे दागिने लांबविले.
या दोन्ही घटनांची बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे वरिष्ठांनी कळवित नाकेबंदीच्या आणि गस्त पथके, बीटमार्शल यांनाही हद्दीत संशयितांचा शोध घेण्याचे आदेश दिले जात असतानाच, तोतया पोलिसांनी तिसरा दणका दिला. अवघ्या अध्र्या तासात दुपारी 3 वाजता दिंडोरीरोडवरील र्शीकृष्ण मंगल कार्यालयात लग्नास जाणार्या विमल रायजादे (रा. सिडको) यांना कार्यालयासमोरच दोघांनी थांबवित दागिने सांभाळण्याचा सल्ला दिला. लग्नसमारंभात दागिने काढून पर्समध्ये ठेवण्याचे सांगून त्यांनी हातातील बांगड्या, गळ्यातील पोत काढताच संशयितांनी हिसकावून पळ काढला. यामध्ये रायजादे यांचे 60 हजारांचे दागिने लांबविले. या तीनही घटनांत सुमारे दीड लाखाचा ऐवज तोतया पोलिसांनी लंपास केला.
भामट्यांनी दागिने लांबविल्याच्या घटना घडल्याने तसेच भद्रकाली, उपनगर व नाशिकरोड परिसरात दोन दिवसांपुर्वी विविध गुन्हे घडल्याने दहशत निर्माण झाली आहे. भरदिवसा होणार्या घरफोड्या व इतर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणेकडून विशेष दक्षता घेतली जात असतानाच या घटना घडल्याने यंत्रणा अपयशी ठरत आहे.
गुन्हे रोखण्यासाठी पुन्हा मोहीम
दहाहून अधिक वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि 30 सहायक निरीक्षक नव्याने पोलिस आयुक्तालयात दाखल झाले असून, त्यांना शहराची आणि पोलिस ठाण्याची हद्द समजेपर्यंत थोडा अवधी जाऊ शकतो. तरीही दररोज गुन्हे रोखण्यासाठी कोम्बिंग, नाकेबंदी व गस्तीत बदल आणि सोसायट्यांमध्ये संवाद साधण्याच्या मोहिमा राबविल्या जात आहेत. गुन्हेगारी रोखण्यात पोलिस यंत्रणेला आगामी काळात निश्चितच यश येईल. कुलवंतकुमार सरंगल, पोलिस आयुक्त