आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक : रत्नागिरी हापूसच्या नावाखाली केरळी आंब्यांची विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरवासीयांत मंगळवारी अक्षय्य तृतीयेचा उत्साह दिसून आला. पितरांच्या स्मरणासोबतच अनेकांनी सोने, फ्लॅट, दुचाकी, चारचाकींची खरेदी केली. अक्षय्य तृतीयेला आमरसाचे मोठे महत्त्व असल्याने आंब्यांनाही मोठी मागणी दिसून आली. मात्र, आंब्यांच्या मागणीत वाढ झाल्याचा अनेक विक्रेत्यांनी गैरफायदा घेत रत्नागिरीच्या हापूसच्या नावाखाली केरळी आंब्याची विक्री करून ग्राहकांची चक्क फसवणूक केली, तर काही विक्रेत्यांनी एका दिवसात किलोमागे ५० रुपयांनी दरवाढ केली होती.

उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाल्यानंतर आणि पहिला पाऊस पडेपर्यंत आमरस खाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पसंती देतात. त्यामुळे शहरात सध्या केरळ, देवगड आणि रत्नागिरीचा हापूस, लालबाग, पायरी या जातींचे आंबा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अक्षय्य तृतीयेला आंब्याच्या दरात किलोमागे एकाच दिवसात झालेली ४० ते ५० रुपयांची वाढ, तसेच रत्नागिरी हापूस ऐवजी केरळी आंब्यांच्या विक्रीने फसवणूक झाल्याने शहरवासीयांनी नाराजी व्यक्त केली. मंगळवारी हापूस आंब्याला २००, २५० आणि २७० रुपये किलोंचा दर होता, तर लालबागचा ७० रुपये किलो दर होता. परंतु, याच आंब्यांचे दर रविवारी आणि सोमवारी ४० ते ५० रुपयांनी कमी होते.

..असा ओळखावा रत्नागिरी हापूस

रत्नागिरी हापूस आंब्याची साल पातळ असून, त्याच्या देठाजवळ खड्डा असतो, तसेच रत्नागिरी हापूस आंब्याचा रस सालास चिकटत नाही. याउलट केरळी हापूस आंब्याची साल जाड असून, देठाचा खड्डा भरत नाही. केरळी हापूस आंब्याचा रस हा सालास चिकटतो. दोन्ही हापूसच्या गोडीत मोठा फरक आढळतो. या माहितीमुळे निश्चितच फसवणूक टळू शकेल. रत्नागिरी येथील आंबा उत्पादकांनी ही माहिती दिली.

फसवणूक टाळण्याची आवश्यकता

ग्राहक विश्वासाने आंबा खरेदीसाठी विक्रेत्यांकडे जातो. मात्र, काही विक्रेते थेट दरात वाढ करून ग्राहकांना वेठीस धरतात, तसेच रत्नागिरीच्या नावाखाली दुसराच हापूस देऊन ग्राहकांची फसवणूक करतात. संबंधित यंत्रणांनी ग्राहकांची फसवणूक टाळायला हवी. त्यासाठी योग्य उपाययोजनांची गरज आहे. रामदासगायकवाड, ग्राहक

किलो नव्हे, डझनावर होते विक्री

रत्नागिरीचा आंबा हा नैसर्गिकरीत्या पिकविलेला असल्याने त्याचा सुगंध येतो. त्याचप्रमाणे आम्ही आंबा किलोवर नाही, तर डझनानुसार विक्री करीत असतो. आम्ही स्वत:च उत्पादक असल्याने जो दर प्रथमपासून आहे तोच ठेवतो. अनंत नागवेकर, आंबा विक्रेते