आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इ-तंत्राने ‘अमृत’ भूमिपूजनाचा रसभंग, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 28 प्रकल्पांचे डिजिटल भूमिपूजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उद‌्घाटनासाठी हाेणारा खर्च, वेळेचा अपव्यय अशा नानाविध कारणांच्या पार्श्वभूमीवर इ-तंत्रज्ञानाचा वापर करीत एका फटक्यात अमृत याेजनेतून काेट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा बार उडवण्याचे भाजप सरकारचे स्वप्न चांगलेच अडचणीत सापडले.
 
नाशिकच्या गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्रासाठी २८ कोटींच्या निधीसह राज्यभरातील विविध २८ प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने इ-भूमिपूजन झाले खरे, मात्र त्याचे थेट प्रक्षेपण बघताना कधी चित्रच गायब हाेणे, कधी अावाजच खंडित हाेणे असे एकापाठाेपाठ एक तांत्रिक विघ्न सुरू झाल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या कारभारामुळे उपस्थित नगरसेवक कार्यकर्तेही गाेंधळात पडले हाेते.
 
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी, अमृत, स्वच्छ भारत या योजनांसह राज्य शासनाच्या नगरोत्थान या वैशिष्टपूर्ण योजनांतर्गत राज्यभरातील २० शहरांमध्ये १६२२ कोटींच्या २८ प्रकल्पांचे गुरुवारी (दि. १३) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने इ-भूमिपूजन करण्यात आले. मुंबई येथे झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह केंद्रीयमंत्री सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, डॉ. रणजीत पाटील, बबनराव लोणीकर आदी उपस्थित होते. अमृत योजनेंतर्गत समावेश झाल्यानंतर गंगापूर येथील मलनिस्सारण केंद्रासाठी २८ कोटी मंजूर झाला असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले.

या भूमिपूजन सोहळ्याचे वेबकास्टिंग होणार असल्याने महापालिकेच्या वतीने कालिदास कलामंदिरात विशेष व्यवस्था करण्यात आली होती. एलईडी स्क्रिनवर हा सोहळा दाखविला जात असताना दुसरीकडे मात्र, वारंवार तांत्रिक बिघाड होत गेल्याने लोकप्रतिनिधींसह नागरिकांचा रसभंग जास्त झाला. वेबकास्टिंग सुरू असताना अचानक क्षणचित्रे बंद होत होती. तर कधी आवाजच येत नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस इतर अधिकारी नक्की काय बोलले हेही समजू शकले नाही. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, जिल्हाधिकारी पालिकेचे प्रभारी आयुक्त राधाकृष्णन बी. आदी उपस्थित होते.
 
केंद्राच्या अमृत योजनेसाठी शहरांमध्ये विकासकामे करण्यासाठी ८२७ कोटींचा निधी मंजुर झाला आहे. त्यात नाशिकच्या गंगापूर येथील एसटीपी केंद्राचा समावेश असून त्यासाठी २८.७९ कोटी निधी प्रस्तावित आहे. विविध मुदतीत हे काम पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत: सूचना केल्या आहेत. तर मालेगावमध्ये उड्डाणपूल चांदवडसाठी ६४.५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन या वेळी झाले. उर्वरित २० शहरांमध्ये नगरोत्थान योजनेसाठी ७९५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...