आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांसमाेर पाेलिस यंत्रणेचे ‘लर्निंग’, इ-लर्निंगचे उद‌्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाेलिस दलाचे अाधुनिकीकरण करतानाच हायटेक तंत्राचा वापर करून गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्यासाठी उच्च प्रतीचे संगणक प्रशिक्षण देण्याची ख्याती कमावणाऱ्या महाराष्ट्र पाेलिस प्रशिक्षण प्रबाेधिनीच्या इ-लर्निंग उद‌्घाटनात नेटवर्क फेल झाल्यामुळे एका क्लिकसाठी मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांचा खाेळंबा झाला. मुख्यमंत्र्यांसमाेर पाेलिस अधिकारी २० मिनिटे कनेक्टिव्हिटी मिळविण्यासाठी केलेल्या धडपडीतून तंत्रज्ञानाचा जणू धडाच शिकले. मुंबईतील नियाेजित कार्यक्रमाला हाेणाऱ्या विलंबामुळे मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील चिंता साफ दिसत असताना, त्यांनीही स्वत:च्या माेबाइलवरून कनेक्टिव्हिटी मिळविण्याचा प्रयत्न केला. अखेर खूप उशिरा नेटवर्क मिळाले; मात्र या प्रकाराने व्हायचे ते हसू झालेच...
प्रबाेधिनीच्या ११३व्या दीक्षांत साेहळ्यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री राम शिंदे डाॅ. रणजित पाटील, पाेलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी, लाेकप्रतिनिधी उपस्थित हाेते. साेहळा संपल्यानंतर इ-लर्निंग संकेतस्थळाचे उद‌्घाटन फडणवीस यांच्या हस्ते हाेणार हाेते. त्यासाठी खास तयारीही करण्यात अाली हाेती. माेठा स्क्रीन लावून सर्वांना साेहळा त्या अनुषंगाने ‘हायटेक एमपीए’च्या दिशेने पडणारे पाऊल दिसावे याची सगळी तजवीज केली हाेती. मुंबईत इस्त्रायलच्या शिष्टमंडळाशी महत्त्वपूर्ण चर्चा असल्यामुळे मुख्यमंत्र्यांना तिकडचे वेध लागले हाेते. अाता फक्त संकेतस्थळावर क्लिक करून अाैपचारिक उद‌्घाटन अाणि दाेन शब्दांचे मनाेगत बाकी हाेते. मुख्यमंत्री उद‌्घाटनस्थळी पाेहाेचले. दाेन मिनिटे विसावून त्यांनी क्लिक करण्यासाठी माऊस हातात घेतला, तर अचानक कनेक्टिव्हिटी गायब झाली. त्यानंतर तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र, त्यांनाही इंटरनेट कनेक्ट हाेईना. परिणामी, अधिकाऱ्यांच्या ताेंडचे पाणी पळाले. मुख्यमंत्रीही झाल्या प्रकाराने अस्वस्थ झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवू लागले हाेते. त्यांनी स्वत:ही कनेक्ट हाेण्याचा प्रयत्न केला. साेबतचे तिन्ही मंत्री शहरातील अामदारांनीही त्यासाठी तांत्रिक खटाटाेप सुरू केला. पण, उपयाेग झाला नाही. समाेरच असलेल्या मीडियाला ‘हायटेक पाेलिस यंत्रणे’ची गरमागरम बातमी अायतीच हातात पडल्याची जाणीवही त्यांना अनुभवावरून झाली. काही अधिकाऱ्यांनी माेबाइलवर संकेतस्थळ कनेक्ट करून ताेपर्यंत फीचर्स दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतर संकेतस्थळ कनेक्ट झाले मुख्यमंत्र्यांसमवेत सर्वांच्याच चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले.

इ-लर्निंगमधून जगभरातील ज्ञान
प्रबोधिनीच्या इ-लर्निंग उपक्रमाच्या माध्यमातून जगभरातील ज्ञानभांडार प्रशिक्षणार्थी पोलिस अधिकाऱ्यांना उपलब्ध झाले अाहे. त्याचा उपयोग समाजाभिमुख जबाबदारी पार पाडण्यासाठी करावा, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. याचवेळी ओपन एअर थिएटर, कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन करण्यात अाले. या प्रणालीचा प्रभावी उपयोग होण्यासाठी ब्रॉडबॅण्ड लिज लाइनचा वापर करावा, असे सांगून प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना इ-शिक्षण प्रणालीत नियमित प्रशिक्षण मॉड्युल, सेवांतर्गत प्रशिक्षण, पोलिस स्टेशन व्यवस्थापन आदी प्रमुख विभाग करण्यात आले आहेत. टॅब, लॅपटॉप, संगणक मोबाइल फोन्स या आधुनिक साधनांच्या माध्यमातून डिजिटल तंत्राचा परिणामकारक वापर या इ-लर्निंगसाठी करण्याचेही अावाहन फडणवीस यांनी केले.
पाेलिस प्रबाेधिनीच्या इ-लर्निंग उद‌्घाटनावेळी नेटवर्कअभावी क्लिकसाठी खाेळंबा झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही काही काळ अचंबित झाले. त्यांचे सहकारी मंत्री अाणि स्थानिक अामदारांनाही संकेतस्थळ कनेक्ट करता येत नसल्याने हसू फुटले.
बातम्या आणखी आहेत...