आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इ-लर्निंगने राज्यात ११६ शाळांत शिक्षणाचा लळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रोटरी क्लबच्या इ-लर्निंग उपक्रमामुळे शाळांतील पन्नास टक्क्यांपर्यंत असलेली विद्यार्थ्यांची गळती कमी करण्यात यश आले आहे. विशेष म्हणजे, आॅडिओ व्हिज्युअल शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लळा लागला आहे. चंद्रपूरपासून इगतपुरीपर्यंत विस्तारलेल्या ‘रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३०३०’कडून ११६ शाळांत इ-लर्निंग किट बसविण्यात आले असून, रोटरी क्लब आॅफ अंबडने नाशिक जिल्ह्यात असे ४० किट बसविले आहेत. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीनेही या उपक्रमाला साहाय्य करीत १२ शाळांना असे किट देण्याचे निश्चित केले असून, महिनाभरात ते कार्यान्वित होणार आहेत. एका इ-लर्निंग किटची किंमत ९३ हजार रुपये आहे.
रोटरी क्लबच्या या उपक्रमामुळे ज्या शाळांत विद्यार्थी गळतीचे प्रमाण मोठे आहे, त्यांना ‘लाख’मोलाचा मदतीचा हात मिळाला आहे. देशाचे भवितव्य असलेल्या या शाळकरी मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे, यासाठी रोटरीने हा उपक्रम सुरू केला आहे. इ-लर्निंग किटमध्ये प्रोजेक्टर, स्पीकर, सॉफ्टवेअरचा समावेशआहे. गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ही आधुनिक शिक्षणप्रणाली पोहोचण्यासाठी सर्वेक्षणानंतर आश्रमशाळा, जिल्हा परिषद महापालिका शाळांची निवड करण्यात आली आहे. चाळीस शाळांत हा प्रकल्प लक्षवेधी ठरत आहे. माजी प्रांतपाल दादा देशमुख, मेजर ए. ए. पिल्ले, टी. एच. पाटील, कॅप्टन आर. बारीख, क्लबचे अध्यक्ष उमेश कोठावदे, माजी अध्यक्ष तुषार चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प यशस्वी ठरत आहे.

गळती पन्नासहून दहा टक्क्यांवर
इ-लर्निंगचेकिट असलेल्या शाळांत पन्नास टक्क्यांपर्यंत असलेले गळतीचे प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत आले आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढली आहे. दहावीपर्यंतचा राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम यात आहे. शिवाय, स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रमही यात आहे. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांत विद्यार्थ्यांना आॅडिओ-व्हिडिओ स्वरूपात हे शिक्षण दिले जाते.